आहारशास्त्र

सर्व मनोगतींनू,


नुकतीच आहारशास्त्रावरील काही पुस्तके वाचली, काही लेख वाचनात आले... माझ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये काम करताना, "Prevention is better than cure" हे माझे ब्रीदवाक्य असते. परंतु ही पुस्तके, हे लेख वाचल्यावर असे लक्षात आले की "आहार" या अतिशय महत्वाच्या बाबतीतच आपण अतिशय निष्काळजीपणा करत आहोत. सर्वसाधारणपणे आपला, जोपर्यंत आजार होत नाही तोपर्यंत विषेश काळजी न करण्याकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कल असतो. तसेच आजार झाला की आपण "औषधे" घेतो.


पण मुळात हा आजार मला झालाच का? याचा विचार कोणी करतं का? बर केला तर त्याचा पाठपुरावा करतं का? साधारणतः "अरे या दिवसात असं होतंच.", "थंडी आहे ना.. मग सर्दी होणारच" किंवा "माझ्या वडिलांनाही असाच त्रास होतो, त्यामुळे मलाही होणारच त्याला इलाज नाही" असे बोल कानी पडतात. मग त्यावर एखादी "क्रोसिन" घेतली जाते, आणि आजार दाबला जातो.


लहानपणी आपण जीवशास्त्राच्या पुस्तकातील जीवनसत्वे, खनिजे वगैरे गोष्टी "परिक्षेत लिहीण्यापुरत्या" पाठ केलेल्या असतात. पण त्याचा आपल्या जीवनात आपण कधीच गंभीरपणे वापर करत नाही. हे टाळले पाहीजे...


मी वाचलेल्या एका पुस्तकामध्ये ही जीवनसत्वे, खनिजे, त्यांचे उपयोग आणि ती कशातून मिळतात याचा एक छान तक्ता मला मिळाला. सर्व मनोगतींसाठी तो मी इथे देत आहे...


यावर जर काही चर्चा झाली तर सर्वांचे अनुभव, जाणकारांचे विचार आपणास ऐकावयास मिळतीलच.











































































































जीवनसत्वे
उपयोग कशातून मिळते
अ(A) प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी
ब१(B1) पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस
ब२(B2) मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध
ब३(B3) कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट
ब५(B5) शरीरातील शक्ती वाढवते धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक
ब६(B6) प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया
ब१२(B12) पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ
फॉलिक ऍसिड लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते)  गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस
क(C) प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी...) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे
ड(D) कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक
इ(E) रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा
फ(F) कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते दाणे, काजू
के(K) रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. (गर्भवतीला शेवटच्या महिन्यात अतिशय उपयुक्त) यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक

खनिजे

लोह सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते, पेशींमधील महत्वाच्या कार्यांना चालना देते (गर्भवतीस अतिशय आवश्यक) चेरीचा रस, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, पुर्ण धान्य, सुकामेवा, कलिंगड, अंड्यातील पिवळा बलक, बीट
कॅल्शियम हाडांच्या व दातांच्या जडणघडणीसाठी आवश्यक, मज्जातंतू तसेच स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवते दूध, गडद हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, संत्री, पपई, कलिंगड, गाजर
फॉस्फरस कॅल्शियम, तसेच ड जीवनसत्वाच्या कार्यात मदत करते, उत्तम हाडांसाठी आवश्यक, शरीरातील ग्रंथींच्या कार्यासाठी आवश्यक दुग्धजन्य पदार्थ, पूर्णं धांन्ये, धान्याचे मोड, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, काजू, बदाम
पोटॅशियम स्नायुंचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक, शरिरात सोडीयम ची आवश्यक पातळी कायम ठेवते केळी, खजूर, पपई, धान्याचे मोड, पालेभाज्या
मॅग्नेशियम प्रथिनांच्या पचनास, तसेच चरबीच्या वापरात मदत करते, कॅल्शियमची आवश्यक पातळी कायम ठेवते, तणावापासून मुक्ती देते हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, दुग्धजन्य पदार्थ
झिंक उत्तम वाढीसाठी, मेंदू आणि चेतासंस्था निर्मितीस सहाय्यक, आजार लवकर बरे करते. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक)  केळी, पुर्ण धान्ये, काजू, बदाम, धान्याचे मोड, दुग्धजन्य पदार्थ

एक नमूद करतो की, मी ह्या विषयातील जाणकार नाही, एक "संग्राहक" या नात्याने वरिल माहीती मी येथे दिली आहे. यात चुका, सुधारणा असतील तर त्या जरुर सांगाव्या.


ही माहिती वाचून आपला आहार सुधारुन जर कोणी होणारा आजार टाळू शकले तर त्यातच या लेखाचे यश सामावलेले आहे.


( दक्ष ) अमित चितळे