बक्षिससमारंभाचे प्रमुख पाहुणे

चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस समारंभात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मान्यवर भारतीय मुख्य अतिथींबरोबर दुर्व्यवहार केल्याची दुःखद व तापदायक बातमी वाचून मनांत एक विचार आला. तो स्पष्ट करण्यासाठी एक जुनी आठवण देत आहे.


शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणाऱ्या एका स्थानिक संस्थेच्या वार्षिक समारंभाला मी दरवर्षी एक चाहता व प्रेक्षक किंवा श्रोता म्हणून हजेरी लावतो. या वेळी वेगवेगळ्या वर्गांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या गायनाची चुणूक दाखवणारा छोटासा कार्यक्रम करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना प्रमाणपत्रे देतात. हळूच डुलक्या घेतांना किंवा चुकीच्या जागी दाद देतांना उगाच पकडले जाऊ नये म्हणून शेवटच्या रांगेत बसण्याची काळजी मी नेहमी घेतो. तरीसुद्धा एका वर्षी आयत्या वेळी माझे नांव पुकारून मला प्रमाणपत्रे वाटण्यासाठी मंचावर पाचारण करण्यात आले. इतकेच नव्हे तर शेजारी बसलेल्या सद्गृहस्थाने मला हांत धरून उठवले. त्यामुळे पुढे होण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.


खरे तर मी प्रारंभिक परीक्षासुद्धा दिलेली नव्हती आणि त्यातसुद्धा उत्तीर्ण झालो असतो की नाही याची शंकाच होती. पण एक दोन पासून सात आठ वर्षांपर्यंत तपश्चर्या करून परीक्षा पास झालेली मुलेसुली क्रमाक्रमाने येत होती, भारतीय परंपरेप्रमाणे माझ्या पाया पडून माझ्या हस्ते प्रमाणपत्र घेऊन हंसल्यासारखे करून जात होती. मला मात्र भयंकर अवघडल्यासारखे झाले होते. माझे वय व वरिष्ठ हुद्दा बघून मला तेथे बोलावले असणार हे उघड होते. संस्थेच्या संचालक मंडळींना माझ्याबद्दल आदरसुद्धा वाटत असेल. पण ज्यांना मी प्रमाणपत्रे देत होतो त्यांना मनातून काय वाटत असेल? त्यांत कितपत आदरभावना असेल? अमक्या अमक्या गृहस्थांच्या हस्ते मला हे प्रमाणपत्र मिळाले हे ते लक्षांत ठेवतील कां? अभिमानाने कुणाला सांगतील कां? हे प्रश्न विचारायचा धीर मला झाला नाही.


एखाद्या बक्षिससमारंभाला प्रमुख पाहुणा ठरवतांना ज्यांचा गौरव करावयाचा असतो त्यांना त्या पाहुण्याबद्दल आदर वाटण्यासारखे त्याचे कर्तृत्व असायला हवे असे मला वाटते. यावर आपले मत काय आहे?