आश्विनाचे आले दिस
शेवंती हळदी हासे
रंग उत्सवी झेंडूचा
कामिनी धरणी भासे
निळ्या नितळ आकाशी
शुभ्र ढगांची आरास
सोनपोपटी पालवी
शोभे तोरण दारास
सारे सावळे शारद
पण तेज उतू जाई
सांज सोनेरी तेवते
जशी नशिली रुबाई
सारा पूर्ततेचा ऋतू
शिगोशीग झाली सुगी
माजघर तुडुंबले
तृप्त हासली कणगी
पाखरांच्या मुखी आला
नवा टपोरसा दाणा
पाणी भरली धरणे
समृद्धी वाटते वाणा
आली पौर्णिमा आटीव
शुभ्र मोतिया प्रकाशु
उतू जाऊदे पायस
सुधा वर्षेल सुधांशु
कमलिनी कुमुदिनी
फुललेल्या पाणकळ्या
माथ्यावर धरेवर
रंगमाखल्या रांगोळ्या
रूप रंग गंध माया
येवो सुखाला भरती
पूर्णचंद्राची किमया
होवो जगतावरती!
--अदिती
(२८.९.०६)