मी कुठे दिसलोच तर



मी कुठे दिसलोच तर कळवा मलाही
एवढे फसलात तर फसवा मलाही

मी गुन्ह्यांचा ठेवतो कोठे पुरावा?
सज्जनांच्या सोबती बसवा मलाही

काय म्हणता? ती मला स्मरते अजूनी?
वाटते आहे खरी अफवा मलाही

हे पहा मी आणले डोळ्यांत पाणी
या हसा हुकमी ! जरा हसवा मलाही

मी कशाला पोळल्याचे दुःख मानू?
सोसतो आहेच की वणवा मलाही

श्वास थकले की बरोबर मार्ग निघतो
जीवनाचा समजला चकवा मलाही

शब्द काही ठेवुनी जातो पुढे मी
जीव लावा त्यांस अन जगवा मलाही