पारिजात

कालचे वादे फुलांनी पाळले होते
हात माझे मोगर्‍याने जाळले होते!

सांत्वनासाठीच भेटायास ती आली;
पण अबोलीला तिने कवटाळले होते!

एवढे गोंजारले मजला गुलाबाने;
अंग सारे शेवटी रक्ताळले होते!

मी निरोपाच्या क्षणीही हासलो होतो!
अन फुलांचे ताटवे ओशाळले होते!!

शापितागत जन्मलो, जगलो असा येथे
पारिजाताने जरी सांभाळले होते...!