समर्थांचे पत्र

 नमस्कार मंडळी ,


समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले एक पत्र इथे देत आहे. त्या काळी कौटुंबिक पत्रे परिचयाच्या माणसांबरोबर पत्र पाठवली जात असत पण  राजदरबाराची पत्रे पोहोचवण्या साठी स्वतंत्र सांडणी स्वार किंवा घोडेस्वार असत. राजदरबारची पत्रे शत्रुपक्ष त्या स्वारांना अडवून वाचत असावेत अथवा नष्ट करीत असावेत, यावर उपाय म्हणून काही सांकेतिक भाषा वा खुणा असलेली पत्रे लिहिली जात. अशाच प्रकारचे हे एक समर्थांचे पत्र आहे.(सन १६५९ ) यात अफजल खान निघाला असल्याची 'सूचना' आहे,


          ।  जय जय रघुवीर समर्थ  ।


विवेके करावे कार्य साधन । जाणार नरतनू हे जाणोन ।
पूडील भविष्यार्थी मन । रहाटेचि नये  ।
चालु नये असन्मार्गी । सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीरकृपा ते प्रसंगी । दासमहात्म्य वाढवी ।
रजनीनाथ आणि दिनकर । नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार । लाविले भ्रमण जगदिशे ।
आदिमाया मूळभवानी । हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ।


या  पत्रातील प्रत्येक ओवीतील आद्याक्षरं वाचल्यास,
" विजापूरचा सरदार  निघाला आहे " 
ही सूचना कळते.  या नंतर शिवाजी महाराज अफझल खानाच्या भेटीस निघाल्याचे कळल्यावर कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी याबद्दलचे पत्र पुढील भागात पाहूया ....    


अजय 


 


 


( हे पत्र श्री. सुनील चिंचोळकर यांच्या "पत्र समर्थांची" या पुस्तकातून .)