गोडाचा शिरा

  • १ वाटी रवा (बारीक अथवा जाड)
  • साजूक तूप ६ चमचे
  • साखर पाऊण वाटी
  • थोडासा गूळ
  • २ वाट्या पाणी
१५ मिनिटे
२ जणांना

मध्यम आचेवर रवा व तूप कढईत एकत्रित करून तांबूस रंग येईपर्यंत भाजणे. भाजून झाल्यावर त्यात दुप्पट पाणी घालून ढवळणे.  नंतर त्यावर झाकण ठेवून १०-१२ सेकंदाने झाकण काढून मिश्रण ढवळणे. नंतर त्यात साखर व थोडासा गूळ घालून परत ढवळणे. हे मिश्रण आता थोडे पातळ होईल. ढवळल्यावर परत झाकण ठेवून १०-१२ सेकंदाने झाकण काढून परत ढवळणे. झाला तयार गोडाचा शिरा.

ज्या वाटीने रवा घेतला असेल त्याच वाटीने पाणी व साखर घेणे. गुळाने खमंगपणा येतो. पूर्ण गुळ घालून पण छान लागतो. अर्धी साखर व अर्धा गूळ घालून पण छान लागतो. खूप गोड हवा असल्यास १ वाटी पूर्ण साखर घेणे. अगोड हवा असल्यास चमच्याने साखर मोजून घेणे. १ वाटीला ८-१० चमचे. यात चमचा आपण पोहे-शिरा ज्याने खातो तो वापरणे.

तूपाचे प्रमाण वर दिले आहे त्याप्रमाणे कमी-जास्त घेणे. रवा तूपामध्ये पूर्णपणे भिजला पाहिजे. म्हणून रवा भाजता भाजता एकीकडे तूप घातले एक-एक चमचा करत तर तूपाचा अंदाज येईल.  तूप जास्त झाले तरी चालेल. कमी नको. रवाही व्यवस्थित तांबूस रंग येईपर्यंत भाजणे नाहीतर कच्चा लागतो. दुप्पट पाणी घातल्याने मोकळा होतो. पहिल्यांदाच शिरा करत असाल तर तो पूर्ण साखरेचाच करा.

रोहिणी

ह्याबरोबर आंब्याचे लोणचे व पोह्यांचा भाजलेला पापड छान लागतो.

माझ्या सासूबाई (सौ वहिनी)