मी !

 माझे वय जास्त नव्हते २१-२२ च्या आसपासचा मी, गाव भर फिरायचे काही काम न धंदा, वेळ मिळालाच तर शिक्षा मंदिरामध्ये पाय ठेवायचे नाहीतर सदा सर्वदा तात्याच्या अल्पोहारगृहावर अड्डा. रोजचे कधी प्रेमाने नाहीतर वाकड्या बोटाने तुप काढावे तसे तात्या आमची उधारी काढायचा पण चालायचेच त्याचा देखील धंदा आहे. दुपार नंतर दुधाळीवर क्रिकेट (चेंडूफळी) खेळायला हजर. संध्याकाळी मित्रांबरोबर महाद्वार रोडला. रोजची डोसणे (सोमरस) आता हा प्रश्न विचारु नका की कमवत तर काही नव्हता तर पित कुठून होता.. अहो ! मधमाशीला सांगावे लागते का मध कोठे मिळेल. आमचे ही तसेच बरोबर रोज संध्याकाळी एक बकरा हुडकायचा व कापायचा, दोन चारदा तो कापला गेला की आपल्याआपच तो आमच्या वाटेलाच काय पेठेत देखील यायचा नाही.


शिक्षा मंदिराच्या मुख्य पुजारींनी आम्हाला दोन तीन दा श्राप दिला व त्या बाजूला जाण्याचे मार्ग संपले. आम्ही मुक्त झालो, मग आपल्या देशामध्ये काय सणांची कमी आहे, प्रत्येक महीन्याला एक सण. त्यातच वर्गणी गोळा करा व आपलेच सण साजरे करा हा नियम पण एक वर्षे चालवला. पण अघटीत घडले व माझ्या गुरुंना माझे सर्व प्रताप कळले, गुरु कोण अहो महान, पराक्रमी, वीर अशी सर्व विश्लेशने ते आपल्या नावासमोर लावितच सर्वाना आपली माहीती देत माझे काका व भुतपुर्व सेना अधिकारी. झाले रम्य ते बालपण हेच गाणे त्यावेळी आठवले, आता तोंडावर उठलेले वळ आरशामध्ये पाहून मला एकदमच माझ्य जैन धर्माबद्दल आपुलकी वाटली व मी माझ्या धर्माचा भक्त झालो... हो अहिंसा. खरोखर काकांना देखील कोणीतरी अहिंसेचे महत्व समजावून सांगावयास हवे. पण काय करणार त्यावेळी मुन्नाभाई नव्हता ना.


तर काकांच्या सांगण्याप्रमाणे घरामध्ये एकदमच विचार पक्का झाला की मुलगा हाताबाहेर गेला आहे, आई फक्त एवढेच म्हणाली "म्हणजे तुझ्या जितक्या तक्रारी आल्या त्या खर्याच होत्यातर." मनामध्ये म्हणलो " राज लेका गेलास तु, आपला सगळ्यात महत्वाचा व बळकट पाठींबा तु मुर्खपणा करुन नष्ट करुन घेतलास, झाले आता तुला कोण वाचवणार?" सर्वांनी विचार विनिमय करुन मला एका दुस-या गावी पाठवायचे ठरवले व माझी बोळवणी इंचलकरंजी येथे केली गेली. फाशी जाणा-या एखाद्या गुन्हेगाराप्रणामे माझे तोंड झाले होते, माझे कोल्हापूर सोडायचे ? माझे ? मी नाय जा ? पण संगे काका असल्यामुळे हे सर्व विचार मनातल्या मनातच राहीले.धुसफुस करीत मी मुकामावर पोहचलो काकांनी आपल्याच एका ओळखीचा फायदा घेत मला एका कपड्याच्या दुकानात नोकरी लावले माझा पगार ८०० रुपये. मी एकदमच उडी मारली व म्हणालो काय ?..... "अहो काका, माझा कोल्हापूर मधील रोजचा खर्च..... "तोंडावर आलेला आकडा मी मनातल्या मनातच गिळला. कसाबसा नोकरी साठी तयार झालो. रोज सकाळी ८ वाजता दुकानामध्ये दार उघडण्यापासून ते बंद करु ८ वाजेपर्यंत माझी नोकरी सुरु झाली. पण ती रोजची बायकांची कटकट, ते हा रंग नव्हे हो तो रंग, अरे लेका, ही निळ्या रंगाची साडी वाटते का तुला ? मी मनातल्या मनामध्ये म्हणालो अहो देव जरी समोर बसून साड्या विकु लागला तरी तुमच्या पसंदीचा रंग समजवून घेउन देऊ शकनार नाही. झाले रोज चे खटके, मालकाबरोबर वाद, माझी दुकानावर येण्याची वेळ ह्या सर्व कारणामुळे मला नारळ देण्यात आला.


झाले परत मोकळा झालो, नवीन मित्र आले, नवीन जागा. परत तेच जिवन फक्त जागा बद्दली. काकांनी पुन्हा एकदा संमजाऊन पाहीले (वळ आठवतात मला अजून) आई ने समजाऊन पाहीले पण ते वयच अवघड वळणाचे होते.. तेव्हा मी कुणाचेच एकत नव्हतो... शेवटी घरच्यांनी देखील माझ्या हातावर नारळ दिला व सभार मला घरातून बाहेर काढले.


तर माझ्या स्वत:च्या जिवनाची ही सुरवात, वाट चुकलेली, भरकटलेली अशाच वेड्यावाकड्या दिशेने जाणारी वाट. त्यातच मला जाणवले यार, ही आपल्या गल्लीतली स्नेहा माझ्या... नाही यार तुझ्याकडे कश्याला पाहेल ती. एकदोनदा तीने बोलण्याचा व मी तीला टाळण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी मी एकदा तीला सापडलोच, बोलता बोलता ती व मी खुपच चांगले मित्र बनलो, तीच्या नजरे मध्ये मी एकदमच चांगल्या वळणाचा मुलगा आहे. मला सारखे वाटायचे की तीला सांगावे बाई मी चांगला नाही आहे हो, घराल्यानी बाहेर काढलेला मी एक वाया गेलेला मुलगा आहे पण हिमंतच झाली नाही.


रोज रोज च्या नाटकातून शेवटी माझी गाडी एका नवीन पण योग्य वळणावर आली व मी तीला माझ्या प्रेमासाठी विचारले. मी " स्नेहा, एक गोष्ट विचारतोय खुप विचार करुनच उत्तर दे. तु मला आवडतेस... नाही माझे तुझ्यावर खुपच प्रेम आहे, अरे काळजी करु नकोस मी गोष्ट कुणालास सांगणार नाही फक्त तुझ्या आणि माझ्या मध्येच ही गोष्ट राहील, जर तु नकार दिलास तरीही मी तुझा चांगला मित्र बनून राहीन व संपुर्ण आयुष्यामध्ये ह्या गोष्टीचा तुझ्यापुढे प्रश्न उभा करणार नाही." मी तीच्या चेह-याकडे पाहात विचार करीत म्हणालो " चल, सोड ह्या गोष्टीला मला माहीत आहे माझी लायकी सुध्दा नाही तुझ्याबरोबर उभे राहण्याची व मी प्रेमाची गोष्ट करीत आहे हरकत नाही उत्तर नाही तर नाही. पण मी मात्र तुझ्यावर प्रेम करतो हे खरे. माझ्या कडुन पुन्हा विचारले जाणार नाही, विषय संपला" मला वाटले झाले गेली एक चांगली मैत्रिण आयुष्यातून गेली. स्नेहा गेली जाताना काहीच न बोलता गेली व मी तसाच काही काळ उभा राहिलो, त्या वेळी संपुर्ण जगात मी एकटा पडल्याची जाणिव ह्याच्या आधी मलाकधीच झाली नव्हती पण काहीच रस्ता नव्हता माझ्या जवळ. मला वाटले का म्हणुन मी गडबड केली अजून काही वेळ जाऊ दिला असता, दुख: व नैराश्य ह्याच्या धक्कयामुळे मी नकळतच बार मध्ये घुसलो व पिता-पिताच रात्रीचे १२ वाजले ते कळालेच नाही, धडपडत धडपडत खोलीवर पोहचलो, व तसाच पडलो न खाता.


दिवसामागुन दिवस गेले, स्नेहा माझ्या संगे बोलली ही नाही, माझे जिवन एकदमच भरकटल्यासारखे झाले काहीच कळत नव्हते काय करतो आहे ते. एके रात्री असाच झोपलो होतो एकदमच माझ्या मध्यरात्री (रात्री २-३ ला झोपल्यावर सकाळचे ९-१० हे मध्यरात्री सारखेच ना.) कोणीतरी दरवाजा वाजवला.... मी वैतागून म्हणालो लेकाचा पक्क्याच असणार नाहीतर अपरात्री तोच तर येथे येऊ शकतो..... मी दरवाजा उघडला समोर स्नेहा. मी फक्त चक्कर आली नाही बाकी सर्व काही. स्नेहा "अरे असे काय बघतो आहेस. शुभदिपावली " मी अजून ही धक्क्यातच होतो.... स्नेहा " अरे राज सकाळचे १० वाजलेत आज दिवाळी आणि तु अजून झोपलेला आहेस, मला आत येऊ देणार आहेस की नाही ? " मी अजुन ही तसाच दरवाजामध्ये उभा. शेवटी ती बेचारी धक्का देउन आत आली. मी तीच्या मागे मागे, मग मला अचानकच आठवले मी " थांब स्नेहा, तु ह्याच रुममध्ये बस. मी आलोच" मी जवळ जवळ पळतच आतल्या खोलीत आलो व मला स्वत:लाच चक्कर आली बाप रे ! किती ह्या रिकाम्या बाटल्या, ईकडे ती कडे पडलेले सिगरेटचे थोटके, अस्ताव्यस्त कपडे.. दहा-दहा दिवस न धुतलेली भांडी बाप रे !, मी लगेच बाहेर आलो व तीला विचारले " बोल कशी आलीस येथे ? काही काम ?"ती म्हणाली अरे बसू तर दे मला... तुझ्या घरी पहील्यांदा आली आहे चाय-पाणीतर विचार." मी " अरे हो, चाय घेतीस का ? मला ही प्यायचा आहे तु येथेच थांब मी दुध घेऊन येतो." मी पळतच बाहेर गेलो, सायकल घेतली व दुध आणयासाठी डेअरी व पोहचलो तर नशीबच फुटके दुध संपलेले होते... वरुन त्याचा शेरा दहाला उठणार साहेब व ह्यांना दुध हवे... जा पुढील डेअरीमध्ये भेटेल. मी सरळ ३-४ किलोमीटर दुध आणयासाठी सायकल दामटली व काही वेळाने म्हणजेच कमीत कमी २० मीनिटाने खोलीवर पोहचलो, पाहतोतर स्नेहा गायब ? झाले गेली... मी डोक्याला हात लावून कुर्चीवर बसलोच होतो तो पर्यंत आतील खोलीतून केरसूणी मारण्याचा आवाज आला मी दचकलोच... आत गेलो तर पाहतो काय ही बया हातामध्ये एक झाडु व एक हात नाकावर. सफाई काम चालू होते. मी पळत झाऊन तीच्या हातातील ती केरसूणी घेतली व तीला म्हणालो " अरे हे काय ? मी करेन ना तु चल मी चाय घेऊन येतो." पण स्नेहा ने न बोलताच आपले काम सुरु ठेवले व तीच्या डोळ्यातुन पाणी टपकले.... माझा जीव एकदमच कासावीस झाला घाबरलेल्या आवाजात मी विचारले "काय झाले स्नेहा ? रडतेस का ? काही अडचण आहे का ?" ती ने केरसूणी खाली फेकली व माझ्या कडे पाहून म्हणाली " का आपल्या जिवनाची वाट लावून घेत आहेस, ही दारू, सिगरेट का हवी तुला ? तु अजून तरुण आहे असे का करत आहेस ? " पुर्ण आयुष्यामध्ये मला प्रथमच आपलीच लाज वाटली व माझ्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. मी काही न बोलताच बाहेरील खोलीत आलो व गपचुप बसलो. ती समोर आली व काहीतरी सांगु लागली पण मी माझ्याच विचारांमध्ये गुरफटून गेलो होतो.. ती बोलता बोलताच चहा देखील घेऊन आली... व म्हणाली " राज, आज पासून तुझे आयुष्य, माझे तेव्हा कसे वागायचे ते मी ठरवीन ठीक आहे ? " मी हो म्हणालो.. मला वाटत की हा माझ्या जिवनातील सर्वात जपून ठेवावा असा क्षण. मी त्याच क्षणी आपल्या आपण मी माझे जिवन स्नेहाच्या पुढे अर्पण केल्या सारखा म्हणालो " जर तु साथ देत असशील तर राज काही ही करेल." ती खुदुक करुन हसली व म्हणालीच चहा पी." माझे मलाच नवल वाटले असे कसे होऊ शकेल माझ्या किती तरी मित्रांच्या मैत्रिणी फक्त हा सिगरेट ओढतो असे कोणीतरी सांगीतले तरी सोडून गेल्या येथेतर तीला माझ्या खोली मध्ये ढिगारा सापडा होता सिगरेट चा व दारु च्या बाटल्यांचा खजिना सापडला होता तरी ही ती माझ्या बाजूने उभी होती व मला नवीन रस्ता दाखवत होती.... राज सुधरला. खरोखरच राज बदलला.... सिगरेट सोडली, दारु सोडली.... त्याच दिवशी. माझे सर्व मित्र एकदमच पागल झाले की हा सुधरला कसा.. जो रात्री दारु घेतल्या शिवाय झोप येत नाही म्हणत होता तो दारु सोडली म्हणत आहे.. व काम धंदा करण्याची बोली बोलत आहे.... खरोखरच त्यांना व मला स्वत:ला हे सर्वच नवल वाटत होते.....


म्हणतात ना जर तुम्ही चांगले वागायचे ठरवले तर तुम्हाला देव सुध्दा मदत करतो.....व मला लवकरच देव भेटला, हो देव माझा नवीन मित्र किरण, एका टपरी वर बेचारा सुट्टा घेण्यासाठी नियमित संध्याकाळी हजर. बेचारा रोज एकच सुट्टा घ्याचा, माहीत नाही कसा कंट्रोल करायचा आपल्यावर. सुट्टा पिता-पिताच मैत्री झाली. त्याने मला एक नवीन रस्ता दाखवला, एके दिवशी आपल्या बंद पडलेल्या दुकानाजवळ मला घेऊन गेला व म्हणाला " राज, हे दुकान व ह्याची ही चावी. काय करायचे ते कर पण काम कर, जो पैसा हवा मी देईन पण काम चालू कर." माझ्या जवळ बोलण्यासाठी शब्दच नव्हते, कुठेते दारु पिण्यासाठी, सिगरेटसाठी गावभर फिरण्यासाठी घेऊन जायचे ते मित्र व कुठे हा मला आपले स्वत:चे दुकान हाती देत आहे व म्हणत आहे की काम कर. माझे डोळे एकदमच भरुन आले. मी नको नको म्हणत असताना खिश्यामध्ये ५००० रुपये ठेवले.


दुकानाची साफसफाई झाली व मग विचार चालू केला की येथे काय काम चालू करावे ? ह्याचा देखील उपाय किरणच घेऊन आला व म्हणाला " राज येथे आपण संगणक प्रशिक्षण केंन्द्र चालु करु, खुप जागा आहे." मी " काय ? अरे मला कुठे येते संगणक, यार मी तर शालेय शिक्षण देखील जेमतेमच घेतले आहे व तु म्हणतोस की संगणक केंन्द्र चालू करु ? तुला माहीत असेलच की संगणक किती महाग आहेत ते ? एवढे पैसे कुठ्न आणायचे ?" सर्व प्रश्नाची उत्तरे त्याने फक्त हलकेच हसून दीले व म्हणाला " पाहत राहा." दुर-या दिवशीच सुताराला घेउन आला व काम चालू केले. एका आठवड्यानंतर मी एका संगणक केन्द्राचा मालिक बनलो.


स्नेहासंगे रोजच गाठीभेटी होत होत्या.. तीला माझी प्रगती पाहून खुप आनंद व्हायचा... हा आनंद तीच्या डोळ्यातून... हस-या चेह-यातून मला कळायचा, एके दिवशी तीने एकदमच विचित्र मागणी केली " राज, तु नुस्ताच गल्ल्यावर का बसतोस... जे शिक्षक तु ईतर मुलांना शिकवण्यासाठी ठेवले आहेस त्यांच्या कडून तुही शिकून घेणा काहीतरी.... तुझा ही वेळ जाईल व एक नवीन गोष्ट तु शिकशील." झाले तुसतेच बोलून थांबेल ती स्नेहा कसली... ती सरळ माझ्या केन्द्रामध्ये गेली व तेथील शिक्षकांना मला काहीतरी शिकवण्याची विनंती केली. मग राज देखील संगणक शिकु लागला.... शिकला ही.. लवकर खिडक्या, कार्यालय, डीटीपी ह्या भाषेमध्येच बोलू लागला.... लवकरच एक वर्ष संपले... माझे कार्य देखील व्यवस्थित चालू होते... पण


दैवाला माझे सुख जास्त काळ आवडले नाही.... किरण एक दिवस माझ्याकडे आला व म्हणाला " राज, मी स्नेहाला...... कसे सांगु.... स्नेहा दुस-याच कुठल्यातरी मुलावर प्रम करते वाटत..." मी "किरण, तुला माहीत आहे मला स्नेहा विषयी कुठलाच विनोद आवडत नाही" किरण " नाही रे मित्रा ! खरोखरच. त्या मुला कडे लाल रंगाची एक गाडी अहे ओप्पल. " मी ...." अरे सोड ना यार कोणीतरी मित्र असेल." मी विषय टाळला खरे पण लवकरच माझ्या मनावरील माझा ताबा सुटला. मी तडक स्नेहा कडे पोहचलो. पण तीच्या चेह-यावरील हसू पाहून काहीच विचारण्याचे धाडस झाले नाही....


दिवस सरत केले एके दिवशी किरण माझ्या समोर उभा राहीला..... " राज, आजच दुकान सोड." मी ???......" अरे हे काय ? सोड ना यार. असे मजाक करु नको. तुला माहीत आहे ना मला...." पण तो मजा नव्हता खरोखरच, एक दिवशी किरण ने संगणक केन्द्र ताब्यात घेतले व राज परत राज रस्त्यावर.


चालायचेच जग आहे.... दोस्त आहेत, दुश्मन पण मी एकदा ही किरणला मागे वळून विचारले नाही मित्रा तु असे का केलेस. मला माहीत आहे त्याच्या ही काही ना काही अडचणी आहेत... अथवा देव माझी अजून परिक्षा घेऊ ईच्छितो. दुकान गेले काही हरकत नाही... स्नेहा आहे ना संगे.... मी पुन्हा विश्व ऊभे करीन. त्यात काय मोठे.... थोडे फार पैसे देखील गाठीला होते..... जग आपलंच आहे कधी ना कधी मुक्काम जरुर मिळेल. स्नेहा ने मला धीर दिला व नवीन जोमाने काम चालू करण्यास मला उभारी दिली...... पण नशीब. धोका संपलाच नाही कधी.... फक्त चेहरा बदलत राही पण संकट समोर...रोज नवे संकट ऊभे राही... मला कळाले की स्नेहाचे प्रेम दुस-याच कुठल्यातरी मुलावर आहे......... माझा विश्वास डळमळला..... मी एकदमच..... काय सांगु तो दिवस मी कसा घालवला मला माहीत आहे....


स्नेहा माझ्या समोर बसली होती.... " राज, त्याच्या जवळ स्वत:चा धंदा आहे..... गाडी आहे." मी " लाल रंगाची ओप्पल ?" स्नेहा " हो..... त्याचे घ्रर खुप मोठे आहे... राज. मला तो खुप आवडतो ... तो ही माझ्यावर खुप प्रेम करतो." मी स्वत:ला शांत राखत हसूनच बोललो.. " अरे वा ! छान गोष्ट आहे... लग्नाला बोलवं हं मला.... नाही तर विसरशील." व लगेच तेथुन उठलो.....


 


किती वेळ चालत होतो माहीत नाही... शेवटी निर्णय घेतला. नको मला हे जग.


५ वर्षे झाली मला इंचलकरंजी सोडुन..... चल राज एकदातरी तीला फोन कर ना, विचार कशी आहे ती. तीचे लग्न झाले असेल का ? कशी दिसत असेल ती ? ..... शेवटी हिंमत केली व तीच्या घरी फोन केला..... तीच्या आईने फोन घेतला होता.... " नमस्ते, काकी राज बोलतोय मी." काकी काही विचार करतच उदगारल्या " अरे राज... कुठे आहेस रे बाबा ! तुझी खुप आठवत काढत असते स्नेहा. " मी " काकी स्नेहा आहे का घरामध्ये ? " काकी ने बाहेर जाऊन स्नेहाला बोलवले... " राज......................" बस्स हा एकच शब्द काळजाचा ठाव घेऊन गेला.... वाटले राज खरोखरच तु काहीतरी मिळवले आहे आज. कसा आहेस पासून तो काय करीत आहेस. ह्या गोष्टीं झाल्या.. तो बिचारा एस.टी.डी. वाला एकदम निहाळत होता एक तर माझी भाषात्याला समजत नव्हती व तो खुष ही होता.... कारण त्याच्या बुथ मध्ये मी पहीला ग्राहक होतो हो १२००.०० रु. चे बिल देत होता..... आज मला आसमान ठेगणे होते... मी स्नेहा शी बोललो ते ही ईतक्या काळानंतर.... तीचे अजून लग्न झालेले नव्हते.... वा ! राज तुझे नशीब खुपच ग्रेट आहे.... यु आर बेस्ट ! .... स्वत: वर सर्व मुक्ताफळे उधळून झाली....


मग रोज फोन चालू झाला...... मी येथे दिल्ली मध्ये एका मोठ्या कंपनी मध्ये कामाला (हा बारावी पास मुलगा मोठ्या कंपनी मध्ये कसा ? ह्या विषयी दुसरी कथा लवकरच लिहीत आहे..थोडी धमाकेदार आहे.. वाट पाहा) त्या मुळे पैसे बक्कळ होते... ५ वर्षामध्ये मी एवढी मोठी झेप घेतली ह्यावर स्नेहाचा विश्वासच नव्हता...... अशाच एका आनंदाच्या क्षणी तीने आपल्या प्रियकराविषयी सांगीतले.... " राज, तो सुरवातीला खुपच चांगला वागला... त्याच्या वागण्यावर भुलुनच मी त्याला होकार दिला होता.... पण जेव्हा जेव्हा मी त्याला व तुला एका नजरेने पाहाण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आहे की त्याच्या पेक्षा तु खुपच चांगला आहे.... खरोखरच तु गेल्यानंतर काही दिवसामध्येच मी त्याच्या बरोबरचे नाते तोडले" मी फक्त विचार करित होतो.... पण एके क्षणी मी तिला माफ केले. ती पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये होती... अजून काय हवे....


कामामध्ये प्रगती करता करताच मला एकदम स्व:ताची कंपनी असावी असे वाटू लागले व मी त्या दृष्टीने प्रयत्न करु लागलो... लवकरच यश आले... पैश्याची जुळवाजुळव झाली व माझी स्वत:ची कंपनी एका छोट्याश्या जागेत चालू झाली.... SIPL. कामाचा व्याप ही वाढला व स्नेहा संगे प्रेम ही वाढत राहीले... मी एके दिवशी तीला एकदमच एक बातमी सांगितली " स्नेहा, मी स्वत:ची गाडी घेतली आहे ... लोन आहे पण लवकरच फीटेल... " स्नेहा " कुठली गाडी घेतलीस रे ?" मी " ओप्पल. लाल रंगाची." स्नेहा काही काळ गप्प झाली व मी म्हणालो " मोठा बंगला देखील राज तुझ्या साठी उभा करेल फक्त हो म्हणं" काही न बोलताच तीने फोन खाली ठेवला... .


काही दिवस असेच गेले, त्या दिवशी २८ जून होता.... मला चांगले आठवते... स्नेहा संगे नेहमी प्रमाणे संध्याकाळी बोलणी झाली... जिवनाच्या माझ्या मार्गा विषयी ती आनंदात होती.... तीला मी त्या दिवसापासून सिगरेट व दारूला हात लावलेली नाही ह्याचेच नवल वाटायचे, ती नेहमी म्हणे.. "कॊणी कोणावर एवढे प्रेम कसे करु शकेल ?" तीला माझे प्रेम कळाले होते.. पण मला तीचे कधीच कळले नाही...२९ जून त्या दिवशी तीच्या घरी कुणीच फोन उचलला नाही.... ३० जून माझा वाढदिवस....... आज तर स्नेहा नक्की फोन करेल.... असे होऊच शकत नाही की ती फोन नाही करणार... हे शक्य नाही..... सकाळ पासून मी वाट पाह्तोय ... फोनची..... १० वाजले... १ वाजला..... रात्रीचे १० वाजले... मी शेवटी स्वत:च फोन लावला..... रिंग होत राहीली... पण कोणीच फोन उचलला आही....शेवटी ७ जुलैला तीच्या आईने फोन उचला..." अरे राज, काय हे..... तुझा मोबाईल नंबरच लागला नाही रे... आम्ही खुप प्रयत्न केला...... स्नेहाचे लग्न झाले यादी पे शादी.! किती छान गोष्ट झाली ना.... नवरा मुलगा... मेडीकल..... " असेच काहीतरी बोलत राहीली... मी फक्त दगडासारखा.... उभा फोन कानावर लावून उभा. माझ्या मित्राने मला हालवले "राज अरे यार, कहा खो गया ह्या कबसे बुला रहा हूं !"


मी त्याला एकच गोष्ट सांगितली " रवी ! भाई..... ठेके से बोतल लेके आ !"


"राज............... काही हरकत नाही स्नेहा मिळाली नाही...... पण यार ती ने लग्नाची तारिख तरी कमीत कमी पुढे मागे करायची यार !!!!!!!!!!!!!!! "