वादळ जगणारी माणसे (भाग - १)

वर्षातले आठ महिने सप्टेंबर ते मे आम्ही उत्तर अमेरिकेत बंदिस्त जीवन जगतो. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या कामगार दिवसाच्या (लेबर डे) सुट्टीपासून ते मे महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या सैनिक स्मृतिदिनाच्या (मेमोरिअल डे) सुट्टीपर्यंत उत्तर अमेरिकेतील उघड्यावरील बरीचशी प्रेक्षणीय स्थळे व कार्यक्रम बंद ठेवण्यात येतात. काही मोजकी ठिकाणे सुरू असली तरी खराब हवामानामुळे मुलाबाळांसकट प्रवास करणे सहसा शक्य होत नाही. राहता राहिले ४ महिने, या दिवसांत मात्र जिथे जाता येईल त्या सर्व ठिकाणी माणसे फिरून घेतात, प्रवास करतात व आठ महिने घरांत बंदिस्त राहिल्याने आनंदात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढतात.

असे असले तरी खराब हवामान सहसा साथ सोडत नाही. थंडी संपल्याच्या आनंदात आतुरतेने घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या स्वागताला वादळी पाऊस नाहीतर 'टॉर्नेडो' नावाचे वादळ कधी उपटेल हे सांगणे तसे कठीणच. अमेरिकेचे हवामानखाते तसे बऱ्यापैकी विश्वासार्ह असल्याने रोज सकाळी उठून 'वेदर चॅनेल'वर एक नजर बरेचसे लोक टाकतातच, पण रोज मरे त्याला कोण रडे या उक्तीनुसार वाईट हवामानामुळे रोजचे कामकाज काही थांबून राहत नाही. घरात किंवा बाहेर, कधीतरी शेवटच्या क्षणापर्यंत वादळाचे निश्चित स्वरूप न कळल्याने वादळाचा जबरदस्त तडाखा अनुभवावा लागतो. प्रवास मात्र या काळात टाळता येण्याजोगा असतो, परंतु येणाऱ्या वादळाची कल्पनाच असेल तरच.

गेली ४-५ वर्षे अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागांत राहून अशी बरीच वादळे अनुभवलेली आहेत. एखाद्या जोरदार वादळामुळे घराची पडझड होणे, झाडे पडणे, गाड्या उलट्या पालट्या होणे, विजा पडणे, रस्ते, इमारती यांचे नुकसान होणे हे थोड्याफार प्रमाणात दरवर्षी होतेच. बरेचदा या वादळांच्या दरम्यान घरातील तळघराचा सर्वात सुरक्षित जागा म्हणून आसरा घ्यावा लागतो. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नॉर्थ कॅरोलायना राज्याला या वादळाने तडाखा दिल्याने सुमारे ८ माणसे मृत्युमुखी पडली व अंदाजे ५,००,००० डॉलर्सचे नुकसान झाले. दरवर्षी वादळांचे हे तांडव अनुभवावे लागत असल्याने त्याची भीती मनातून काही प्रमाणात कमी झाली असली तरीही प्रत्यक्ष वादळात अडकल्यावर काय होत असेल ते या वर्षीच्या एप्रिल महिन्यात आम्ही भर हायवेवर अनुभवले. निसर्गाच्या या रुद्रावताराविषयी लिहिण्यापूर्वी टॉर्नेडोबद्दल थोडी अधिक माहिती द्यायला आवडेल.

टॉर्नेडो म्हणजे आकाशातील ढगाला लटकलेला आणि स्वत:भोवती जोरदार गिरक्या घेणाऱ्या वाऱ्याचा स्तंभ. या टॉर्नेडोचे एकंदरीत स्वरूप बरेचदा एखाद्या नरसाळ्याप्रमाणे दिसते. आकाशात निर्माण झालेला हा स्तंभ जमिनीला चिकटला की त्याचे रुपांतर प्रत्यक्ष टॉर्नेडोत होते. कॅनडावरून येणारी थंड हवा व अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागातील उष्ण हवा यांच्या घर्षणामुळे व या वेगाने वाहणाऱ्या हवेसोबत येणाऱ्या प्रचंड ढगांमुळे टॉर्नेडोंचा जन्म होतो. या वादळांच्या दरम्यान बरेचदा ताशी १०० किंवा अधिक मैलांच्या वेगाने वारे वाहतात. अर्थात दरवेळेसच टॉर्नेडो तयार न होता ही वादळे विजा-गडगडाट होण्यापर्यंत सीमित राहतात. अशा वादळांची आम्हाला सवय आहे, सर्रकन ऊन सरून आकाशात ढग येणे, तास दोन तास मुसळधार पाऊस कोसळणे आणि त्यापुढच्या क्षणाला काहीच न घडल्यासारखे स्वच्छ ऊन पडणे या ऊन-पावसाच्या खेळाला आम्ही सरावलो आहोत, पण भर टॉर्नेडोत अडकल्यावर काय परिस्थिती होते ते यापूर्वी अनुभवले नव्हते.


टॉर्नेडोचा खेळ तसा लहानसाच असतो. बरेचदा ८ ते १० मिनिटांतच आटोपतो. परंतु एकापाठोपाठ एक असे अनेक टॉर्नेडो थडकण्याची शक्यताही असते. अशावेळी अनेक प्रकारच्या संपत्तीचे अपरिमित नुकसान व जीवितहानी होण्याची शक्यता असते. अमेरिकेच्या काही भागांत दरवर्षी सुमारे १,००० टॉर्नेडो अनुभवण्यास मिळतात. ही वादळे आपल्यासोबत प्रचंड वेगाने वाहणारे वारे, विजा, पाऊस व बरेचदा गारा घेऊन येतात. टॉर्नेडोची रुंदी सुमारे १ मैलाचा परिसर व्यापू शकते. ज्या भागावरून टॉर्नेडो सरकतो तिथे घरांची पडझड होणे, वृक्ष उन्मळून पडणे, गाड्या उलट्यापालट्या होऊन फेकल्या जाणे हे सहज होते.


या वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आम्ही फिरायला केंटकी राज्यातील केवसिटी येथे जाण्याचा बेत आखला होता. मुलीला 'स्प्रिंगब्रेक' (वसंत ऋतूत येणारी सुट्टी) होता. ५-६ महिने घरांत बसून जीव विटला होता. तापमानही जरा वर चढले होते, आणि मुख्य म्हणजे केवसिटीला असणारी सर्व आकर्षणे पर्यटकांसाठी सुरू ठेवण्यात आली होती. निवांतपणे प्रवास व्हावा या हेतूने माझ्या नवऱ्याने शुक्रवारी सुट्टी काढली होती व त्यानुसार आम्ही शुक्रवारी पहाटेच घराबाहेर पडलो. निघण्यापूर्वी केवसिटीला हवामान कसे असावे याचा अंदाज अर्थातच घेतला होता. वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती परंतु अशी वादळे नित्याचीच असल्याने त्यात वावगे वाटण्यासारखे काहीच नव्हते व त्यावेळेपर्यंत धोक्याची सूचनाही देण्यात आली नव्हती. आमच्या समोर नेमके काय वाढून ठेवले आहे त्याची फारशी कल्पना आली नाही.

केवसिटीला जमिनीखाली प्रचंड आकाराच्या नैसर्गिक गुहा आहेत. येणाऱ्या पर्यटकांना त्यांचे मुख्य आकर्षण वाटते. याशिवाय तेथील डोंगरदऱ्यांतील उंचसखल भागांत घोडेस्वारी करता येते. उघड्या झोपाळ्यांतून डोंगरमाथ्यावर नेणाऱ्या स्कायलिफ्ट्स आणि तिथून एका छोट्याशा गाडीत बसून खाली घसरता येईल अशा अल्पाइन स्लाइड्स नावाच्या घसरगुंड्या, डायनॉसोर्सच्या प्रचंड प्रतिकृती असलेले उद्यान अशा विविध आकर्षणांनी हे ठिकाण नटलेले आहे. घरापासून केवसिटीला पोहचण्यासाठी आम्हाला सुमारे २२० मैलांचा पल्ला गाठायचा होता. २२० मैल म्हणजे सुमारे ४ तास प्रवास या हिशेबाने आम्ही सकाळीच निघालो होतो. पहिल्या दिवशी त्या परिसरातील सर्व आकर्षणांची मजा लुटायची आणि दुसऱ्या दिवशी आरामात केवसिटीच्या "मॅमथ केव" नावाच्या नैसर्गिक गुहा पाहायला जायचे असा बेत होता. या परिसरापासून ५ मैलावर असणाऱ्या 'हॉर्स केव' या ठिकाणी हॉटेलात आम्ही आमची राहण्याची सोयही केली होती.


खुलासा: हवामानाच्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे आणि विषयातील तज्ज्ञ नसताना टॉर्नेडोविषयी सर्वसामान्य माहिती दिली आहे तरी काही त्रुटी आढळण्याची शक्यता आहे; चू. भू. द्या. घ्या.


सर्व चित्रे विकिपिडियाच्या सहाय्याने घेतली आहेत.


(क्रमशः)