तालीम एकांकिकांची...

     कॉलेज सुरु होतं तसे मला हळू हळू तालमीचे वेध लागतात. माझी तालीम म्हणजे व्यायामशाळा नाही; एकांकिकांच्या तालमीबद्दल बोलतोय मी. शाळेत असताना चुकूनही कधी स्टेजवर न गेलेला मी, एकांकिका करण्यात कसा ओढलो गेलो कुणास ठाऊक? गेली दोन वर्ष बॅकस्टेज करणं आणि मिळालाच तर छोटासा रोल करणं अशीच गेली. मला काय माहीत की फक्त अनुभव आणि शब्दांचे शुद्ध उच्चार एवढा मोठ्ठा रोल मिळू शकतो. मी यावर्षी सायकॉलॉजिस्टच्या भुमिकेत होतो. कधीही न प्रत्यक्ष पाहीलेली व्यक्ती स्टेजवर कशी बरं करावी? इमॅजिन आणि इंप्रोव्हाइज करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. 
     


     एक प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट, म्हणजे तो वयाने पस्तिशीचा असावा. कपडे अर्थातच कडक इस्त्रीचे फॉर्मल्स. दिसायला कसा असेल? "श्वास" मधल्या संदीप कुलकर्णीसारखा (आता दिसायला मी काही त्यांच्याएवढा स्मार्ट आणि तगडा मुळीच नाही, तरीपण इमॅजिन करायला कोणाच्या बापाचं जातयं?) अर्थात, मी केस वाढवल्यामुळे थोडा मॅच्युअर्ड दिसतच होतो म्हणा. पण खरा प्रॉब्लेम होता तो म्हणजे, एका खर्‍याखुर्‍या सायकॉलॉजिस्टचे वाटावेत असे मॅच्युअर्ड उच्चार, ते विशिष्ट शब्द, लकबी हे सगळं डेव्हलप करायचा.
    


     मला सरांची, म्हणजे दिग्दर्शकांची खरी मदत झाली ती इथेच. सचिन सर असं म्हणायचे की, नुस्तं पाठांतर दाखवून उपयोग नाही; प्रत्येक वाक्याला एक thought-process (विचारधारा ?)द्यायला हवी. म्हणजे प्रत्येक वाक्याच, त्या योगानं पुर्ण व्यक्तीरेखेचं लॉजिक डेव्हलप करावं लागणार. "या व्यक्तीरेखेसाठी मी भरपूर होमवर्क केला!" असं मोठे मोठे ऍक्टर लोकं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना काय अभिप्रेत असतं ते मला आता थोडंफार कळू लागलय. छ्या, सायकॉलॉजिस्ट नुस्ता स्टेजवर करायचा तरी एवढी डोकॅलिटी लागते; खर्‍या सायकॉलॉजिस्टचं काय होत असेल कुणास ठाऊक? जाउद्यात, हा पानभर लांब उद्या पाठ नाही करुन गेलो तर दिनेश सर तर कच्चे खातील मला...
     


     बाकी दिनेश सरांची क्रिएटिव्हीटी ही एक अजबच गोष्ट! कधी काय आणि कसं सुचेल काय सांगताच यायचं नाही बॉ. साला आख्खा एक सीन प्रेक्षकांकडे पाठ करुन करणं काय सोपी गोष्ट आहे का? पण थिएटर करण्यातली खरी मजा ती हीच. अर्थात, दिनेश सर, सचिन सर आणि जय सर सुद्धा हे जे काय बोलायचे, ते मी लिहीतोय इतक्या सभ्य भाषेत कधीच नाही. त्यांची भाषा लिहायची तर अर्ध पान नुस्त्या फुल्यांनीच भरेल.........


     जाऊदेत, चांगल्या गोष्टी तेवढ्या घ्यायच्या. बाकी सोडून द्यायचं
    


     काय, खरं की नाही?