साज

सूर नाही साज नाही काय गावे?
मी तुला आता नव्याने काय द्यावे?


ऐकते तू जे कधी ना बोललो मी;
सांग आता काय मी याला म्हणावे?


चाहुलींचा माग मी सोडून देता;
तू पुन्हा का पैंजणांना वाजवावे?


ही कटाक्षांना तुझ्या माझी विनंती;
काळजाचा वेध घेणे थांबवावे!


एकट्याने जागण्याचा छंद जडता-
चांदण्या रात्री मला भेटून जावे!