इंग्लिशाळलेले मऱाठी : काही उपाय?

माझाही वन बीएचके फ्लॅट आहे. (डिकोड : वन बेडरूम हॉल किचन) मी शंभर टक्के मराठी आहे; पण माझा फ्लॅट तो मात्र जवळ जवळ शंभर टक्के इंग्लिशाळलेला आहे. अरब आणि उंट या कथेमधल्या उंटाप्रमाणे इंग्लिशच्या उंटांनं "मराठी अरबा'ला फ्लॅटला घराबाहेर काढलं आहे. शेगडी चूल जाऊन गॅस आला. गॅस म्हटलं, की सिलिंडर आला. पेटवायला लायटर पाठोपाठ तयार. उजेडासाठी ट्यूब, बल्ब, नाइट लॅम्प, बंद-सुरूसाठी ऑफ-ऑन, ट्यूबची नातेवाईक मंडळी चोक, स्टार्टर, वायर, स्विच. ही नातेवाईक मंडळी एकजात इंग्लिश.


हल्ली जुन्या शब्दांना प्रतिष्ठा देण्याचे दिवस आहेत. कारकुनाला असिस्टंट किंवा कलीग म्हणतात. शिपायला हवालदार म्हणतात; पूर्वी जॉब सीनमध्ये काम करणाऱ्या सिनेमातल्या लोकांना "एक्‍स्ट्रा' म्हटले जात असे, आता त्यांना "ज्युनिअर आर्टिस्ट' असं प्रमोशन मिळालं आहे. वर्तमानपत्राचे गावोगावचे बातमीदार "पत्रकार-जर्नालिस्ट' झाले आहेत. प्राथमिक शाळेतले शिक्षकसुद्धा "सर' झाले आहेत. तसंच फ्लॅटचं आहे. पूर्वी ज्याला ब्लॉक म्हटलं जात असे त्याला हल्ली "फ्लॅट' हाच शब्द रूढ झाला आहे.

स्वयंपाकघर इंग्रजांच्या काळात होतं. आता "किचन' हा सोपा "मराठी' शब्द रूढ झाला आहे. न्हाणीघर, संडास, शीः। टॉयलेट-बाथरूम म्हटलं की कसं चकाचक वाटतं. तिथंही कॉक, रूटॉप कॉक, शॉवर, बाथ, ड्रम, बेसिन, सोप, सोप-केस, डिटर्जंट पावडर, रॉड, हूक, टब, टॉवेल, बकेट, ट्यूब आहे. आमच्या हॉलमध्ये टेबल, टी पॉय, स्टॅंड, रॅक, वॉलब्लॉक, टेलिफोन, डिरेक्‍टरी, फॅन, सोफा सेट, कर्टन्स, शो केस, स्टील कबर्ड, वॉर्डरोब, हॅंगर, शर्ट, बुश-शर्ट, पॅंट, अंडरवेअर, पेन, बॉलपेन, पेन्सिल, इरेझर, पंचिग मशीन, स्टेपलर, क्‍लिप्स, पिन्स, सेफ्टी पिन्स, पेपर, कार्बन पेपर, फाईल, फेविकॉल, रबरबॅंड, टेप, स्टॅंप्स, स्टिकर, मॅगेझिन, डेली पेपर, फोटे, स्क्रू, सेलोफोन, टेप, पेन्सिल शार्पनर, कटर, ट्रे आणि आणखी काही नाही. तिथून मुक्काम पोस्ट झोपायची खोली. इंग्रज होते तोपर्यंत ही खोली झोपायचीच खोली होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती बेडरूम झाली. तिथंही कॉट, ब्लॅंकेट, बेडशिट, रग, नाइट लॅम्प, नायसिल पावडर वगैरे वगैरे इंग्लिश शब्दांनी "हाउस-फुल्ललेला' आमचा फ्लॅट आहे. मायबोली हा शब्दसुद्धा ५० टक्के इंग्रजाळलेला असतो. असा चध बोली. तरीही मी मराठी माणूस आहे असं माझी तीस-बत्तीस इंची छाती फुगवून सांगतो. दारालासुद्धा कॉलबेल, लॅच, हॅंडल, बोल्ट, लेटर बॉक्‍स एवढी इंग्लिश मंडळी लटकलेली असतात, आमच्या

फ्लॅटचा टोटल एरिया ६५० रुपये स्क्वेअर फूट या रेटने पडला. फ्लॅट फर्स्ट फ्लोअरवर आहे.

आता सांगितलेल्या लिस्टात आणखी काही वस्तूंची भर घालतो. रेझर, ब्लेड, सेव्हिंग क्रीम, ब्रश, टूथ पेस्ट, टूथब्रश, व्हॅसलिन, नेल पेंट, लिपस्टिक, फेस पावडर, हेअर आईल, नॅपकीन, कार्ड, लेटर बॉक्‍स, ग्लास, ब्राऊन पेपर, ड्रॉइंग पेपर, व्हिजिटिंग कार्ड, पास, बिल, कॅश मेमो, टाइल्स, व्हेंटिलेटर, एक्‍झॉस्ट फॅन, हूक बॉक्‍स, पॅकेट, ब्रेड, सॅंडविज, जॅम, बटर, प्लेट, बाउल, टोस्ट, टाइम टेबल, वॉटर बॅग, रेशन कार्ड, मिक्‍सर, टीव्ही, रेडिओ, मोबाईल फोन, क्रीम, हॅंगर, ब्लाउज, पेटिकोट, स्कर्ट, टी शर्ट, फ्रॉक, गाउन तोबा! तोबा! तोबा! ६५० चौरस फुटांच्या फ्लॅटमध्ये डबा पालथा केल्यावर आतील पदार्थ भसाभसा खाली पडतात. त्याच चालीवर इंग्लिश डिक्‍शनरी आमच्या फ्लॅटमध्ये पालथी केली गेली आहे. स्वतः इंग्लिश "डिक्‍शनरी काकूंनीच' हे सत्कार्य केल्यामुळे एवढे प्रचंड इंग्लिश शब्दभांडार आमच्या फ्लॅटमध्ये सुखेनैव नांदते.

विशेष म्हणजे या सर्व गोष्टी, वस्तू अचेतन आहेत. याच ६५० स्क्वेअर फुटांच्या फ्लॅटमध्ये डॅडी म्हणजे मी स्वतः ममी म्हणजे माय वाईफ, पिंकी माय ओल्डर सन, विकी नंबर टू सन, टिंकी माय डॉटर. पूर्वी आमच्या घरात आजोबा आजी पिढ्यान्‌ पिढ्या ईहलोकातच राहात होत्या. पण त्यांनाही इंग्लिश शब्दांनी तडीपार करून टाकलं. डायरेक्‍ट हे शब्द कै. वासी, वै. वासी. स्व. वासी झाले. याशिवाय अंकल-आँटी ही जोडीही आली. थोडक्‍यात काय तर आम्ही आणि आमचे नातेवाईक पूर्णपणे इंग्लिशाळलेले आहोत. काका म्हणून हाक मारली तर सख्खे अंकल मागं वळून बघणार नाहीत. एकदा चुकून माझ्या मुलीनं कुणाचं तरी ऐकून "आई' म्हणून हाक मारली होती. ""आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक ऐकूनही मम्मी वळे न मागे.'' कशी काय वळणार? ती मम्मी होती. आई थोडीच होती? मी लहानपणी वडिलांना बाबा म्हणत होतो. पण बाबांबरोबरच हा "बाबा'ही कै. वासी झाला आणि डॅडी म्हणून मी माझ्या मुलांसाठी जन्माला आलो.

चटकन मराठी शब्द न आठवण्याची आणि तितक्‍याच चटकन इंग्लिश शब्द आठवण्याची गोड सवय आम्ही सर्वांनी लावून घेतली. त्यामुळे गोंधळ होतो पण इंग्लिशाळायचंच म्हटल्यावर हे सहन केलंच पाहिजे. ""एक होता राजा अँड एक होती..... एक होती.... काही केल्या पुढच्या राणी हा शब्द आठवेना. डॅडी मुलांना बेड टाइम स्टोरी सांगत होते. शेवटी त्यांनी काय केलं, ""एक होता राजा अँड एक होती राजी'' असा राणीला पर्यायी शब्द तयार केला. घरातल्या सर्वांना कौतुक वाटलं. डॅडी मराठी बोलताना किती छान छान अडखळतात याचं. असला गोड सोहळा नेहमी होत असतो. डॅडींचा मुलगा वय वर्षे आठ, मुक्काम पोस्ट इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट स्कूल, आपल्या फ्रेंडला म्हणाला, ""वेट हं, मी बेसनचा स्वीट बॉल खाऊन अँड वॉटर ड्रिंक करून येतो. देन आपण प्लेग्राउंडवर फुटबॉल प्ले करू.''

प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीपासून इंग्लिश शिकवलं की मुलगा पुढं फाडफाड ऑक्‍सफर्ड इंग्लिश बोलतो आणि तसं नाही केलं तर त्याला "बेलफोर्ड' इंग्लिशसुद्धा येणार नाही या काळजीनं पोलिओच्या डोसाप्रमाणे इंग्लिश शब्दांचे डोस पाजणं आवश्‍यक आहे, असं अधिकृतरीत्या ठरवण्यात आलं. मग काय, इंग्लिश शब्दांनी मराठी शब्दांवर कुर-"मिसेस हॉर्स' (कुर-घोडी) केली. ""मम्मी, टीमध्ये शुगर पुट करायला यू फरगेट झालीस.'' (मराठीसहित इंग्लिश आणि इंग्लिशसहित मराठी दोघींचीही जॉइंट ऐशी की तैशी) एक शिक्षणतज्ज्ञ रामकृष्ण यांच्या मताप्रमाणे इयत्ता पहिलीपासून इंग्लिश सुरू झालं. इंग्लिश उत्तम यायला हा "रामबाण' उपाय नसून, "रामकृष्ण' उपाय आहे.

आमच्या फ्लॅटमध्येही हेच आहे. "केक-कॅंडल- हॅपी बर्थ डे'चा सुळसुळाट आमच्याही फ्लॅटमध्ये झाला आहे. औक्षण वगैरे को मारो गोली हे आम्ही कधीच करून टाकलं आहे. पूर्वी आम्ही न्हाणीघरात अंघोळ करत होतो पण हल्ली आम्ही इंग्लिशचा वसा घेतल्यामुळे बाथरूममध्ये बाथ घेत असतो. पूर्वीची तोंड खंगाळण्याची जागा फ्रेश होणं, वॉश घेणं यांनी घेतली. राखुंडीनं दात घासणं मागंच खलास झालं. त्यास कै. होऊनही ५० वर्षे झाली. टूथब्रशनं आणि टूथ पेस्टनं त्या जागेचा चार्ज घेतला आहे. दिसला मराठी शब्द की लगाव दणका हे आमच्या फ्लॅटचं धोरण आहे. एक जानेवारीलाच आम्ही खरा न्यू इयर्स डे म्हणतो. पाठोपाठ "हॅपी न्यू इयर्स डे' म्हणतो. आमचा "स'चा "श' उच्चार करणारा बंगाली मित्र आम्हालाही ""शेम टू यू'' म्हणतो. गुढी पाडव्याला "हिंदू न्यू इअर्स डे' म्हणतो. दिवाळीला "फेस्टिव्हल ऑफ लॅंप्स' म्हणतो. एकादशीच्या उपवासाला "इलेवन्थ डे फास्ट' म्हणतो. संतांनासुद्धा आम्ही आमच्या फ्लॅटमध्ये इंग्लिशाळून टाकलं आहे. मूळ नावं गावंढळ वाटू नयेत म्हणून तसं करून टाकलं. संत ज्ञानेश्‍वरांना आम्ही सेंट डी. व्ही. कुलकर्णी केलं. संत तुकारामांना सेंट टी. बी. अंबिले केलं. समर्थ रामदास एन. एस. ठोसर झाले. संत नामदेव शिंपी एन. डी. टेलर झाले. इतकं सगळं केलं तरच घराला इंग्लिशपण येतं. (चाल : "घराला घरपण येतं''ची)

पूर्वी गवळी दूध देत होता. हल्ली हा गावंढळ मराठी गवळी बाजूला सारून, ""मिल्क सेंटरवरून प्लॅस्टिकच्या मिल्क बॅग'' आम्ही आणत असतो. घरी आणल्यावर सीझर्सने प्लॅस्टिक बॅग कट करतो आणि त्यातलं दूध स्टेनलेस स्टीलच्या व्हेसलमध्ये ओतून गॅसवर ठेवते. ते बॉइल झालं की आम्ही गॅस ऑफ करतो. डायनिंग टेबलशी चेअरवर बसून आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट घेतो; नंतर लंच तिथंच घेतो, पूर्वी पाट-ताट होतं हल्ली आम्ही कंप्लिट क्रोकरी सेट आणला आहे. त्यात मील घेतलं म्हणजे कसं इंग्लिश-इंग्लिश वाटतं.

आमची मॉर्निंगच इंग्लिश पद्धतीनं सुरू होते. लहानपणी मी "कराग्रे वसते लक्ष्मी' म्हणत असल्याचं पुसट आठवतं. ते आता आउटडेटेड झालं. आम्ही सर्वजण उठल्याबरोबर एकमेकांना गुडमॉर्निंग, गुडमॉर्निंग, गुडमॉर्निंग म्हणतो. रात्री गुडनाइट म्हणून झोपते. लहानपणी झोपताना, ""आकल्प आयुष्य व्हावे तथा कुळा'' हा अभंग म्हणून झोपत असे. हल्ली असलं काही नाही म्हणून चालत नाही. दिवसभर (इनक्‍ल्युडिंग नाइट) आमच्या तोंडी, थॅंक्‍यू आणि सॉरी सतत असतं. इंग्लिश मॅनर्स आणि एटिकेट्‌स पाळल्या पाहिजेत. म्हणून आम्ही स्टेनलेस स्टीलच्या एका डब्यात "थॅंक्‍यू' गच्च भरून ठेवतो आणि दुसऱ्या डब्यात "सॉरी' काठोकाठ भरून ठेवतो. रात्रीच गुड नाइट म्हणून झोपेपर्यंत दोन्ही डबे रकामे होतात. इंग्लिश मॅनर्स पाळायचे म्हटल्यावर डबाभर थॅंक्‍यू आणि डबाभर सॉरी एव्हरी डे लागतात. एखादा माणूस, मित्र तास दोन तास आम्हाला बोअर बोअर बोअर करून गेला तरी जाताना सफाईदारपणे खोटं बोलून हसत हसत म्हणतो, ""इन युवर कंपनी एंटायर प्लेअर वॉज माईन.'' एकदा का इंग्लिशचं व्रत घेतलं, वसा घेतला, अनुग्रह घेतला, की सफाईदारपणे खोटं बोलण्याची प्रॅक्‍टिस सतत चालूच ठेवावी लागते. आम्ही आणि आमचा ६५० चौ. फुटांचा फ्लॅट तुम्हाला सॅल्युट करत आहे.


(सकाळ)