सोने आणि वीट (झेन कथा)

नमस्कार,


     काही वर्षांपूर्वी, ओशोंच्या (बहुधा अनुवादीत 'अंतर्यात्रा') पुस्तकात वाचलेली झेन रूपक कथा, आठवेल तशी लिहीत आहे.


     एकदा एक तरुण संन्यासी प्रवास करीत असताना, त्याला असाच एक प्रवासासाठी बाहेर पडलेला संन्यासी भेटतो. दोघे एकमेकांना अभिवादन वगैरे करतात आणि पुढचा प्रवास एकत्र करायचा ठरवतात. दुसऱ्या संन्याशाच्या झोळीमध्ये काहीतरी जड वस्तू असते. तो ती झोळी सतत सांभाळतो आहे असे पहिल्या संन्याशाच्या लक्षात येते. रात्री झोपताना सुद्धा तो ती झोळी दूर ठेवायचा नाही. याचे पहिल्या संन्याशाला राहून राहून आश्चर्य वाटत राहते.


     त्यांचा प्रवास चालूच राहतो आणि पहिल्या संन्याशाला जाणवते की याचे जास्त अवधान त्या झोळीवरच आहे. एकदा सायंकाळी दोघे एका विहरीपाशी हातपाय धुवायला थांबतात आणि तीच संधी पाहून पहिला संन्यासी  त्याच्या झोळीत काय आहे ते पाहतो. त्यात एक सोन्याने भरलेली लहान पेटी असते. ती पेटी तो तिथेच टाकून देतो आणि एक त्या आकाराची वीट झोळीत ठेवतो.


     ते पुढे जायला निघतात, तर दुसरा म्हणतो,"आता संध्याकाळ झाली आहे आणि पुढे जंगल आहे. चोराचिलटांची भीती आहे आपण येथे कुठेतरी मुक्काम करू." त्यावर पहिला संन्यासी म्हणतो,"अरे आपण संन्यासी! आपल्याला काय फरक पडतो?" फार आग्रह केल्यावर शेवटी दुसरा जंगलातून पुढे जायला तयार होतो. जंगलात रात्री मुक्काम करताना तो झोळी अगदी स्वतःच्या जवळ ठेवून झोपतो. अधुनमधुन चाचपून खात्री करून घेत असतो.


     दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला संन्यासी  त्याला, झोळीची इतकी काळजी का वाटते ते विचारतो. त्यावर तो सांगतो की त्यात सोने भरलेले एक पेटी आहे आणि तो ती पेटी जपत आहे. काय जाणो संन्यासी असलो तरी कधीकाळी ते सोने उपयोगाला येईल? त्यावर पहिला संन्यासी म्हणतो,"अरे सोन्याचा मोह आपण का ठेवावा? आणि तसेही तू काल सायंकाळपासून जे वागवतो आहेस, इतक्या काळजीने जे सांभाळतो आहेस, ज्यापायी तू रात्रीची झोप निवांतपणे घेऊ शकला नाहीस, ते सोने नसून एक वीट आहे. पाहा."


--- लिखाळ.


---------------------------------------------------------------------------------------------


     वरील कथा मी जेव्हा वाचली तेंव्हा माझ्यावर तिचा फारच परिणाम झाला. मला ती गोष्ट वाचून असे जाणवले की सोने म्हणून इतके दिवस जवळ बाळगलेले असे बरेच काही आपल्याकडे असू शकेल, की जे जपण्यासाठी आपण जीवापाड धडपडतो, खूप मानसिक ऊर्जा त्यापायी व्यस्त करतो, जे वास्तवात सोने नसून बदललेल्या परिस्थितीमध्ये मातीच असू शकेल. आपण थोड्या थोड्या अंतराने आपल्याला तपासून पाहणे, आपले 'पान रिफ्रेश' करणे हेच हितावह आहे. वर्तमानात जगण्याचा जो उपदेश आपल्याला तत्त्वज्ञ देत असतात, त्याकडे जाण्याचा हा एक चांगला उपायच आहे असे मला वाटले.
आपल्याला काय वाटले?


आपलाच,
--  लिखाळ.