जबलपुरी मराठी भाषेचे नमुने

जबलपूरला असताना आमच्या समोर राहणाऱ्या दीप्तीला मी म्हटलं,
"ये ना एकदा आमच्याकडे."
त्यावर ती हसून म्हणाली,
"मावशी, मी सोचतच होते तुझ्याकडे येण्याचं." (विचार करतच होते.)
असंच एकदा शेजारची छोटी पिंकी धावत आली अन् म्हणाली,
" काकू, देखो ना पेड़वरती किती ढेर सारे तोते बसलेत."
एकदा माझी पुतणी वय वर्षं आठ रडत होती. मी विचारलं,
"मधुरा, काय झालं, गं? का रडतेस?"
रडत रडत ती म्हणाली,
"बाबा मला पिटतील नं!"
"काका मारतील?"
"बाबांनी मला हा लेसन लर्न करून ठेवायला सांगितला होता; पण मी काय करू? यादच होत नाहीये."
एखादा अठरा-एकोणीस वर्षांचा मुलगा वाटेत भेटला अन् त्याला विचारलं,
"का रे विकास, इकडे कुणीकडे?"
तर उत्तर मिळेल,
"मी आपल्या दोस्ताकडे पुस्तक वापस करायला गेलो होतो."
वरताण म्हणजे, पुस्तकांचं अनेकवचन 'पुस्तकं' असं न करता आजकालची मुलं 'पुस्तका' म्हणतात.
"पुस्तका आणायच्या आहेत नं, बाबा, पैसे द्या!" असं म्हणतील.
गहू दळवायला निघालेल्या प्रवीणला "कुठं जातोय?" म्हणून विचारा. तो सांगेल,
"आटा अन् बेसन चक्कीवरून पिसऊन आणायला चाललोय्."
अर्थात तरुण पिढीच इतकं भयंकर मराठी बोलतेय्, असं नव्हे. तर जुन्या पिढीची परिस्थिती पण तितकीच चिंतनीय आहे. बऱ्याच स्त्रियांच्या तोंडून, "कचऱ्या धूऱ्यावर फेकून ये," "आटा खतम झालाय्" किंवा "बेसन दळवायचंय्" असे शब्दप्रयोग सहज ऐकू येतील. आपल्या बोलण्यात काहीतरी चुकतंय्, याची त्यांना जाणीव पण नाही, इतके हे हिंदी शब्द तोंडात फिट्ट बसलेत. आट्याकरता 'कणीक' हा मराठी शब्द निदान या बायकांना माहीत आहे - फक्त चुकीनं वा सवयीनं त्या 'आटा' हा शब्द वापरतात. पण बेसनाला मराठीत 'चण्याच्या डाळीचं पीठ' म्हणतात, हे तर अधिकांश बायकांना माहीत नसतं.
पुरुषांच्या तोंडची मराठी भाषा ऐकली, तर स्त्रियांची भाषा बरी होती, असं म्हणायची पाळी येते. एखादा नवरा सहज बोलताना, "का, ग! ह्या लोट्याला जंग कसा लागला?" असा प्रश्न विचारतो, तेव्हा काहीतरी चुकतंय्, असं त्यांच्या लक्षात देखील येत नाही.
सर्वसामान्य पुरुषच नव्हे, तर स्टेजवरून बोलताना एखादा मान्यवर वक्तासुद्धा, "आपण मला बोलायचा मौका दिला, त्याबद्दल मी आभारी आहे" असं बिनदिक्कत बोलून जातो. अन् वक्ता जर वीस-बावीस वर्षांचा सुनील असेल, तर विचारायलाच नको. तो तर, " आपण मला बोलायचा मौका दिला त्याबद्दल मी आपला कृतग्य (कृतज्ञ) आहे", असं म्हणेल.
तर हे झाले जबलपुरी मराठी भाषेचे नमुने.



[जबलपुरी मराठी भाषेचे नमुने दाखवणारा हा उतारा 'मध्यप्रदेशातील मराठी भाषा' ह्या गीता सप्रे ह्यांच्या भाषा आणि जीवन ह्या नियतकालिकातल्या लेखातून (अंक १: हिवाळा १९९०) घेतला आहे.]