बालगीतांची पुर्नरचना ही काळाची गरज व तदानुषंगिक विचारमंथन

मित्रहो,


सखोल चिंतन आणि संशोधकवृत्तीने जरी हे लिखाण केले असले तरी एखाद्या धूळ खात पडलेल्या पी. एच. डी. च्या प्रबंधाचा हा विषय नाही. पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या बालसाहित्यातील बालगीतांच्या अक्षम्य उपेक्षेविरुद्ध एका बंडखोर, स्वाभिमानी मनाने दिलेला हा हुंकार आहे. बालगीतांचे नष्टचर्य संपलेच पाहीजे आणि त्यासाठी कसोशीने प्रयत्न झालेच पाहीजे अर्थात,


बालगीतांची पुर्नरचना ही काळाची गरज व तदानुषंगिक विचारमंथन.........


 मी माझ्या तरुणपणी बालगीतांकडे वळलो. अगदी वाट वाकडी करून! अर्थात कारण ही तसेच होते. त्याचं असं आहे, तुम्हाला लहान मुलांसाठी संस्कारक्षम ''छान छान गोष्टी' लिहिणारे साने गुरुजी माहीत असतीलच आणि त्यांचे ते प्रसिद्ध बोधवाक्य,


करील मनोरंजन जो मुलांचे


 जडेल नाते प्रभुशी तयाचे


रेवती प्रभू , आमच्या वर्गातील एक नक्षत्र ! तर ' जडेल नाते प्रभुशी'  हा आशावाद मनी बाळगुन मी तिच्या माहेरी आलेल्या बहीणीच्या मुलाचे मनोरंजन करावयास न बोलावताच जाऊ लागलो. काय करणार, दोन चांगली माणसं सहसा एकमेकाला एकमेकाकडे बोलावित नाही. आणि वाईट लोकांच्या टोळ्या अगदी सहज तयार होतात. पण तो मुद्दा निराळा.


अहाहा मंडळी, रेवतीचा भाचा म्हणजे काय सांगू ? साक्षात बाळकृष्णच. त्याच्या बाललीला बघत मी त्याला बालगीत ऐकवत होतो. प्रत्येक बालगीताचा अर्थ मी रेवतीलाही नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. हा असा 'सार्थ बालगीताचा' कार्यक्रम निर्विघ्नपणे चालू होता असे वाटत होते तोच एके दिवशी बाळकृष्ण म्हणाला ' ए मावशी बघ ना गं हा मामा  मला कसा त्रास देतोय. मला नको ती गाणी! मला नाही आवडत ! '


' अरे राहू दे रे, तो नको म्हणतोय तर, त्यापेक्षा आपण मॅथ्सचे प्रॉब्लेम्स् सोडवूया का ?' रेवती


' नको ! मला आज प्रॅक्टीसला जायचय. टुर्नामेंटस जवळ येतायत.' मी रुक्षपणे म्हंटलो.मी इथे आयुष्याचं गणित मांडतोय आणि हीला मॅथ्सचे प्रॉब्लेम्स् सुचतायत. नाही तरी या रेवतीचं लक्ष त्या चिन्मय चित्र्याकडे होतं असा मला संशय होताच. चिन्मय म्हणजे हुशार आणि देखणा, म्हणजे काँपिटीशन टफ होतीच !
एक तर 'मामा' नावाची शिवी हासडली आणि वरुन गाणी आवडत नाही म्हणालं ते नतद्रष्ट कार्ट. मित्रहो, कळविण्यास अत्यंत दु:ख होते की बाळकृष्ण ते नतद्रष्ट कार्ट हा प्रवास केवळ चारच दिवसांत झाला. असली ही रेवती आणि तिचा तो मुळावर येणारा मूळ नक्षत्रावरचा भाचा. म्हंटलं नादच सोडावा. मी ताड ताड जिना उतरू लागलो. इथ वर सारे ठीक होतं पण उतरताना तिच्या वडिलांचे शब्द कानावर पडले,


' कसली तरी बाष्कळ गाणी सांगायची! उगाच लहान लेकराला त्रास.' 


'काऽऽय बाष्कऽऽळ ? माऽऽझी गाऽऽणी बाष्कऽऽळ ?? हं !' मी. (या वाक्यातील कारुण्य जर तुमच्या  ऱ्हुद्य आ पर्यंत पोहचत नसेल  तर हेच वाक्य जुन्या काळातील प्रभातच्या 'कुंकू' चित्रपटातील अभिनेत्री  शांता आपटे प्रमाणे किनऱ्या आवाजात, लांऽऽऽब हेल काढून म्हणून पहा, तुम्हालाही वेदना जाणवेल !!! )


या अनपेक्षित अपमानाने माझ्या काळजाचा कापूर झाला. मी पेटून उठलो आणि नखशिखांत पेटलेल्या अवस्थेत घोर प्रतिज्ञा केली,


' जोवर मराठी बालगीतांच्या विश्वात क्रांती घडवून आणणार नाही तोवर बुटाच्या लेसला गाठ बांधणार नाही.'


काय करणार हल्ली शिखा, शेंडी  असते  कुठे ? आणि मग सावकाश  हळुहळू  जिना ऊतरुन खाली आलो. बुटाच्या लेस सोडलेल्या अवस्थेत ताड ताड जिने ऊतरलो तर खाली उतरताना पडून खाली येण्याऐवजी सरळ वरती नसतो का गेलो ? आणि मग त्या रेवतीच्या बापाला (आता बापच म्हणणार, आपल्याकडे मग दया-माया नाही ! ) आनंद झाला असता !


उद्विग्न मनाने घरी आलो. डोकं गच्च धरुन बसलो. डोक्यात प्रतिज्ञेचे शब्द घुमत होते, 'बुटाच्या लेसला गाठ बांधणार नाही......बुटाच्या लेसला गाठ बांधणार नाही !' दुसऱ्याच दिवशी बाजारात जाऊन कट शूज विकत आणले !!!


मनात विचार सुरु झाला. असे काय कारण असावे की त्या लहान मुलाला ही बालगीते आवडली नसावीत. कुठे तरी ती त्याला अपील होत नव्हती. नेमके कारण कळत नव्हते. जस जसा विचार केला तेव्हा कळले या बालगीतांमध्ये बालकांचा विचारच केला गेलेला नाहीये. नेहमीचे उदाहरण,


येरे येरे पाव सा , तुला देतो पैसा


पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा


ये गं ये गं सरी, माझे मडके भरी


सर आली धावून, मडके गेले वाहून


अहो कशा आवडणार या इंटरनेटच्या काळातील मुलांना या कविता ? किती अव्यहारी आणि दिशाभूल करणारी ? म्हणे पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा! अरे त्या तिकडे बारामतीला बघा जरा, खराखुरा पैसा ओतून खोटा, कृत्रिम  पाऊस पाडला ! कसा ठेवतील विश्वास लहान मुले या गीतांवर ? आणि हे वाक्य,सर आली धावून‌. शाळेत 'सर' आले आणि गीतात 'सर' आली. किती गोंधळ होत असेल त्या व्याकरणामुळे त्या बालजीवांचा ? ते काही नाही. मी नवे गीत रचले.


येरे येरे पावसा , तुला देतो पैसा


कसे करु मॅनेज ?


सरकार कुठून देईल रोज


नवी नवी पॅकेज ?


 लहान वयातच मुलांना वास्तवाचे भान देणारे हे क्रांतिकारी बालगीत !


अव्यवहारी कल्पना हे अपयशाचे पहीले कारण , दुसरे कारण  म्हणजे


आकर्षक कल्पनांचा अभाव. अनेक कान्व्हेंटमधील पोरे त्या जॉनीची कविता म्हणतच मोठी झालेली.  कोण कुठला तो इंग्लंड अमेरिकेचा चोरटा जॉनी तो चोरुन साखर काय खातो , चांगले दोन फटके द्यायचे सोडून सऱळ कविता! आणि आख्खं जग वेड्यासारखं म्हणतेय तीच कविता. काय आहे ती कविता ?


जॉनी ऽ जॉनीऽ येस् पप्पा


इटिंग शुगर ?


नोऽ पप्पा


टेलींग लाईज ?


नोऽ पप्पाऽ


ओपन युवर माऊथ !


हाऽ  हाऽ  हाऽ


आता काय आहे या कवितेत ? महाराष्ट्र जशी संतांची भूमि आहे, तशीच ती साखरसम्राटांचीही भूमि आहे. शुगरलॉबीच्या या भूमित जॉनी शुगर खाऊ शकतो, मग आमच्या ग्रामीण भागातील जनी, बनी, मनी, चिंटू, पिंटू, मिंटूनेच काय पाप केलेय ? शुगरलॉबीच्या या भूमित आमच्या मुलांच्या वाट्याला  अशा गोडधोडाच्या कविता का  नकोत ?  माझ्या काळजाचा कापूर झाला. मी पेटून उठलो आणि लगेच वेळ कमी असल्याने या कवितेचा मराठी तर्जुमा राज्यशासनाला सादर केला आणि क्रमिक पुस्तकात ही कविता दाखल झाली. हीच ती माझी 'जगप्रसिद्ध' बालकविता,


जनीऽ जनीऽ काय पप्पा ?


आता बालकविता हा काय वादाचा विषय होऊ शकतो  का?   पण आमच्याकडे कशावरही वाद होतो. किंबहुना तुम्ही विषय द्या आम्ही वाद घालून दाखवतो. पहीला आक्षेप म्हणजे ही बालकविता जगप्रसिद्ध कशी ? तुम्ही स्वतःला काय समजता ? अहो पण ही कविता मी ज्या काळी लिहिली त्या काळी मराठी माणसाचे जग म्हणजे महाराष्ट्र! तेव्हा अशी लातूर ते लंडन, सातारा ते सिडनी आणि पुणे ते पोर्टलँड अशी मराठी माणसे पसरली नव्हती. आमचे जग म्हणजे. महाराष्ट्र, पुणे, शनिवारवाडा, आमची पेठ, आमची गल्ली , आमचा वाडा आणि शेवटी खुराडा क्रमांक झालं ! संभाजी पार्कात भेळ खाणार आणि भीमथडीच्या तट्टाणांना यमुनेचे पाणी पाजण्याच्या गप्पा फडके हौदापाशी करणार ! त्यातून पाठ्य पुस्तकात असल्याने ही कविता घरोघरी पोहचली होती.  तर मित्र हो हे झाले जग प्रसिद्ध असण्याचे लॉजिक, पण या कवितेच्या मॅजिकचं काय सांगू ? दुसरा आक्षेप म्हणजे जनी जर ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करते तर हे 'पप्पा' कसे काय ? अहो, पहिलीपासूनच इंग्रजी अनिवार्य करण्याच्या निर्णयाची ही मधुर फळे आहेत. ज्ञानेश्वरांनी मराठी महत्व सांगितले आणि सांप्रतकाळी तुकारामांच्या वंशजांनी सुवर्णमध्यसाधला आणि त्यामुळेच नऊवारी नेसलेली, ठसठसशीत कुंकवाचा टिळा लावलेली मम्मी आणि सदरा , धोतर आणि गांधी टोपी घातलेला जनीचा बा म्हणजे पप्पा गावोगावी दिसू लागले.  आणि मग, मरीआईच्या देवळात, म्हसोबाच्या पारावर , ज्वारीच्या खळ्यात, ऊसाच्या मळ्यात जनी आणि तिच्या पप्पाचा जो कवितारुपी संवाद रंगला तोच म्हणजेच माझी जगप्रसिद्ध ( अलबत !) कविता


जनीऽ जनीऽ काय पप्पा ?


काऽय पप्पा ?


साखर खातीस ?


नाऽय पप्पा


खोटं बोलतीस ?


नाऽय पप्पा


उघड तुजं त्वांड


हाऽ  हाऽ  हाऽ


मित्रहो हे केवळ भाषांतर नाही. शेवटची ओळ नीट, काळजीपूर्वक पहा  


हाऽ  हाऽ  हाऽ ! जॉनी आणि जनी दोघेही  हसताना  हाऽ  हाऽ  हाऽ असेच हसतात. खरे तर आपण मराठी लोक सहसा ही! ही !ही!  असे हसतो पण या ठीकाणी दोघे ही हाऽ  हाऽ  हाऽ हसताना दाखवल्यामुळे साऱ्या दुनियेतील निरागस बालकांना समान पातळीवर आणण्याचे कार्य हाऽ हा! म्हणता पार पडते आणि तेच या बालगीताचे यश होय.


अव्यवहारीपणा, आकर्षक  कल्पनांचे दुर्भिक्ष्य याचबरोबर तिसरे कारण आढळते ते म्हणजे लहान मुलांचा नसलेला सहभाग. मुलांना बालगीते म्हणताना जर सहभागी होता आले तर ती त्याचा आनंद अधिक घेऊ शकतात. तसेच त्यात जर त्यांच्यावर संस्कार केले तर उत्तमच. असेच एक बालगीत मी रचले


मधमाशी, मधमाशी काय करते ? 


आता या ठीकाणी आपण माणूस व्हावे व ल हान मुलाला मधमाशी करावे व प्रश्न विचारावे. तर असे हे बालगीत,


माणूस: मधमाशी, मधमाशी काऽय करते ? 


मधमाशी : रानातून मध आणते.


माणूस: मधमाशी, मधमाशी काऽय करते ? 


मधमाशी : पोळ्यामध्ये मध साठवते


माणूस: मधमाशी, मधमाशी काऽय करते ? 


मधमाशी : पिलांना मध पाजते.


माणूस: मधमाशी, मधमाशी काऽय करते ? 


मधमाशी : पोळ्याला वारा घालते.


माणूस: मधमाशी, मधमाशी काऽऽय करते ? 


मधमाशी: थांब !!! माणसा, माणसा काऽऽय करतोस ?


माणूस : अंऽऽऽ... नसत्या चौकश्या !


मधमाशी:  चल मग काढ आता ऊठाबशा !!!


 

या नंतर  लहान मुलांना ऊठाबशा काढून दाखवाव्यात.  लहान मुलांना सहसा माहीत नसणाऱ्या किटकाची माहीती, आपल्या ऊठाबशांचा व्यायाम आणी भावी शालेय जीवनात येणाऱ्या शिक्षेसाठी होणारी मुलांची मानसिक  तयारी असे अनेक पैलु अ सणारी ही परिपुर्ण बालकविता.

या क्रांतीकारी कार्याच्या  कार्याला न्याय मि ळाला आणि मला १४ नोव्हेंबरला बालदिनी ' साभिनय बालगीत' स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले गेले. क्रांतीचा विजय झाला. कार्य क्रमात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या बालिकेने चक्क माझेच मधमाशी, मधमाशी काय करते ?  हे बालगीत सादर केले आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. ती बक्षिस घ्यावयास आलेली बालिका मला चिमुकला देवदूतच भासली!


' बाळ छान हं ! कुणी शिकवले हे गाणे तुला? बाईंनी शिकवले का शाळेत ?' मी प्रेमाने विचारले.


'नाऽही ! हे गाणं मला माझ्या आईनी शिकवलं, हे गाणं माझ्या मामाचं आहे !!' चिमुकल्या देवदूताने उत्तर दिले.


'काऽऽ य ? बाळ नाव काय गं तुझं ?' मी आश्चर्याने विचारले


'माझं नाव चित्रा चिन्मय चित्रे , इयत्ता १ ली तुकडी, अ!!! 


' आँ ??? म्हणजे चित्र्यानं बाजी मारली तर ? प्रभु तेरी लीला अगाध है!' मी.


                                                 ..............अभिजित पापळकर