फणसाचे गरे

मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही. घराणे म्हणजे माझ्या मते लग्नाआधी पत्रिका जमवताना पडताळून बघायची बाब आहे, चीज म्हणजे पावाच्या दोन तुकड्यात घालून खायचा चविष्ट पदार्थ आहे, ख्याल म्हणजे जरा संकुचित झालेला हिंदी विचार आहे.
मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही. कुठल्या गाण्यात कुणी कुठला मध्यम की पंचम किती सुरेख लावला आणि कुठली मींड किती लांबवली हे मला कळत नाही. तासाच्या हिशेबावर राग शिकणारे विद्यार्थी आणि गुरुचे तंबोरे उचलून आणि पिकदाण्या साफ करून धन्य झालेले शागिर्द यात बरेवाईट कोण ते मला सांगता येणार नाही.
मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही. तीन मिनिटाची तबकडी आणि तीन तासांचा ख्याल यातले चांगले काय आणि वाईट काय, किंबहुना बरोबर काय आणि चूक काय यावर काही म्हणाल तर काही मला बोलता येणार नाही. कोणत्या पंडीतजींची तोडी ऐकून कान पवित्र होतात आणि 'छैंया छैंया' ऐकून कान बिघडतात, हे असे का हे मला ठाऊक नाही. लता मंगेशकरांचे गाणे मला लताच्या मूळ आवाजातच गोड वाटले पाहिजे आणि तेच गाणे आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये कुणीतरी म्हटले की मी 'हॅ, कुठे लता आणि कुठे तू!' अस्स बद्धकोष्ठी शेरा मारला पाहिजे यामागचा कार्यकारणभाव डोके फुटेतोवर विचार करूनही माझ्या लक्षात येत नाही. ' लताचा 'नी' बघ कसा लागलाय, आणि तुझा बघ...' असं म्हणून आपण लताला मोठं करतो, की स्वतःला, मला माहिती नाही. 'किती दिवस तू लताचीच गाणी म्हणत बसणार?' असं कुणाला विचारून काय सिद्ध होतं, मला सांगता येणार नाही.
मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही. पण जरी कळत असतं, तरी 'मी अमुक असं म्हटलं की सगळं जग माझ्यावर तलवारी उपसून का धावून येतं ते मला कळत नाही....' असा खोटा कांगावा मी केला असता का, हे मला ठाऊक नाही. 'याच्याशी मी बोललो, यांनी मला त्यांच्या गाडीतून फिरवले, यांच्या मी घरी गेलो' असं वारंवार सांगून मला काय साधले असते, याविषयी मी साशंक आहे. मला संगीतातली जाण आहे याचा सार्थ अभिमान बाळगूनही, माझ्याशी सहमत नसणाऱ्यांना मी चष्मे बदलण्याचे सल्ले दिले असते का? मला सांगता येणार नाही.
मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही. पण भल्या पहाटे नैनितालच्या टेकडीवर फिरत असताना खोल दरीतून ऐकू आलेले 'लग जा गले...' चे अस्सल सूर आणि पारगावकरांच्या गळ्यातून  'बेचैन नजर...' ऐकताना डोळ्याच्या नकळत पाणावलेल्या कडा या दोन्हींनी मला तितकाच आनंद दिला आहे.  सवाई गंधर्व महोत्सवात गानतपस्वी फिरोज दस्तूरांचं 'पिया मिलन की आस..' ऐकताना अंगावर जसे रोमांच उभे राहिले, तसेच प्रमोद रानडेंच्या गळ्यातून 'पूछो ना कैसी मैने रैन बिताई' ऐकताना रहातात. हे बरोबर का चूक ते मला सांगता येणार नाही.
मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही. मला कळतं ते एवढंच, की उजव्या हाताच्या अनामिकेत लग्नाची किंवा साखरपुड्याची अंगठी घालतात याचं कारण म्हणे या अनामिकेपासून थेट हृदयापर्यंत जाणारी एक नस असते. खरंखोटं कुणाला माहीत, पण आपल्या कानांपासून थेट हृदयापर्यंत जाणारी नस असते एवढं बाकी खरं. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, चित्रपट असा कोणताही भेदभाव न करता कानाला गोड वाटणारं आणि थेट हृदयापर्यंत पोचणारं संगीत निखळ आनंद देऊन जातं. मग त्याचे चिकित्सा करता नाही आली तरी चालेल. फणस सोलल्यासारखी कलाकृती सोलून काढायची, गरे फेकून द्यायचे आणि उरलेली गदळ चिवडत कापा चांगला की बरका याची चर्चा करत बसायचं यापेक्षा बाजारात मिळणारे फणसाचे गोड गरे खाणं मला अधिक चांगलं वाटतं. हे बरोबर की चूक ते मला माहिती नाही, कारण  मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही.