रामरक्षेतील रामकवचाचे गुपित

विनायक यांच्या चिकाटी व प्रयत्नांमुळे आणि राधिकाताई इत्यादींच्या विद्वत्पूर्ण सहाय्याने सार्थ रामरक्षा मनोगतावर अवतीर्ण झाली हे फार चांगले झाले.


पण रामरक्षा हे केवळ एक स्तोत्र किंवा रामभक्तिपर रचना नाही. त्यात संस्कृत सुभाषितांत इतरत्र दिसणारा खेळकरपणा व कुठेकुठे कूटार्थसुद्धा आहे. "रामो राजमणि: ...." या श्लोकात राम हा शब्द कसा सगळ्या विभक्तींत चालवून दाखवलेला आहे हे आपण बहुतेक सारे जाणतोच.
या लेखाद्वारे सर्वसाधारणपणे लक्षात न येणारे रामरक्षेत लपलेले आणखी एक गुपित आपल्या नजरेला आणू इच्छितो.
(हा शोध मी लावलेला नाही, कोणा शास्त्र्यांनी त्यांच्या सार्थ रामरक्षेच्या पुस्तकात दिलेली गोष्टच मी पुनरुद्धृत करीत आहे.)


रामरक्षेच्या ४ थ्या ते ९ व्या श्लोकांमध्ये रामकवच हा भाग येतो. रामाला वेगवेगळी विशेषणे लावून त्याने आपल्या शरीराच्या त्या त्या अवयवाचे किंवा भागाचे रक्षण करावे अशी प्रार्थना त्यात केलेली आहे. संदर्भासाठी ते खाली पुन्हा एकदा देतो आहे.


शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥ ४ ॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥ ५ ॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥ ६ ॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥ ७ ॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥ ८ ॥
जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥ ९ ॥


यात नक्की काय सागितले आहे? शिरापासून पायापर्यंत भागांचे रक्षण रामाने करावे असे म्हटले आहे, रामाचे वर्णन अनेक विशेषणांच्या सहाय्याने केले आहे. (त्या विशेषणांचे त्यात्या ठिकाणचे महत्त्व विनायकांनी दिले आहेच)
आणखी? आणखीही काहीतरी आहे ..... पुन्हा एक नजर टाका -

शिर - राघव
कपाळ - दशरथात्मज
डोळे - कौसल्येय
कान - विश्वामित्रप्रिय
नाक - मखत्राता
मुख - सौमित्रिवत्सल
जीभ - विद्यानिधि
कण्ठ - भरतवंदित
खांदे - दिव्यायुध
भुजा - भग्नेशकार्मुक
हात - सीतापति
हृदय - जामदग्न्यजित्
मध्य - खरध्वंसी
नाभि - जामदग्न्यजित्
कटि - सुग्रीवेश
सक्थिनी - हनुमत्प्रभु
मांड्या - रक्ष:कुलविनाशकृत्
गुडघे - सेतुकृत्
पोटऱ्या - दशमुखांतक
पाय - बिभीषणश्रीद


अहो, हे तर चक्क श्रीरामाचे चरित्र आहे!
ते सुद्धा एकही वाक्य न  वापरता, केवळ विशेषणांच्या सहायाने साकार केलेले!
तपशीलवार सूचन पहा -
रामाचा जन्म रघुवंशात झाला. तो दशरथ व कौसल्या यांचा पुत्र. विश्वामित्र हे त्याचे गुरु असून त्यांचा तो आवडता होता. त्यांच्या बरोबर जाऊन त्याने यज्ञांचे रक्षण केले. लक्ष्मणाविषयी त्याला अत्यंत प्रेम होते, तसेच तो भरताला वंदनीय होता.
त्याने विश्वामित्रांकडून संपूर्ण विद्या मिळवली व दिव्यायुधेही प्राप्त करून घेतली.
पुढे शिवधनुर्भंग करून त्याने सीतेशी विवाह केला. परशुरामांशी लढून तो विजयी झाला. (त्यानंतर वनवास झाला त्याचा उल्लेख नाही). खर नामक राक्षसाचा त्याने वध केला. सुग्रीवाशी मैत्री करून रामाने त्याला वश करून घेतले. हनुमानाने रामाला आपला स्वामी मानले. राक्षसांच्या संपूर्ण कुळाचा विनाश त्याच्या हातून झाला. त्याने सेतू बांधला. त्याने रावणाचा वध केला व बिभीषणाच्या हाती लंकेचे राज्य सोपविले.

घटनांमध्ये थोडेफार पुढेमागे जरूर झाले असेल, पण किती युक्तीने चरित्र साधले आहे हे चकित करणारे आहे.

एका रामकवचात काय काय आहे नाही!
धन्य ते बुधकौशिक ऋषी!