"मला भारताची लाज वाटली"

काल भारतीय मित्रमंडळींबरोबर गप्पांत एकाने आमच्या दोन सहकाऱ्यांचे किस्से सांगितले. एक इंग्रज आणि एक फ्रेंच असे हे दोन सहकारी कामानिमित्ताने व नंतर फिरायला म्हणून नुकतेच भारतात जाऊन आले आहेत. ते दोघे आमच्या या मित्राच्या गटात काम करतात.


इंग्रज माणूस मार्टिन सहा महिन्यांसाठी बंगलोरात कामासाठी गेला होता. परत आल्यावर म्हणाला, "नेवर अगेन!"


"भारतात जाण्याची वेळ माझ्यावर पुन्हा कधी न येवो."


मित्राने काळजीने चौकशी केली की काय झाले? तर मार्टिनच्या पत्नीशी बंगलोरातल्या धटिंगणांनी छेडछाड केली असे कळले. ते जिकडे जातील तिकडे लोक सतत तिच्याकडे बघत. तिला सहन होईना. ती दोन तीन महिने घराबाहेर पडली नाही. "अश्या लोकांना पोलीस अटक कशी करत नाहीत?" मार्टिन म्हणाला. शिवाय मुंबईत उतरल्यापासून प्रत्येक वळणावर लोक पैसे मागत. कायम झालेल्या बिलापेक्षा जास्त थोडे काहीतरी 'द्या की साहेब' असे म्हणत. आमच्या भारतातल्या कार्यालयातल्या शिपायानेही म्हणे त्याला 'टीप' मागितली.


एकूण गोष्ट ऐकून मित्राला काय बोलावे सुचेना. तितक्यात भारतात सुट्टी घालवून परतलेला फ्रेंच सहकारी लुई म्हणाला, "वाईट वाटून घेऊ नकोस. पण मला तर भारतात जिकडे तिकडे नुसते भिकारी भेटले! सतत हात पसरलेले." लुईची चिनी सखीही लोकांच्या नजरांनी त्रस्त झाली. आणि चीनमध्ये असे काही नसते. भारत अजूनही मागासलेला आहे, भारतीयांना नागरी संकेत (सिविल सेन्स) अजून नाही वगैरेही म्हणाली. हे लोक गेले होते वाराणसीला!


एकूण सगळे ऐकून मित्राला काय करावे कळेना. मग या दोघांनीच त्याची भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली. पण तुम्ही लोक कसे काय राहता तिथे हा त्यांचा प्रश्न होताच.


"खरं सांगतो, मला भारताची इतकी लाज वाटली ना..." मित्र आमच्याशी बोलताना म्हणाला. तर एक मैत्रिण म्हणाली, "ह्या! त्यात काय! भारतीय मुलींना अश्या नजरांची, थोड्या छेडखानीची सवय असते." दुसरा एक मित्र म्हणाला, "आपण इथे नाही का टीप देत? मग भारतीय लोकांनी टीप मागितली तर काय एव्हढे?" नंतर मोठी जोरदार चर्चा व वादावादी झाली.


तुम्हाला काय वाटते? भारतीय संस्कृती जागतिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे का? पर्यटकांनी भारतात येताना काळजी घ्यावी का? (जसे अंगभर कपडे घालावेत?) की भारतीयांना पर्यटकांशी कसे वागावे याचे शिक्षण देणे आवश्यक आहे? 'टीप' (की भीक?) संस्कृतीचे काय?