माझ्या आजोळची गोष्ट - खाऊगिरी

तात्यांचा मदत हवी हा लेख वाचला, त्यावरची संजोप राव, दिगम्भा यांची कोल्हापुराशी संबंधित टिप्पणी वाचली आणि माझ्या कोल्हापूर प्रेमाबद्दल लिहावेसे वाटले. पाहा वाचवतेय का. :)


वार्षिक परीक्षा जवळ आल्या की आम्हाला सुट्टीचे वेध लागायचे (परीक्षेत काय होणार, अभ्यास करायला हवा वगैरे काळजी दूरच)!! कधी परीक्षा संपतायत आणि कधी पळ काढतोय असे व्हायचे. मैत्रिणींचे काय बेत आहेत, याची चौकशी सुरू असायची आणि गेल्या वर्षी काय धमाल केली होती याचीही उजळणी व्हायची. उत्तरपत्रिका लिहून शिक्षकांच्या हाती सोपवल्या की आमचे काम संपलेले असायचे. निकाल कधी आहे, कसा लागेल याच्याशी ७ वी-८वी पर्यंत तरी आम्हाला कर्तव्य नसायचे. जन्मल्यापासून शाळा संपेपर्यंत १५-१६ उन्हाळे कोल्हापुरात काढले असतील. नुसती धमाल!


माझे आजोळ महाद्वार रोडवरच. पापाची तिकटी असे झकास नाव आहे या भागाचे. जुने दगडी बांधकाम असलेले आजीचे घर होते. खूप मोठे कुटुंब. माझी आई नऊ भावंडांपैकी एक. शिवाय त्यावेळेच्या एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे आजोबांचे दोन भाऊही अगदी एकाच घरात नसले तरी जवळपासच होते. त्यांचीही नातवंडे सुट्टीत आलेली असायची. त्यामुळे फक्त आजीचेच नाही तर आसपासची ३-४ चुलत घरेही आम्हाला दिवसरात्र खुली असायची. या साऱ्या घरांना आपण वागवेकर संकुल म्हणू. तीन धाकटे मामा आणि मावशी त्यावेळी कॉलेजात शिकत होते. त्यामुळे आजी, हिला आम्ही थोरली आई म्हणत असू, तीन मामा आणि एक मावशी हे सगळे या पापाच्या तिकटीच्या घरात असायचे. माहेरपणाला आलेल्या सगळ्या मुली, म्हणजे माझी आई, चुलत आणि सख्ख्या मावश्या आपापल्या आयांकडे म्हणजे संकुलात असायच्या. आणि तीन विवाहित मामा आपल्या कुटुंबासमवेत दुसरीकडे मोठ्या घरात राहायचे. कर्तेसवरते लोक म्हणजे तीन मोठे मामा नि माम्या मोठ्या घरी असल्याने सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था मोठ्या घरी. ३५-४० डोक्यांची रोजची पंगत असायची. थोरल्या आईसाठी मोठ्या घरातून सकाळ संध्याकाळ डबा येत असे. पण थोरल्या आईला लहर आली तर आम्हा सर्वांसाठी एखादी स्पेशल भाजी या घरी तिच्या छोट्याशा चुलीवर बनवत असे. (या चुलीची जागा आता गॅसच्या शेगडीने घेतली आहे.) देवघराच्या दरवाज्यापाशी मोठे दुभत्याचे कपाट होते. या कपाटात वेगवेगळ्या आकाराची गाडगी दही, ताक, लोणी, तूप यांनी भरलेली असत. थोरली आई रोज न चुकता विरजण लावणे, ताक करणे, लोणी काढणे ही कामे करत असे. कधी कधी गरमागरम भाकरीवर मोठ्या प्रेमाने ताजा ताजा लोण्याचा गोळा पडत असे. कधी आलं-लसूण-कोथिंबिरीची गोळी लावलेली गरमागरम कढी असायची. चव अजूनही जिभेवर आहे!


मे-जूनच्या दरम्यान या ३-४ घरांमध्ये वेगवेगळ्या गावांहून एकत्र आलेली आम्ही दहा ते बारा मुले-मुली असायचो. ही सगळी मुले साधारण एकाच वयोगटातली, वयात दोन तीन वर्षांचे अंतर. माझ्या एका मावस भावाने यावर अशी वदंता उठवली होती की या दोन तीन वर्षांच्या काळात वागवेकरांच्या बाळंतिणीच्या खोलीतला पाळणा एकदा इकडून तिकडे हालला की त्यात एक नवीन मूल असायचे!! :) हे एवढे सगळे खटले कमी म्हणून की काय, आजूबाजूच्या गावांमधून कोल्हापुरात बाजार किंवा डॉक्टरची भेट किंवा तत्सम कामासाठी आलेल्या माझ्या आजीच्या मैत्रीणी जेवायला किंवा चहाला असायच्या. "हिरकणीची व्हय बाळ तू? मुंबैस्नं कवा आलायसा?" अशी मायाळू चौकशी व्हायची. गाडी हळूच मुंबईच्या सुरस आणि चमत्कारिक कथांकडे वळायची आणि आम्ही तिथून काढता पाय घ्यायचो.


माझ्या आजोबांचे पत्र्याच्या वस्तू बनवण्याचे मोठे दुकान तिथेच होते. आजोबांच्या मृत्यूनंतर मोठ्या मामाने हे दुकान सांभाळले. या दुकानात गुऱ्हाळात लागणाऱ्या कायलींपासुन, दुधाच्या किटल्या, घागरी, झाऱ्या वगैरे असंख्य गोष्टी बनायच्या. दुकानातली वर्षानुवर्ष टिकवलेली गिऱ्हाईके, आणि कर्मचारीवर्गही घरच्या सारखेच असायचे.  दुकानातला मदतनीस सिकंदरमामा, पिठाची गिरणी सांभाळणारा मधु आणि भिवा, भावाच्या हॉटेलमध्ये पडेल ते काम करणारी आणि तिथेच वर्षानुवर्षे एकटी राहणारी शेजारची आक्कामावशी, सगळेच आमचे मावशी, मामामामी किंवा आजोबाआजी असायचे.


आमचा दिवस सुरू होत असे खाण्यापासून. सकाळच्या चहाबरोबर जवळच्याच बेकरीतून आणलेले ताजे बटर, याला वरकी ही म्हणायचे, खारी बिस्किटे, किंवा पाव असायचा. बटर, पाव चहात बुडवून खायला मजा येत असे. मुंबईतल्या बटरला किंवा पावाला अशी चव नसायची.


दुपारचे जेवण मोठ्या घरातल्या लांबलचक पंगतीत बसून व्हायचे. जेवण झाले की आम्ही हुंदडायला मोकळे. घरात दिवसभर माणसांचा राबता, त्यांचे चहापाणी आणि जेवणखाण सुरू असायचे. त्यामुळे आम्हा मुलांकडे लक्ष द्यायला कुणाला फारसा वेळ नसायचा. ताई(माझ्या आईची चुलती, पुण्यामुंबईच्या भाषेत काकू) च्या माडीवर, किंवा घरासमोरच्या गल्लीत आम्हा मुलांचा आंधळी कोशिंबीर, लपाछपी, खांब (प्रत्येकाने आपापला खांब धरून उभे राहायचे, ज्याच्यावर राज्य असेल तो सगळ्यांवर नजर ठेवून असायचा. कुणी खांबापासून हालले की दुसरा खांब गाठायच्या आधी त्याला पकडायचे, की मग त्याच्यावर राज्य) असे खेळ रंगायचे.


खेळून कंटाळा आला आणि पेरीनाची गाडी येताना दिसली की थोरल्या आईकडे आइसक्रीमसाठी हट्ट सुरू व्हायचा. पेरीना/फेमिला अशा नावांच्या गाड्यांवर १० पैशाला व्हॅनिला आइसक्रीमच्या कांड्या मिळायच्या. आई मग कुठल्यातरी मामाच्या मागे लागून आमचा हट्ट पुरवायची. दुपारच्या वेळेला ते आइसक्रीम खाऊन स्वर्ग मिळाल्याचा आनंद आम्हाला झालेला असायचा. शिवाय कुणीकुणी आणलेली करवंदं, जांभळं, चोखायचे रायवळ(?) आंबे असा रानमेवा अधुनमधुन असायचाच.


संध्याकाळी धाकट्या मावशीबरोबर अंबाबाईचे देऊळ, रंकाळा, पंचगंगा नदी अशा ठिकाणी जाणे व्हायचे. चिरमुरे, खारे शेंगदाणे, फुटाणे, फरसाण अशा गोष्टी विकत घेऊन (हे चिरमुरे विकणाऱ्या आजोबांचा आवाज एकदम घोगरा होता, आणि शिवाय मुद्रा नेहमी गंभीर. आम्हाला खूप भीती वाटत असे त्यांची) त्याची सुकी भेळ बनवायचो आणि मग रंकाळ्यावर आमची भेळपार्टी रंगायची. त्यावेळी आजच्या एवढे भेळ, चाटचे स्टॉल्स नसायचे तिकडे. पण या सुक्या भेळेची चव कधीही स्टॉलवरल्या भेळेला आली नाही.


संध्याकाळची जेवणे वगैरे झाली की अंथरुणे टाकून पत्ते किंवा कॅरमचा डाव रंगायचा. कुणीतरी मध्येच आइसक्रीम ची टूम काढायचे. मग आम्हा १५-२० जणांचा मोर्चा, पोरं-टोरं, त्यांच्या आया, एखादा मामा बरोबर असायचा, कोल्ड्रिंक हाउसकडे वळायचा. याला शीतपेयगृह म्हणायची पद्धत कधीच नव्हती. कोल्ड्रिंक हाउस हाच शब्द असायचा. रात्रीच्या निवांत वेळी महाद्वार रोडवरून चालायला छान वाटायचं. इतर सर्व दुकानं बंद झालेली असायची. त्यामुळे वर्दळ अजिबात नसायची. गंगावेशेत दुधाच्या कट्ट्यावर म्हशी घेऊन जाणाऱ्या गवळ्यांचा आणि म्हशींच्या गळ्यातल्या घंटांचा काय तो आवाज असायचा. धारोष्ण दूध प्यायला जाणाऱ्यांचा एक ग्रुप होता. पण आम्हाला मात्र आइसक्रीम प्रिय. काचेच्या सुंदर कपांतून, स्टीलच्या छोट्या चपट्या चमच्यांनी आइसक्रीम खायचा आनंद त्या वयात न्याराच होता. आइसक्रीम खाऊन तृप्त झालेले आम्ही हालत डुलत, गप्पा मारत परत येत असू. अशी सुंदर झोप लागायची. स्वप्नेही आइसक्रीमची पडत.


नंतरच्या आयुष्यात खाऊगिरी बरीच केली. कॉलेज सुरू झाल्यावर कोल्हापुराला जाणेही कमी कमी होत गेले. पण कोल्हापूरच्या आठवणी नेहमीच अशा लखलखत समोर येतात की सारे काही त्यापुढे फिके पडते.


पुन्हा केव्हातरी तिथल्या लोकांवर लिहीन.


-प्रभावित