कॉन्फेस्ट - मी मुक्तं!


कॉन्फेस्ट


मी मुक्तं!


आणि मग मी उठलो.  आल्यापासून अंघोळ अशी केलीच नव्हती. तंबू कडे  गेलो. अनु, सूझी शी बोलत बोलत अजून आवरतच होती. तिला थोडी मदत केली. अंघोळी चा प्रस्ताव मांडला. तीच्या मनात पण तेच होतं. पण ती म्हणाली की, पण जरा जपूनच, आधी जाऊन पाहूया कसे काय आहे ते.


कपडे घेऊन निघालो. अंघोळी साठी काही तंबू लावलेले होते. एका ठिकाणी बरेचसे शॉवर्स पण होते. लाकडावर पाणी तापवले जात होते आणि ते शॉवर्स मधून येत होते. एक वाफ घ्यायचा तंबू होता. मड बाथ तर होताच, आणि शिवाय समोरच नदी! 'इतके' कपडे घेऊन आणि घालून आलेले फक्त आम्हीच होतो. इतर सगळे मुक्तपणे नैसर्गिक अवस्थेत मजेत वावरत होते. मला परत 'कपड्यांची लाज' वाटली. मी अनु ला सांगून टाकले "मी पण 'त्यांच्यात' सामील होतो आहे!"


आणि एका क्षणात मी पण चक्क मुक्त झालो! अहाहा - हवा चांगलीच गार होती. आणि सदैव झाकलेल्या ठिकाणांना तर चांगलीच थंडी वाजत होती. अनु ला म्हणालो तू गार्गी ला पाहा मी हा चाललो! आणि घाई घाई  ने वाफेच्या तंबू मध्ये घुसलो. एकदम छान वाटले पण काहीच दिसत नव्हते. सगळी वाफ. पाया खालच्या प्लॅस्टिक चा स्पर्श चुरचूर आवाजा सकट जाणवत होता. लोकांच्या बोलण्याचे आवाज येत होते. जवळचा एक स्त्री आवाज आला, "


"वुई वेन्ट टु द सेक्सेस प्लेस लास्ट ईव्हिनिंग"


"इट वॉज व्हेरी गुड. आय लाइक्ड इट, बट गॅरी डिडंट!"


"ही थॉट देर इज समथिंग अबाउट डुइंग इट, जस्ट लाइक आदर बॉइज! "


आता माझं पण कुतूहल आता जागृत झालं. कालच्या नाच आणि गप्पांमध्ये हे 'सेक्सेस' चे प्रकरण मी विसरूनच गेलो होतो.


पुढच्या बोलण्यातून असं कळलं की, 'सेक्सेस प्लेस' ला कालचा कार्यक्रम छान होता. त्यात शृंगार आणि त्यातल्या तरलतेतून येणारे एक वेगळे स्वतः चे भान कसे सापडावे याचे विवेचन झाले. निसर्गाशी एकरूप होण्याची एक संधी आपल्याला निसर्गानेच उपलब्ध करून दिली आहे. त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. ऑरगॅझम हा पण एक ध्यानाचाच भाग होऊ शकतो असा साधारण मथितार्थ पण 'सगळी' उत्तरे देणारे एक मोकळे-ढाकळे वर्कशॉप असे त्याचे स्वरूप.


माझं कुतूहल शमलं!


वाफेत बसल्या मुळे काही वेळात छान घाम पण आला. पण बाहेर गेलो तर थंडी वाजेल असं मनाशी म्हणत बराच वेळ आतच राहिलो पण शेवटी बाहेर आलोच.  चटकन शॉवर च्या तंबू कडे पळत पळत गेलो. पण काय तिथे एक रांग! मग एका बाई च्या मागे मी आपला कुडकुडत उभा राहिलो.  समोरच्या मड बाथ च्या डबक्यात काही मुलं मुली होती. काहींनी त्या चिखलाचा लेप अंगावर लावून घेतला होता, आणि आता शेकोटी जवळ जाऊन तो लेप वाळवत बसले होते.


आता लाज वाटायची संपली होती. मी पण त्यांतलाच एक हे आत कुठे तरी मान्य झाले होते. थोड्या वेळाने माझा नंबर आला.


हात तीच्या! हे पाणी पण अगदीच कोमट होते. नाही पेक्षा बरे येवढेच! जरा आरामात अंघोळ करू असे वाटले पण माझ्या मागे अजून चार सहा मुलं मुली रांगेत उभ्या!  शेवटी नाद सोडला आणि मी बाहेर आलो.


अनु ला आत ऐकलेला किस्सा सांगितला, तोवर ती शॉवर घेऊन, गार्गी ला पण अंघोळ घालून, आजच्या कार्यक्रमांचा फलक पण पाहून आली होती, ती म्हणाली, आज आपण दुपारी मसाजला जाऊ या. तू हवं तर फलक पाहून ये तिथे बरंच काही लिहिलंय.


फलकावर वेळ होती दोन वाजे ची. त्या खाली च अजून एक सेशन होते.  'हाऊ टू डू सेंशूअल मसाज टू युवर पार्टनर' मला पण खरं उत्सुकता वाटली पण अनु ला कसं म्हणायचं असा जरा प्रश्न पण पडला.


---


परत आलो तर नदी किनाऱ्यावर आठ नऊ कपल्स एकमेकांना मिठ्या मारून उभे. त्यांना माझ्या सारखंच पाहत उभ्या असलेल्या एक माणसाला विचारलं, "व्हॉट्स धिस गोइंग?"


"दे आर टिचींग इंटिमेट डांसिंग, आय डोंट हॅव पार्ट्नर सो आय कांट जॉईन!"


त्याने उत्तर दिले.


एक माणूस त्या कपल्स ना नाचाच्या स्टेप्स शिकवत होता. एकमेकांना घट्ट मिठ्या मारून, एकमेकांना उचलून करायच्या स्टेप्स पाहून, मी पाय काढताच घेतला. त्या साठी लागणारे मसल्स पण माझ्या कडे नव्हते आणि लवचिकता तर त्याहून नाही! कसे काय कुणाला माहीत पण, त्या सगळ्यात एक अती लट्ठ कपल पण सहभागी होते! ते कसे हा नाच करणार होते कुणास ठाऊक.


---


परत रमत गमत खाण्याच्या शामियान्याकडे गेलो. आता गर्दी नव्हती. चहा घेऊन त्या शामियान्याच्या गालिच्यावर जरा आरामात बसलो. गार्गी ला पण जरा मोकळे खेळायला मिळाले. तेव्हढ्यात तिथे एक आजीबाई बाबा गाडीत एका छोट्या बाळाला घेऊन आल्या. मी अनुला बाळ दाखवले, तर ती म्हणाली अरे ती बाळ त्या आजी च्या मुली चं वगैरे नाहीये. तू वाफ घेत होतास तेव्हा मला या आजीबाई भेटल्या आणि आमच्या गप्प चालल्या होत्या. त्यांनी सांगितले, एक जर्मन मुलगी आली होती शिकायला इथे, तिला एक मुलगा भेटला, त्यांचं जमलं आणि त्यांना आता हे बाळ झालंय. मी म्हणालो "वा बऱंय की मग आत ती राहणार असेल इथेच". "नाही रे!, त्यांचं आत भांडण झालंय, आणि ते भांडण पाहत असलेल्या आजी बाई या बाळाला सांभाळतायत. आता त्यांचं एकत्रं राहणं काही खरं नाही, तिला आता इथेच एक नवीन बॉयफ्रेंड मिळालाय " 


मी त्या गोजिरवाण्या बाळाकडे बघत बसलो!


-निनाद

क्रमशः