लोकल आणि सुरक्षा

मटा मधील बातमी 

सुरक्षेचा मेगाब्लॉक!


लांबचलांब रांगा, गोंधळाचे वातावरण, बीप-बीपची सेकंदा-सेकंदाला गुंज, घरी जाण्याची ओढ लागलेल्या हजारो प्रवाशांच्या अनावर लोंढ्याला तोंड देतारे हतबल पोलिस असा सावळागोंधळ सोमवारी सायंकाळी चर्चगेट स्टेशनवर अवतरला. ही होती पश्चिम रेल्वेची खास तपासणीमोहीम.


लोकल पकडायला चर्चगेटला आलेल्या मुंबैकरांच्या हा सोमवार कायम स्मरणात राहील. मेटल डिटेक्टर, एक्स-रे मशीन्स, तीनशे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अशा तयारीने प्रत्येकाची तपासणी करणारी ही पहिलीच मोहीम गोंधळात सापडली. त्याचवेळी अशी व्यक्तिगत तपासणी शक्य नसल्याचा अहवाल रेल्वेच्या उच्चस्तरीय दिला आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस ही मोहीम कशी पार पडते, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


जुलैमधल्या बॉम्बस्फोटानंतर स्टेशनांवर प्रवाशाची तपासणी करता येईल का; हा विचार पुढे आला. त्यातून प्रयोग म्हणून रविवारपासून चार दिवस चर्चगेट, सीएसटीसाठी मोहीम आखली गेली. रविवारी गर्दी नसल्याने प्रश्न आला नाही. परंतु सोमवारी सायंकाळी पाचला सुरू झालेल्या मोहिमेचा 'निकाल' पंधरा-वीस मिनिटांत दिसू लागला. 'ये क्या नाटक है', 'आपली ट्रेन गेली रे', 'रेल्वेच्या अकलेचे दिवाळे निघालेय' अशा प्रतिक्रिया प्रवासी देत होते. वृत्तपत्रांमुळे मोहिमेची माहिती असली तरी एवढा गोंधळ उडेल, याची प्रवाशांना कल्पनाच नव्हती.


चर्चगेटचा सब-वे, सत्कार हॉटेल, पूर्वेकडील सब-वे, मेट्रोच्या दिशेने जाणारा मार्ग (महर्षी कर्वे मार्ग) अशा आठ दारांवर डिटेक्टर होते. त्यातून प्रवासी जातील आणि सामानाची तपासणी होईल, अशी योजना होती. परंतु ऐन गर्दीत मिनिटाला इथे हजार जण प्रवेश करतात. तीन तासांत या दीड ते दोन लाख लोकांची तपासणी करण्याचे अशक्य आव्हान रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांना पेलवले नाही.


मोहिमेत ३८ मेटल डिटेक्टर, ८० हातातले डिटेक्टर, दोन एक्स-रे मशीन, दोन श्वानपथके यांचा समावेश होता. परंतु इरॉसकडे जाणाऱ्या सब-वेजवळ पहिल्या पाच मिनिटांत एवढी गर्दी उडाली की, प्रत्येकाची तपासणी अशक्य ठरली. हाच प्रकार सर्वत्र होता. त्यामुळे डिटेक्टरमधून जाणाऱ्यांना रांगेत जाऊ देणे, एवढाच पर्याय उरला. रेल्वेचे अधिकारी 'आ वासून' ही स्थिती पाहात होते. हा प्रकार रात्री आठनंतरही सुरू होता.


*********


माझे मतः
१. हे सुरक्षेकरिता चांगले असू शकते परंतु ह्याचा कितपत फायदा होऊ शकतो? मला बिलकुल शक्यता वाटत नाही.


२. जर चार दिवसाकरिता प्रयोग करायचा आहे तर मग त्यांकरिता चर्चगेट/सीएसटी सारखी मुख्य स्थानके का? हयातून तर निकाल मिळणे अशक्य.