साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण साधू यांची निवड

डॉ. अरुण साधू यांनी ई सकाळशी साधलेला संवाद पॉडकास्टवर ऐका


दै. सकाळचा अग्रलेख -


साधू! साधू!!
नामवंत कादंबरीकार आणि महाराष्ट्रातील प्रत्येक काळच्या तरुण पिढीचे आवडते लेखक अरुण साधू यांची नागपूरला होणाऱ्या ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने साऱ्या मराठी जगतालाच आनंद झाला आहे. साहित्य आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांत आपल्या लेखणीच्या गुणवत्तेच्या बळावर साधूंचे नाव गेली सुमारे चार- साडेचार दशके लौकिक पावले आहे. विशेष म्हणजे इंग्रजी वृत्तपत्रांच्या जगात आपल्या बातमीदारीचा व विश्‍लेषणपूर्ण अशा वार्तापत्रांचा ठसा उमटविणारा हा लेखक आजच्या मराठी साहित्याचा एक अभिमानास्पद चेहरा आहे. या लेखकाचा चेहरा मराठी साहित्याला जणू चिरपरिचित आहे. मुंबई दिनांक, सिंहासन, शोधयात्रा यांसारख्या सुंदर कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा परीघ विस्तारला आहे. विशेषतः साधूंच्या मुंबई दिनांकने तिथले जे जग टिपले आहे, त्याचे वेगळेपण वाचताना आपल्या प्रत्ययाला येते. विदर्भातील परतवाडा (जि. अमरावती) या गावचा हा मूळचा लेखक. पत्रकारितेची सुरवात त्यांनी पुण्यात केली. "माणूस'सारखे वेगळे साप्ताहिक आणि त्यानंतर "केसरी'तून पत्रकार-लेखक म्हणून त्यांनी काम केले. डाव्या चळवळीचा अभ्यास आणि वेगवेगळ्या माणसांचा शोध घेण्याचा त्यांच्या प्रतिभेचा आवाका असा होता, की त्यामुळे अनेक वेगळी पुस्तके साधूंनी लिहिली आणि त्याचे सर्व थरांत स्वागत झाले. "सांगत्ये ऐका'च्या हंसा वाडकर यांचे आत्मकथन "माणूस'च्या माध्यमातून साधूंनी लोकांसमोर आणले आणि त्यामुळे चंदेरी दुनियेमागच्या खऱ्या वेदना समजल्या. महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक पट उलगडणारी कादंबरी म्हणून मुंबई दिनांकची नोंद करता येईल. याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी सिंहासन लिहिले. राजकारणाचे ताणे-बाणे, मुंबईसारख्या महानगराचे रंगरूप आणि त्याच वेळी सामाजिक अन्याय, विसंगती यांना थे
टपणाने भिडण्याचे धैर्य त्यांच्या लेखणीत आहे. त्यामुळेच "बहिष्कृत'मध्ये जातिव्यवस्थेतील होरपळ त्यांनी शब्दबद्ध केली. "त्रिशंकू' ही दलित युवा विश्‍वाचे मानस व्यक्त करणारी उत्कृष्ट कादंबरी लिहून साधूंनी महानगरातील या वर्गाचा जणू एक कॅनव्हॉसच चितारला. आज मुंबईविषयी फिक्‍शन आणि नॉनफिक्‍शन स्वरूपात उदंड लेखन प्रसिद्ध होते आहे. त्याच्या कितीतरी अगोदर साधूंनी मुंबई समोर ठेवून जे लेखन केले, ते आजही अंतर्मुख करणारे आहे.

आज मराठीत साधूंसारखा बहुविध लेखन करणारा लेखक दुर्मिळ आहे. सच्चा पत्रकार, पत्रकारितेचा शिक्षक आणि ऐट न मिरवणारा; पण बांधिलकी मानणारा कार्यकर्ता हे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. ग्रंथाली चळवळीचे महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्ते त्यांना ओळखतात ते आपले सहकारी मित्र म्हणून. मराठी- इंग्रजी वृत्तपत्रांतील त्यांचे स्थानही असेच सर्वांना सामावणारे आहे. "स्टेट्‌समन'सारख्या नामवंत दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून किंवा "फ्री प्रेस जर्नल'चे संपादक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी लक्षणीय अशीच राहिली. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुखपदाची धुराही त्यांनी पाच वर्षे सांभाळली. अलीकडेच बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयाने आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. नागपूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साधूंची निवड ही व्यापक अर्थाने सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या लेखकाची निवड असे म्हटले पाहिजे. मी स्वतःसाठी लिहितो, असे म्हणणारा हा आत्मकेंद्रित लेखक नाही. पत्रकार म्हणून काम करताना शिदोरीत आलेल्या जीवनानुभवाचे संचित व खोल निरीक्षण आपल्या लेखनात त्यांनी ज्या गुणवत्तेने उतरविले, त्याला तोड नाही. म्हणूनच ते प्रत्येक पिढीचे लेखक राहिले आहेत. अभ्यासपूर्ण मांडणी करणारे, इतिहासाचे भान देणारे व समकालीन भाष्य करणारे, रशिया व चीन येथील स्थितीवरील ग्रंथही त्यांनी लिहून मोठे काम केले आहे. मराठी भाषा आणि संस्कृती याबद्दलचा त्यांचा आग्रह व त्यासाठी करावयाचे प्रयत्न याची काहीशी मांडणी त्यांनी पुण्यातील एक-दोन व्याख्यानांत केली होती; मात्र यासाठी साहित्य संस्था अथवा संघटनांचे एकूण स्वरूप आज बदलता येईल का, संमेलनाध्यक्षांच्या निवडणूक पद्धतीत बदल करावा का, असे काही मुद्दे त्यांच्यासमोर निश्‍चितच येतील. साहित्य संस्थांतील केंद
्रीकरण आणि तेथील व्यक्तिसापेक्ष असे राजकारण हे विषय संमेलनाध्यक्ष म्हणून ते रोखठोकपणे मांडतील ही अपेक्षा आहे. सुजाण वाचकांपर्यंत आपला मुद्दा नेमकेपणाने पोहोचविणारा आणि तरीही प्रचारी न वाटणारा असा हा लेखक. साधूंचे मनःपूर्वक अभिनंदन!