प्रश्न

डावपेचांची नशा ती खेळणाऱ्यांना विचारा
मोल विजयाचे किती ते मयत प्याद्यांना विचारा

आज आम्ही सूड घेतो कालच्या त्यांच्या कृतीचा
आजचा घेतील का ते हे उद्या त्यांना विचारा

राख झाली सर्व वस्ती, आतली, बाहेरचीही
घातला वारा कुणी ते धुमसणाऱ्यांना विचारा

तेव्हढी प्रेतं फुलांची गाडुनी वा जाळुनी जा
काय होता धर्म त्यांचा चुरडणाऱ्यांना विचारा

कोणता स्वातंत्र्यसैनिक, कोण आहे राजद्रोही
नाव कोणा काय द्यावे जिंकणाऱ्यांना विचारा

त्रास वेणांचा किती ते सांगते आई जगाला
अर्भकांचे दु:ख कोणी जन्मणाऱ्यांना विचारा

वारसा आहे पित्याचा, नाव ते 'विक्षिप्त' लावू
ह्याविना जगतात कैसे सत्यकामांना विचारा