"गिरी" शब्दावरचा शाब्दीक खेळ -

मनोगतवर सध्या गांधीगिरी पासून सुरवात होऊन मग सावरकरगिरी, भोंदूगिरी, फालतूगिरी इत्यादी शब्द जोरात येयला लागले आहेत. या वरून अत्र्यांनी केलेला एक विनोद जो माधव गडकरींच्या तोंडून "मराठी भाषा कशी लवचिक आहे" यावर ऐकलेला आठवला. तो इथे सांगतो:



१९६०च्या दशका अखेरी राष्ट्रपती पदाची निवडणूक होती. ती व्हि. व्हि. गिरी विरूद्ध नीलम संजीव रेड्डी अशी होती. त्याच भांडणात काँग्रेस फूटली आणि गिरी जिंकून आले. अत्र्यांना त्यांच्या "मराठा" या वृत्तपत्रात यावर बातमी बरोबर गिरींचे छायाचित्र द्यायचे होते. त्यांच्या मदनीसाला रात्री उशीरापर्यंत असे चित्र मिळाले नाही. त्याच वेळेस त्याने शेवटचा पर्याय म्हणून एक मिळालेले  छायाचित्र साहेबांना घाबरतच दाखवायला नेले. ते एकट्या गिरींचे नव्हते तर ते सपत्नीक आणि त्यांच्या ११ का १२ (१०+ नक्की) मुलांबरोबर होते! (शिवाय सौ. गिरी कुटूंबनियोजनाची समाजसेवा करायच्या!)


त्याला वाटले साहेब ओरडतील, पण अत्रे खूश होत म्हणाले कि हाच फोटो उद्या पहील्या पानावर त्यांच्या निवडून आलेल्या बातमी सकट छापायचा आणि मग तो तसा छापला व वर मोठा मथळा दिला:


व्हि. व्हि. गिरींची कामगिरी!