वेदनांची मांडतो आरास मी

भासतो त्यांना सुखाचा दास मी
वेदनांची मांडतो आरास मी!


पाहतो ते ते खरे मी मानतो
केवढे जपतो उराशी भास मी...


वेळ जो लागायचा तो लागतो
मोजतो आहे उगाचच श्वास मी


लोपले सरकारही...पाऊसही
घेतला हाती अता गळफास मी


जायचे होते तिला, गेलीच ती
थांबवू शकलो कधी मधुमास मी?


नेत नाही ती मला कोणाकडे
जे नको ते बोलतो हमखास मी!


का अचंबा वाटतो गुण पाहुनी
आजवर केला कुठे अभ्यास मी!


ओळखू आली सख्या गणिते तुझी
ऐकला जेंव्हा तुझा इतिहास मी!