राहिलो न अता कुणाचा दास मी - अमिताभ बच्चन

या गजलेच्या विडंबनाचे दीड बाजीराव यांनी केलेले रसग्रहण वाचून आम्ही कमालीचे व्यथित झालो आहोत. कविता कवीकडून लिहून झाली की वाचकांनी आपापल्या मगदुराप्रमाणे तिचे अर्थ काढावेत वगैरे सगळे ठीक आहे आणि 'औदुंबर' चे आमच्या कुळकर्णीमास्तरांनी सांगितलेले विविध अर्थ आम्ही आमच्या वर्गभगिनींच्या पाठमोऱ्या आकृत्या न्याहाळत मनोभावे ऐकलेही होते. पण कोणतीही सांकेतिकता नसताना इतक्या उघडउघड अर्थाच्या कवितेते दी.बा. यांनी एक साईज कमी असलेल्या बनियनमध्ये पोट कोंबावे तसे कोंबलेले अर्थ वाचून आम्हाला मराठी कवितेच्या भवितव्याविषयी काळजी लागून राहिली आहे. आमच्या मते कारकून यांच्या या गजलेइतकी कळायला सोपी गजल गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही. दी. बा. यांनी आपल्या कल्पनेचे वारू चौखूर उधळवून कारकून यांच्या करवतकाठी धोतरावर आपल्या नसत्या रसग्रहणाचे डिनर ज्याकेट चढवले आहे. मुळात कारकून यांची ही गजल अभिनयसम्राट मधुशालाकर्तासुत राजमान्य राजश्री अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यावर बेतलेली आहे हे अगदी तात्या अभ्यंकरसुद्धा सांगू शकतील.


राहिलो न अता कुणाचा दास मी
ठेवला ना बक्षिसाचा ध्यास मी!
फिल्मफेअर झाले, आयफा झाले... सगळी बक्षिसे जमवून झाली. ए.बी. सी.एल. चे कर्ज फेडून झाले. श्वेताला मुलगा झाला, अभिषेकही चार पैसे कमवायला लागलाय. आता कशाला मी कुणाचे मिंधेपण घ्यावे? आता...

ऐकले ते ते खरे मी मानतो 
ठेवतो अफवेवरी विश्वास मी...
कुणी म्हणतो की परवा वाराणसीत त्याने ऍशशी गांधर्व विवाह केला म्हणून, कुणी म्हणतो 'धूम२' बघून त्याने हृतिकला दम भरला म्हणून... पण मी कशाला त्यावर विश्वास ठेऊ? माझे मला पुरे झाले आहे...


वेळ जो लागायचा तो लागतो.....
एकदाचा सोडला नि:श्वास मी
दम्याचा त्रास जुनाच आहे माझा. त्यातून परवा बद्धकोष्ठाचा त्रास सुरु झाला. रामदेवबाबा म्हणाले की प्राणायम करा. दोन्ही त्रास कमी होतील. म्हटलं, करतो. पण कसलं काय...


ढापल्या कविता कधी माझ्या कुणी? 
घेत गेलो काळजीही खास मी....
बाबूजींच्या कवितांची रॉयल्टी माझ्यकडेच येते. त्यात वाटा मागू नकोस म्हणून अजिताभला अमरसिंगांकडून हग्या दम भरवला आहे.


जायचे होते तिला, गेलीच ती
वादळानंतर कशास उदास मी!
अधूनमधून दिसते तशी ती. मला बक्षीस वगैरे मिळाले की हे साले मिडियावाले जयाऐवजी तिच्यावरच फोकस करतात. जरा हडकलीय हल्ली. डायही करते वाटतं. पण ते डोळे, ती जुल्फे, तो तीळ... हाय!


नेत असते ती मला सगळ्यांकडे ...
जे हवे ते बोलतो हमखास मी!
इथे ती म्हणजे 'ती' नाही बरं का! इथे ती म्हणजे आहे समाजवादी पार्टी. लखनौला चला म्हटलं की मी चाललो लखनौला. आज काय अलाहाबाद, चला अलाहाबाद. आज काय मुलायमसिंगांच्या सभेत 'जिसकी बीवी लंबी' म्हणायचं आहे, की सुरु करतो मी 'मेरे अंगने में...' 


का अचंबा वाटतो मज पाहुनी?..
(खेळतो राधेसवे हा रास मी! )
हा शेर वाचकांची दिशाभूल करण्यासाठी आहे. मुळात हा शेर
आज गब्बर, काल जय, होतोच मी
मोजतो नोटांची केवळ रास मी
असा होता. अमर म्हणाला 'बेटा संभालके. ये इनकमटॅक्सवाले छोडेंगे नही. और फिर सोनियाभाभीके साथ भी आजकल जमता नही है तेरा' मग मी आपला हा शेर पाडला. पण घ्या, काढणाऱ्यांनी त्यातूनही अर्थ काढलेच!


ओळखू आले सख्या डीएनए
शोधला जेंव्हा तुझा इतिहास मी!
आजकाल जरा भविष्यविद्येचा अभ्यास चाललाय. या गजलेवर चेहरा बदलून दी.बा. काहीतरी लिहिणार हे आधीच कळाले होते. अरे जा रे जा बाजीरावा, तुझे सदस्यत्व बघून सगळी कुंडली सांगीन मी!


कारकून यांच्या  इतक्या साध्या अर्थाच्या गजलेतेतून दी.बा. यांनी टयूबमधून शेवटची टूथपेस्ट पिळून काढावी तसे काढलेले अर्थ पाहून आम्हास भरून आले आहे. कारकून यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.