तेजस्विनी-५

"अहो झेडपी मेंबर, अर्धा कप चहा मिळेल का ?" राजाभाऊंनी सुरेखाताईंना म्हटले.
राजाभाऊंची रविवारच्या सकाळी आळसांत सुरू असलेली सगळी कामे व मध्येच सोडलेले चहाचे फर्मान त्यांना नवीन नव्हते.
नवीन होते ते त्यांनी दिलेले संबोधन....
लटक्या रागाने वर्तमान पत्रातून डोके काढून त्यांनी मानेला झटका दिला व म्हणाल्या,
"झेडपी मेंबरची स्वयंपाकीण बाई आज रजेवर आहे, चहाचा भत्ता रोखीत घेऊन बाहेरूनच चहा प्यावा आज राजेसाहेबांनी."  
वैशाली अजून झोपलेलीच होती. आजींची अंघोळ आटपून देवपूजेची तयारी सुरू होती. त्यांची देवपूजा आटोपताच भिजत ठेवलेले पोहे फोडणीला टाकायचे होते. तोवर पटकन आपण अंघोळ करून घ्यायच्या विचारांत असतानाच राजाभाऊंचे फर्मान सुटले होते. आता अजून पंधरा मिनिटांची खोटं ह्या विचारांत असतानाच राजाभाऊ उठून उभे होत म्हणाले,
"मग असंच करावं म्हणतो.... " "हो, तेव्हढीच एखादी सिगारेट फुंकायला मिळेल ते सांगा की" त्या परत लटक्या रागाने म्हणाल्या.
अधून मधून लहर आली की राजाभाऊ धूम्रपान करीत ते आता सुरेखाताईंच्या चांगले सवयीचे झालेले होते. त्यांच्याकडे मिश्कीलपणे तिरपा कटाक्ष टाकत राजाभाऊंनी पायांत चपला सरकवल्या व घातलेल्या बुशकोटाची बटणे लावत लावत बाहेर पडायची तयारी केली. सुरेखा ताई वळून स्वयंपाक घरापर्यंत पोहचल्या नसतील एव्हढ्यात राजाभाऊंचा " अरे... तू इकडे कुठे ?" असा आवाज आला म्हणून त्या मागे वळल्या. बघतात तर अंगणात प्रियांक मोटरसायकल स्टॅंडवर लावण्याच्या तयारीत होता.
"बाबांनी आज मीटिंग लावलीय दुपारी, तुम्हा दोघांना बोलवलंय ३ वाजता" लावलेली बाइक स्टॅंडवरून काढत तो बोलला.
एक क्षण काय उत्तर द्यावे हे न सुचल्याने त्या तश्याच उभ्या होत्या. "हो, नक्की येऊ म्हणून सांग...." पाठमोऱ्या राजाभाऊंचे शब्द त्यांनी ऐकले.
'चला, रविवार सार्थकी लागला' असा मनातल्या मनात विचार करत त्या पटकन न्हाणीघरात शिरल्या.


"मी राहतो घरी, तू जाऊन ये मीटिंगला" राजाभाऊ पोहे खात म्हणाले.
"अहो, काहीतरीच काय ? मी एकटी कशी जाऊ?" सुरेखाताईंची खरंतर रविवारी घराबाहेर पडायची इच्छा नव्हती.
"मला जरा आराम करायचा आहे, मी वैशाली बरोबर राहीन तू जाऊन ये " परत राजाभाऊ बोलले.
सकाळी सकाळी वाद नको म्हणून त्या तात्पुरत्या गप्प बसल्या. दुपारी जेवण झाल्यावर बोलू असा त्यांनी विचार केला.


जेवणे आटोपल्यावर आळसावल्या शरीराने दोघेही पडले होते. हळूच सुरेखाताईंनी मीटिंगला जाण्याचा विषय काढला....
"सुरेखा, अगं तुझे जाणे महत्त्वाचे आहे. मी कॉलेजची कामे आहेत म्हणून येऊ शकत नसल्याचे तू कळव" राजाभाऊ बोलले.
"पण मी एकटी काय करू जाऊन ?" "आता प्रचारासाठी, बैठकांसाठी व इतर कामांसाठी तुला एकटीलाच फिरावे लागणार" ते म्हणाले.
"बापरे; कसं जमेल मला हे ? वैशुला सोडून कसं जाता येईल ? आईंना काय वाटेल ?" त्यांनी भरभर सगळे प्रश्न एकदम विचारले.
"आईची काळजीच नको करूस, मी तिला आज नीट समजावून सांगीन, जोवर जमतंय तोवर वैशुचं आपण तिघं मिळून करू नाहीतर एखादी बाई बघू कामाला" ते विचार पूर्वक बोलत होते.
"मीही बऱ्याच दिवसांपासून विचार करतेय एखादी बाई वैशुला सांभाळायला ठेवावी, आईंकडून धावपळ होत नाही आताशा" त्या बोलल्या.
शेवटी सुरेखाताईंनी एकटे जायचे असे नक्की होईस्तोवर राजाभाऊंचा स्वर जडावला होता. कोपऱ्यांत भातुकलीचा खेळ मांडून आदळ-आपट करणाऱ्या वैशुचाही त्यांना त्रास जाणवत नव्हता. थोड्याच वेळांत ते चक्क घोरायला लागले.....


साडी बदलत असताना वैशुची भुणभूण चालू होती. "आई मी पन येते मीतींगला" असं लाड लाड म्हणत ती साडी खेचत होती. एकुलत्या एका सुटीच्या दिवशी तिला सोडून जायचं त्यांच्या जीवावर येत होत. अखेरीस 'मी पटकन येते' असं तिला कसंबस समजावून त्या बाहेर पडल्या तेव्हा वैशु आजीच्या मांडीवर बसून पुस्तकातली चित्रे बघत होती.
शक्य झाल्यास ही निवडणूक लढवायचीच नाही ह्या विचारांसोबत त्यांनी घर सोडले.
*********************
आजची तेव्हढी एकच गोष्ट सुरेखाताईंच्या मनासारखी होणार नव्हती.....
वासुभाऊ व संतोषभाऊंनी तालुक्यातून जिल्हा पंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी त्यांची जागा निश्चित झाल्याचे सांगितले तेव्हा नाही म्हणायचे त्यांना सुचलेच नाही. कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत होता तेव्हा मोहरून जाताना कुठेतरी एक काळजी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यांत दडलेली होती.  
वासुभाऊ व विचारे साहेबांबरोबर सुरेखा ताईंचे 'तिकीट' पक्के झाले होते. अट्रावलातून अर्थातच भराडे बाई, तर निर्मला चौधरी व माळी वहिनी ह्या दोघी तालुक्यातल्या इतर राखीव जागांवर निश्चित करण्यात आल्या.  शेळके मास्तर व फिरके ह्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची जबाबदारी टाकण्यात आलेली होती. त्यांच्या सह अजून ४ जणांना तिकीट वाटप केली गेली. दोघा अपक्षांना पाठिंबा द्यायचे ठरले तर ५ जागांवरील निर्णय नंतर घेण्यात येणार होता. कोणालाच कुठल्याही जागेबद्दल तक्रार नव्हती. नव नवीन सहकारी, त्यांच्या गावांची नावे, त्यांची नावे त्या पटापट आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत होत्या. शाळेत शिक्षिकेला मुलांची नावे लक्षांत ठेवण्याचा अनुभव येथे कामी आला. निवडणुकांना दीड महिना बाकी होता.


संतोषभाऊ, देसाई, विचारे साहेब व वासूभाऊ आजच रात्रीच्या गाडीने मुंबईला जाणार होते. भारतीय जनमोर्च्याशी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत युती झाल्यास बघावी असा पक्षाचा विचार होता. 'जनजागृती' व 'भा.ज.मो' ह्या दोन्ही पक्षांची विचारसरणी साधारण मिळती जुळती होती. राष्ट्रीय व राज्य पातळीवर भा.ज.मो. चे कार्य गेल्या २५ वर्षांपासून सुरू होते. मुख्य म्हणजे त्यांचाही सामना 'विकास आघाडी' शी होता. भा.ज.मो.च्या पक्षश्रेष्ठींकडून संतोषभाऊंना आजच आमंत्रण आलेले होते. ही संधी दवडायची नाही असे ठरवत पक्षाचे धुरंधर उद्याच तेथे जाऊन थडकणार होते. तालुका व राज्य पातळीवर यावलच्या जागा जनजागृतीने लढवायच्या व राष्ट्रीय पातळीवर भा.ज.मो. ला समर्थन द्यायचे असा संतोषभाऊंचा विचार होता. कदाचित काही जागा मित्रपक्षाला द्याव्या लागणार होत्या. झेड.पी. च्या जागा न देता ग्रामपंचायतीच्या जागा वेळ पडल्यास द्याव्या ह्यावर सर्वांचे एकमत झाले. म्हणूनच ५ ग्रामपंचायतीच्या जागा रिकाम्या ठेवल्या गेल्या. संतोषभाऊंच्या मनासारखे घडल्यास तालुक्यातल्या विधानसभेच्या जागेवर निवडून येण्यास नानासाहेब पाटलांना बरेच परिश्रम घ्यावे लागले असते.  


'आता प्रचाराला लागा' असा आदेश घेत व पुढचे मनसुबे आखत एक एक कार्यकर्ता दुधमहासंघाचे कार्यालय सोडत होता तेव्हा जीच्याबरोबर आपली लढत आहे ती मोहिनी इंगळे कशी असावी ह्याचाच सुरेखाताई अंदाज बांधत होत्या.
*******************
मोहिनी इंगळे ची बदली करवून घेण्यात अखेर सुनील पाटलाला यश आलेच. नानासाहेब पाटलांचे तालुक्यातल्या तहसीलदार कचेरी सह जिल्ह्याच्या प्रत्येक सरकारी कचेरीत जबरदस्त वर्चस्व असल्याचे हे एक द्योतक होते. त्यांनीच नव्हे तर त्यांच्या दिवट्या चिरंजीवांनीही मनांत आणलेली सर्व कामे चुटकीसरशी पार पडत होती.
ह्या एका महासत्तेविरुद्ध लढा द्यायचा होता तो संतोषभाऊंना आपल्या नवख्या शिपुरड्यांसह.
फक्त माणसाशी असलेले माणसाचे नाते हेच काय ते त्यांचे ह्या निवडणुकीतले भांडवल होते.
मोहिनी इंगळेचे जोरदार स्वागत शाळेत केले गेले त्या दिवशी वैशुला ताप आलेला असल्याकारणाने सुरेखाताई शाळेत गैरहजर होत्या.
अनवधानाने एक वेगळाच संदेह त्यांच्या सहकार्यांना वाटू लागला.


"नमस्कार सुरेखा ताई" अनोळखी स्त्रीच्या आवाजाने पुस्तकातून डोकं वर काढून सुरेखाताईंनी बघितले तर एक नीटनेटकी बाई त्यांच्या समोर सुहास्यवदनाने उभी होती.
'कोणाची बरं आई असावी ही' असा ठेवणीतला शिक्षकी विचार करत असतानाच "मी मोहिनी, मोहिनी इंगळे" हे वाक्य तीच्या मंजूळ स्वरांतून उमटले.
"नमस्कार.... नमस्कार...." असं तोंडातल्या तोंडात पुटपुटताना स्वत:चा स्वर इतका कोरडा कसा ह्याचेच त्यांना आश्चर्य वाटू लागले.
स्टाफ रूम मधले सगळे जण हातातली कामे सोडून दोघींकडे बघू लागली....
"बसू का तुमच्या सोबत दोन मिनिटे ?" तिने पुढे विचारले तश्या त्या वरमून बोलल्या "अरे सॉरी हं, मीच तुला बस म्हणून सांगायला हवे"
ती बसत असतानाच त्या परत अपराधीपणाने बोलल्या, "माफ करा, मी तुम्हाला अग तूग केलं".
"त्यात काय मोठं ? आहेच मी तुमच्याहून वयाने लहान, तुमचा हक्कच आहे तो" ती पटकन बोलली.
"......."
"मी तुम्हाला एक खास विनंती करायला आलेय ताई" सुरेखा ताईंकडे ती रोखून बघत बोलली.
"हम्म बोल ना" आता त्यांच्या स्वरांतला तो कोरडेपणा कमी झालेला होता.
"आपण दोघी येथे शिक्षिका व बाहेर प्रतिस्पर्धी म्हणून वावरूया का ? म्हणजे मला म्हणायचे होते.... आपल्या निवडणुकांचा विषय बाहेरच ठेवून आपले इथले संबंध आपण सांभाळायचे का ?" ती जरा चाचरत बोलली.  
"हो...आनंदाने, खरं तर मला आशाच नव्हती तुझ्याकडून ह्या प्रस्तावाची, म्हणून माझा प्रतिसाद सुरुवातीला अगदी थंड होता." सुरेखा ताई उत्साहाने म्हणाल्या.
"मी पण जरा घाबरतच होते, मला वाटलं होतं, सुरेखाताई म्हणजे........"
"एखादी जाडजूड, पोक्त, चष्मा लावणारी, दोन वेण्या घालणारी खडूस बाई असेल !" हसत हसत सुरेखाताईंनी तिचे वाक्य पूर्ण केले तेव्हा सगळे जण हास्यात बुडले.


दोघींच्यातला तणाव त्या हास्यकल्लोळाने दूर झाला.... एक चांगली सहकारीण मिळाल्याचा आनंद स्टाफ मधल्या प्रत्येकाच्या तोंडावरून दिसत होता.
***************************
"दाजी औंदाच्या झेडपी मेंबरच्या इलेक्शनची ह्यो यादी तयार हाय" सुहास पाटलाने नानासाहेबांना सांगितले.
"सुनिलरावांना दावली का?" नानासाहेब न बघताच बोलले. "त्यांन्सी काय दावायची ?" सुहास चाचरत बोलला.
मग मोठ्या पाटलांना वर्तमान पत्रातून डोकं वर काढावंच लागलं. "का दावायची म्हंजी ? निवडणूकीला सुनिलराव उभं राहणार, आन उमेदवारांची यादी त्यांनी न्हाय बगायची तर कुणी बगायची"
"तसं न्हाय दाजी, नेमीचेच तर उमेदवार हाईत त्यात बगायच काय असं म्या म्हनत हुतो" सुहास सारवासारव करायला लागला.
"तुमची यादी माज्या जवळ दिऊन ठेवा. मी पाहतो काय करायच त्ये." अखेरीस ते बोलले. सुहासला तिकडून निघून जाण्याचा तो संदेश होता.
"आता जे झालं त्यावर गपगुमान इचार करा सुहासराव, घिसडघाई करून कामं नका करत जाऊ, अखेरच निक्सून सांगतोय" मोठ्या पाटलांनी त्याला बजावले. "मोठ्या दिलानं सुनिलरावांची साथ संगत करा, ही निवडणूक जिंकून दावा मग मी समदं ठीक करतो" नानासाहेब बोलले.
सुहासने मान हालवत जेमतेम होकार दिला तेव्हा त्याच्या डोळ्यांत अपराधीपणाची भावना नानासाहेबांना जाणवली.
"सुहासराव असे कमजोर नका पडू, मी सांगतो तुमच्या भल्यासाठी; त्यावर वाईट वाटून घेण्याऐवजी अंमल केलात तर जग जिंकाल...." नानासाहेबांनी त्याला धीर दिला. " ....तुमच्या माणसांपैकी कुनाला सदस्य बनवायच कबूल केलं हाय का तुमी?" 
"व्हय दाजी, रावेरचे माझे साडू यंदा मागे लागलेत" त्याने हळूच सांगितले.
"इतकंच असेल तर त्ये काम माज्यावर सोपवा, बाकी यादी सुनिलरावांना बनवू द्या" नानासाहेब घरातही राजकारणाचे डाव व्यवस्थित खेळत. 'धाकटा सुनील मला एक दिवस बाजारात विकून येईल. मोठा सुहास फाड आहे पण मनाचा सरळ आहे' हे त्यांचे लाडके मत होते.
सुनीलला बोलावले असल्याचा निरोप सांगून ते परत वाचनांत गढले. सुनील आल्यावर त्याला फक्त 'उमेदवारांची यादी तयार करून मला दुपारच्याला आणून द्या' असा हुकूम देऊन ते बैठकीवरून उठत दिवसभराच्या इतर कामांना लागले.
******


संतोषभाऊ सहकार्यांबरोबर मुंबईहून परतले ते आंबट गोड बातम्या घेऊनच. तालुक्यातल्या काही जागा भा.ज.मो. ला द्याव्या लागणार होत्या तर संतोषभाऊंना विधानसभेसाठी भा.ज.मो.चे समर्थन व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचे साहाय्य मिळणार होते. ज्या जागांवर 'जनजागृती'चे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी तेथल्या जागा संतोषभाऊंनी भा.ज.मो. ला देऊ केल्या होत्या. पण फिरकेंची, शेळके मास्तरांची व रावेरची प्रतिष्ठेच्या लढतीची जागा हातातून गेली होती. शेळके मास्तरांची समजूत काढता काढता वासुभाऊंना नाकी नऊ आले होते.


आज पंचायतीच्या निवडणुकांच्या अर्जांवर सह्या व अनुमोदनाचा कार्यक्रम पार पडणार होता. सगळे जण दूध महासंघाच्या कार्यालयांत पोहचले तेव्हा साडे दहा वाजत आलेले होते. सुरेखा ताईंना आज रजा टाकावी लागलेलीच होती. संतोषभाऊ, वासूभाऊंसह शेकडो कार्यकर्ते वाजत गाजत मिरवणुकीने तहसीलदार कार्यालयांत पोहचले. देसाई साहेबांनी त्यापूर्वीच तेथे जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडून वेळ ठरवून घेतलेली होती.
मिरवणूक तहसीलदार कार्यालयांत पोहचताच सुरेखाताईंना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. राजाभाऊ जातीने तेथे हजर होते. सकाळी घाईघाईत 'बेस्ट लक' इतकंच म्हणून बाहेर पडलेले राजाभाऊ आपण अर्ज भरताना आपल्या सोबत असावेत असे सुरेखा ताईंना मनापासून वाटत होते. पण कॉलेजातली लेक्चर्स सोडून ते इतर कुठलेही कामे त्यावेळेत करणार नाहीत ह्याची खात्री असल्याने उगीच अपशकून नको म्हणून त्या बोलल्या नाहीत.
महिलांचे अर्ज सर्व प्रथम देण्यात आले. तालुक्यातली महिला उमेदवार म्हणून सुरेखाताईंचा अर्ज सर्वप्रथम पुढे करण्यात आला तेव्हा "मनुदेवी मात की जय" हा तालुक्यातल्या ग्रामदैवतेच गजर कार्यकर्त्यांनी केला.
मनातल्या मनांत विघ्नहर्त्या गणेशाचे नांव घेत व अर्जावर सही करीत सुरेखा ताईंनी आपल्या राजकीय जीवनाचा शुभारंभ केला.
सगळ्यांचे अर्ज भरून झाल्यावर मनुदेवीच्या डोंगरावरील मंदिरात वासुभाऊंच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मनुदेवीचा आशीर्वाद घेऊन आजपासूनच प्रचाराची सुरुवात व जंगी सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.


सायंकाळची प्रचाराची जंगी सभा बाजार वार्डातल्या मोठ्या चौकात भरणार होती. कधी प्रजासक्ताक दिनाच्या भाषणालाही हजेरी न लावलेली सुरेखा नावाची शालीन सुशिक्षित तरुणी, एका कन्येची माता, सुविद्य प्राध्यापकाची सुविद्य पत्नी, घरातल्या वरिष्ठांची आज्ञाधारक स्नुषा... मुलगी आज राजकीय व्यासपीठावर पक्षाच्या व स्वत:च्या प्रचारासाठी एका खुर्चीत अंग चोरून बसली होती.
देसाई साहेबांच्या प्रस्तावने नंतर लगेच संतोषभाऊंनी भाषणाला सुरुवात केली. यावल तालुक्यातल्या आजवरच्या समस्या व विरोधकांनी केलेली जनतेची फसवणूक ह्यावर त्यांनी जोरदार भाषण केले. टाळ्यांच्या गजरात ते खाली बसले तोवर ते नेमके काय काय बोलले हे आठवण्याच्या मन:स्थितीतही सुरेखाताई नव्हत्या.
मान्यवर व वयोवृद्ध वासुभाऊंचे भाषण नेहमीच श्रोत्यांना भावे. तालुक्यातच लहानाचे मोठे झालेले वासुभाऊ अविवाहित होते. अनाथालयातून वाढलेल्या वासुभाऊंना 'खडकू' भाऊ म्हणूनही ओळखत. एक एक पैशाचे, ज्याला गावात खडकू म्हणतं, दान घेत त्यांनी गावाच्या विकासासाठी व खास करून शाळेसाठी निधी उभारला होता. दिवसांतून फक्त एक वेळा जेवण्याचा आजन्म संकल्प त्यांनी अनाथालयात असतानाच घेतला होता. त्यांच्या भाषणांतून गरीब व पिचलेल्या लोकांसाठीची त्यांची तळमळ दिसून आली. त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगांनी सुरेखाताईच नव्हे तर बऱ्याच उपस्थितांच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या.
भराडे बाईंचे भाषण आवेशपूर्ण होते परंतू त्याचा सर्व भर नानासाहेब पाटील व त्यांची मुले ह्यावर दिलेला होता. स्वत:च्या भाषणातून पाटलांचा करता येईल तितका पाणउतारा त्यांनी करून घेतला. झोपडपट्टी वासीयांची ही कैवारीण त्यांचे प्रश्न मांडत असताना स्वत:ला मिळणारा प्रतिसाद  बघून अजून चेतावत होती. मोठ्या आवेशात तिचे भाषण संपले.
हळूहळू ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भाषणे संपताच, नांव पुकारले गेले सुरेखाताईंचे.
गांवातली भोळी जनता समोर बसलेली होती.... कोणी दगडावर, कोणी वाड्याच्या भिंतीवर तर कोणी गच्चीच्या कठड्यावर.... महिला वर्ग कुणाच्या ओट्यावर बसला होता तर कोणाच्या दरवाज्यातल्या उंबरठ्यावर..... कुठल्या तरी दरवाज्याआडून एखादा शालीन पदर डोकावून बघत होता तर कुठे कोणी आई आपल्या रडणाऱ्या पोराला गप्प बसण्यास सांगत होती. सगळेच जण कुतूहलाने आज ही मास्तरीण बाई काय बोलणार हे ऐकायला जीवाचे कान करून बसले होते.
सुरेखाताईंना दरदरून घाम फुटला. शाळेत मुलांना शिकवणे व व्यासपीठावरून भाषण देणे ह्यातला फरक आज त्यांना कळला. पदराने कपाळावरचे घर्मबींदू टिपत व उसने आणलेले धैर्य दाखवत त्या माइक समोर जाऊन उभ्या राहिल्या. उंचाड्या विचारे साहेबांचे भाषण नेमके त्यांच्या आधीच झालेले होते म्हणून माइकची उंची व सुरेखाताईंची उंची मेळ खात नव्हती. हे लक्षात येताच माइक वाल्या पोऱ्याने विविध आवाज काढत माइक त्यांना साजेसा केला. तोवर निःशब्द शांतता सर्वदूर पसरलेली होती.


"व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर........"  पाच ते सात मिनिटांत त्यांनी आपले भाषण संपवले तेव्हा आपली कानशिले गरम झाल्याचा भास त्यांना होत होता. मर्यादित टाळ्या वाजल्या पण बऱ्याच कौतुकांच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या गेल्या असल्याचे त्यांना जाणवले.


"आज माझं भाषण कसं झालं हो ?" रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या त्यांनी राजाभाऊंना विचारले.
"छान झालं, काळजी करण्याचे कारणच नाही." आश्वस्तपणे राजाभाऊ बोलले.
"मी भाषणांत काय काय बोलली हो ?" सुरेखाताईंनी त्यांना पुढे विचारले.
त्यांच्या ह्या वाक्यावर डोळ्यांतून पाणी येईपर्यंत राजाभाऊ खळखळून हसत होते....
बाबा हसताहेत म्हणून वैशुही आनंदाने टाळ्या पिटत नाचून हसू लागली.....
सुरेखाताईंना आपल्याच लोकांसमोर मेल्याहून मेल्यासारखे झाले !


                         ~पुढील भाग लवकरच येत आहे~