बोरॅट

'बोरॅट' हे नाव आहे सध्या अमेरिकेत धुमाकूळ घालत असलेल्या एका लो बजेट चित्रपटाचे. हा चित्रपट तिकिट खिडकीवर इतका यशस्वी ठरेल ह्याची खुद्द त्याचा वितरकांनाही कल्पना नसल्याने अवघ्या १०० प्रती पाहिल्या आठवड्यात प्रदर्शित करण्यात आल्या परंतु त्याचे उत्पन्नाचे आकडे बघता हा चित्रपट मोठ्या बॅनरच्या नाव असणाऱ्या चित्रपटांनाही मागे टाकणार असे दिसत आहे.


काय आहे एवढे ह्या चित्रपटात? - एका परदेशी काल्पनिक पत्रकाराने अमेरिकेत घातलेला धुमाकूळ असे एका शब्दात ह्याचे वर्णन करता येईल. कमरेखालील/ असभ्य /हिडीस /बिभत्स असले कोणतेही प्रकार विनोद निर्मितीसाठी वर्ज्य न ठेवता दीड तास अखंड घातलेला गोंधळ म्हणजे बोरॅट.  


बोरॅट/बोराट हे नाव ह्यातल्या मध्यवर्ती पात्राचं. कझाकीस्तान ह्या देशातल्या एका गावातला हा एक साधा पत्रकार. सांस्कृतिक देवाण घेवाणी साठी तो अमेरिकेला पाठवला जातो आणि तिथून ह्या चित्रपटाच्या कथानकाची सुरुवात होते. त्यानंतर जो अविरत धुडगूस दाखवला आहे त्यातल्या विनोदाची पातळी पाश्चात्य अमेरिकन लोकांनाही सध्या पचायला थोडी जड जाते आहे. माझ्या मते भारता मध्ये तर हा प्रदर्शितही होऊ शकणार नाही. कारण सेन्सॉर च्या कात्रीत इतकी काटछाट करावी लागेल की अवघा १५ -२० मिनिटांचा चित्रपट शिल्लक राहील.


बोरॅट ची न्यूयॉर्क मध्ये एंट्री होते तीच आपल्या बॅगेत चक्क एक जिवंत कोंबडी घेऊन. नंतर हा बोरॅट न्यूयॉर्कच्या सबवे मध्ये चढतो आणि चालत्या गाडीत ही कोंबडी त्याच्या बॅगेतून बाहेर येते त्यानंतर घातलेला गोंधळ हा पडद्यावरच पाहावा.


हॉटेल मधली खोली दाखवण्यासाठी हॉटेलच्या माणसाने त्याला लिफ्ट/एलीव्हेटर मध्ये नेले असता, ती लिफ्ट म्हणजेच आपली आपली खोली आहे असे समजून, 'खोली जरा छोटी आहे पण ठीक आहे' असं म्हणत आपली बॅग उघडून कपडे वगैरे काढायला सुरुवात करतो. प्रत्यक्ष खोली बघितल्यावर तर आपण राजे महाराजे तर नव्हेत ना? असा त्याला भासच होतो. न्हाणी घरातले कमोडचा वापर माहीत नसल्याने त्यातील पाण्याचा तोंड धुवायला वापर करून प्रातर्विधी ला सरळ बाहेर खुल्या आभाळाखाली निघतो. सेंट्रल पार्क मध्ये कपडे धुतो तिथेच अंघोळही आटोपतो आणि हे सगळे चालू आहे न्यूयॉर्क मध्ये.  ह्या पुढील विनोद मनोगतावर लिहिणे अशक्य आहे. 


कथानक खरे वळण घेते ते ह्या बोरॅटला पामेला अँडरसन टीव्हीवर दिसल्यावर. ह्या पामेलाला बघताच क्षणी तो तीच्या प्रेमात पडतो आणि तिला भेटायला थेट कॅलिफोर्नियाला जायचे ठरवतो.आणि मग घडतो तो न्यूयॉर्क ते कॅलिफोर्निया असा ईस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट अफलातून विनोदी प्रवास. ह्या प्रवासात त्याला समलिंगी भेटतात, स्त्री मुक्ती वादी भेटतात, राजकारणी, पत्रकार, साधुसंत असे सगळे नमुने भेटतात आणि त्यांच्या प्रत्येकाशी झालेली बोरॅट्ची भेट हसून हसून लोट पोट करते.


बोरॅटचे पात्र रंगवलेला साचा कोहेन हा यू.के. मधला प्रसिद्ध विनोदी अभिनेता आहे. एखाद्या परदेशी माणसाचा इंग्रजीचा हेल आणि ऍक्सेंट त्याने हुबेहुब वठवला आहे. चित्रपटाचा वेगही चांगला राखल्याने फारसा विचार करायला वाव मिळत नाही. अख्खं चित्रपटगृह दीड तास सतत खिदळत ठेवायला लेखक दिग्दर्शकांना चांगलेच यश आले आहे.


अर्थातच ह्या सिनेमाची मजा लुटायला लाज आणि डोके दोन्हीही घरी ठेवून जावे लागेल. सहकुटुंब सहपरिवार पाहण्यासारखा हलका फुलका नरम विनोदी चित्रपट असे समजून खरोखर सहकुटुंब गेलात तर त्यानंतरच्या परिणामांना मी जवाबदार नाही.