माणसे

मी शोधतोच आहे डोळ्यांत माणसांना
अन आणतोच आहे गोत्यात माणसांना

वस्तीस वाटले ती मतमोजणी असावी
मोजून चालले ते पैश्यात माणसांना

आता कधी , कुठेही लढण्यास सिध्द झालो
घेऊन हिंडतो मी भात्यात माणसांना

आश्चर्य काय ह्यांचे प्रतिबिंब स्वच्छ नाही
बघतात माणसे ही पाण्यात माणसांना

घेण्यास श्वास थोडी जागा हवी जिवाला
बांधायचे कशाला नात्यात माणसांना ?

त्यांच्यासवे असूनी माणूस राहिलो मी
मी टाकले असेही कोड्यात माणसांना

ओळख म्हणून उरली ही राख दंगलीची
मी स्पष्ट पाहिलेले पलित्यात माणसांना

दगडामध्येच होते दर्शन तुझे अताशा
कंटाळलास का रे इतक्यात माणसांना