प्रस्थान.......

अल्सास, फ्रान्समधील एक सकाळ. ढगाळ, कुंद वातावरणात मनात फक्त घरच्या आठवणी. दूरदूरपर्यंत माझी भाषा बोलणारं कुणीही नाही. एकांत, हुरहुर यांनी भरलेली ती उणे ७ अंशाची सकाळ. साऱ्या भावना गोठल्यासारख्या. एका मित्राची मेल येते. तो पत्ता देतो.काही तरी वाचले आणि थोड्याच वेळात उबदार वाटू लागले. त्याने दिलेला पत्ता होता 'मनोगत डॉट कॉम' आणि म्हणाला चल आपण सभासद होऊ या. मी म्हंटले अरे हो पण आपल्याला बोलावलयं कुठे ? तो काही तरी म्हणाला. एकदम पटले. मराठी भाषारुपी विठ्ठलाचं दर्शन उत्कर्षाच्या पंढरीत घेण्यासाठी प्रयत्नांच्या अनेक दिंड्या निघाल्या  होत्या, त्यातील एक दिंडी श्री. महेश वेलणकर यांची, नाव मनोगत !   


विठ्ठलाच्या दर्शनाची आंतरिक ओढ लागलेल्या माणसाचे पाय ज्या क्षणी पंढरीच्या वाटेवर पडतात त्याच क्षणी त्याचा वारकरी होतो आणि ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे, ज्यांचे मराठी भाषेवर प्रेम आहे तो मनोगती होतो. मी मनाने मनोगती होतोच पण सभासदत्व घेऊन औपचारिकता पुर्ण केली आणि मी  मनोगती झालो. माझ्या मनोगती होण्याला येथे वर्ष पुर्ण झाले. एक पुर्ण ऋतुचक्र मनोगताच्या सोबतीने पाहीले. दोघांचेही रंग विलोभनीयच होते. आज सिंहावलोकन करताना आनंद होतो.


  मनोगतावरील सदस्यांचा साहित्य, चर्चा,  कविता, वादविवाद, ते अगदी पाककृतीपर्यंतचा सहभाग हा प्रेरणादायी होता. एकाच विषयाचे अनेक पैलु, कंगोरे वेगवेगळ्या विचारांच्या माणसांमुळे दिसले. हे वैचारिक अभिसरण आनंददायी आणि मार्गदर्शक होते. मनोगताचे रुप हे क्लॅडिओस्कोपप्रमाणे सतत बदलणारे आणि प्रवाही आहे व ते तसेच रहावे.


 मनोगताचे महत्व मला जाणवते ते येथील शुद्ध मराठीचा आग्रह, नवीन शब्दनिर्मितीचे प्रयत्न, जुन्या वृत्तबद्धकवितांचे पुनरुज्जीवन, व्याकरणविषयक विचार आणि मराठीतून होणारे शास्त्रीय लिखाण पहातो तेव्हा. माझ्यासारख्या सोळा वर्षे मराठी लिखाण थांबवलेल्याला लिहावेसे वाटणे हेच या चळवळीचे मोठे यश आहे. ते असेच चालू द्यावे ही विनंती.


  दोन माणसे एकत्र आली की भांड्याला भांडे हे लागणारच ! आवाज होणारच. त्यातून  जर माणसे  मराठी असतील तर होणारच होणार. पण 'भांडण' या संल्पनेची गरजच मुळात फार कमी आहे, यासाठी फक्त दोन माणसे पुरे आहेत, आणि येथे तर शेकडो जण मत देणार असतील तर हे सहाजिकच आहे. पण त्यामुळे भांडण हा काही दोष ठरणार नाही. गळचेपी आणि आवाज दाबण्याच्या आजच्या काळात माझ्या मराठीचा आवाज बुलंदच झाला पाहीजे आणि तो होईलच यात शंका नाही. प्रत्येक समाजाचे काही अंगभूत गुणधर्म आहेत. मराठी समाजाने आपली आक्रमकता नेहमीच सकारात्मकपणे वापरली आहे याची ग्वाही ऐतिहासिक आणि सामाजिक दाखले देतीलच देतील. जगाला मुलायम चंदनउटी प्रिय आहे तर कठीण हिराही प्रिय आहे, मराठी समाज हिरा आहे !


    सकारात्मकता या गुणाचे अधिष्ठान लाभलेले प्रत्येक कार्य चांगलेच फळ देईल यात शंका नाही. त्यामुळे चर्चा, वाद-विवादातून काही नवे मार्ग , नवा विचार मिळेल का यावर विचार व्हायला हवा. अपेक्षा खुपच बोलून दाखवल्या आहेत  पण शेवटी हट्टही आपल्याच माणसांकडे करतात ना ?


   वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राची स्वतःची जगात एकमेव अशी ओळख! या दिंडीत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले याचा मला आनंद होतो. सर्व वारकरी एकमेकाला ओळखत नाहीत पण विठ्ठलप्रेमाचा, त्याच्या ओढीचा समान धागा त्या सर्वांना एकत्र बांधून ठेवतो त्याचप्रमाणे मराठी भाषेबद्दलचे प्रेम सर्व मनोगतींना एकत्र बांधून ठेवते. शेवटी काय मागावे ईश्वराकडे,


अखिल विश्वाचे कल्याण चिंतणारी पसायदानासारखी प्रार्थना ज्या भाषेत जन्मास आली ती मराठी भाषा,


छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी आणि नितीमान राजा ज्या संस्कृतीत जन्मास आला ती मराठी संस्कृती ,


राष्ट्राच्या प्रत्येक कठीण काळात आपल्या सर्व शक्तीनिशी राष्ट्राच्या पाठीशी उभे रहाणारे स्वाभिमानी मराठी तेज वर्धिष्णु होवो !


आज प्रस्थानाचा दिवस. आज ही दिंडी पुढे जात राहील व मी आहे तिथेच थांबेन. वारकरी लोक लहान मोठा आपला परका असा सारा भेद दूर सारुन एकमेकाच्या पाया पडतात. प्रत्येकात देवत्वाचा अंश असतो. प्रत्येकातील देवत्वाच्या त्या अंशाला केलेला तो प्रणाम असतो. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व मनोगतींना मी नमस्कार करतो. अनवधानाने काही चूका झाल्यास मनोगती मोठ्या मनाने क्षमा करतीलच.


  ज्ञानेश्वरीत एक दृष्टांत आहे कासवीण दुरूनच केवळ  प्रेमळ नजरेने आपल्या पिल्लांना वाढवते. दूर असलो म्हणून काय झाले मनोगतावरील ज्ञानाच्या, माहीतीच्या प्रेमाचा लाभ होतच राहील.


   परदेशातील आणि देशातील मराठी मनांच्या भावनांना मनोगताच्या रुपाने मूर्तरुप देणाऱ्या श्री. महेश वेलणकर यांचे आणि त्या मुर्तित प्राण फुंकणाऱ्या सर्व मनोगतींचे शतशः मन:पूर्वक आभार. मित्रहो, धन्यवाद !!!


                             (मनोगती) अभिजित पापळकर