आव्हान - काही मनोगते - (अज़ून)एक रसग्रहण!!!


कुमार ज़ावडेकरांच्या आव्हानाला मनोगतावरील वीर बाजीरावांसारखे (दीड?) पराक्रमी (की दीड बाजीरावांसारखे वीर पराक्रमी?), रावसाहेब नि जिजींसारखे रथी-महारथी असूनही रसग्रहणाच्या रुपात अज़ून कुणीच आव्हान दिलेले नाही, हे पाहून मला स्वस्थ बसवेना. त्यातून गुरुवारी रात्री स्वयंपाकाची पाळी असली, की माझ्या अंगात अनायसे वीरश्री संचारलेली असतेच. तिचाच परिणाम म्हणून हे काहीतरी लिहितोय. हे रसग्रहण "पाडले" आहे की "झाले आहे" (म्हणजे तात्या अभ्यंकरांना कविता होते, तसे मला रसग्रहण झाले आहे, या अर्थी नव्हे!!) हे माझ्यापेक्षा इतर ज़ाणकारच जास्त चांगले सांगू शकतील. मात्र तरीही, हे जे काही आहे, ते माझ्या(च) साइज़च्या गंजीफ़्रॉकात घट्ट बसवले आहे, हे मात्र आवर्ज़ून नमूद करावेसे वाटते.


रोजचे उसनेच हे अवसान माझे
वादळाला वाटते आव्हान माझे!


--- हे सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट सामन्यांदरम्यान येणारी मोसमी वादळं दोघांचं कॉमन मनोगत आहे. शारजातल्या सचिनरूपी वादळाला घाबरलेलं ते वाळूचं वादळ ज़े गायब झालं, ते नंतर दिसेनासच झालं. त्यापासून धडा घेऊन कुठलंही प्रादेशिक वादळ भारताच्या वाटेला ज़ात नाही. आणि अनायसे भारत हरतोच आहे, तर आणि मी ज़ाऊन कशाला कडमडायचं, या विचाराने सध्या दक्षिण आफ़्रिकेत तरी कुठलंही वादळ फ़िरकलेलं नाही. देव न अकरो, पण उद्या आपण तिकडे ज़ायचो नि आपलं आव्हान पेलायला सचिन पेटून उठलाच, तर भारत जिंकायचा, अशी भीती दक्षिण आफ़्रिकन वादळाच्या मनात आहे. उसनं अवसान आणणाऱ्या मोसमी वादळाला सचिनरूपी वादळाचं आव्हान आहे.


अर्थात, ज्या खेळपट्ट्यांवर, मैदानांवर मागच्या विश्वचषक स्पर्धेत भारताची फ़लंदाजी (म्हणजे थोडक्यात सचिन तेंडुलकर) बहरली, त्याच्यानंतर सचिनचं वादळही ओसरलं म्हणा. त्यामुळे उसनं अवसान आणून तोही एखाद्या स्फ़ूर्तीदायक वादळाची वाट बघत असला, तरी नेल, पोलॉक,केंप,ली,मॅकग्रा अशा वादळांना "सचिन तेंडुलकर" नावाचे आव्हान आज़ही अस्तित्त्वात असल्याची ज़ाणीव असते, हे पाहून मला भारताचा अभिमान वाटतो. (हे "मला भारताचा अभिमान वाटला" चर्चेत ज़ाऊ शकते) उतरतं वय नि संघाचा खराब फ़ॉर्म पाहता सचिन सध्या उसन्या अवसानाने फ़लंदाजी करत असेलही; पण सचिनरूपी दबदबा अनेक वादळांना आज़ही आव्हान वाटतो, हे सचिनने वेळोवेळी सिद्ध केलंय.


काळजी का वाटते माझी तुम्हांला?
चालले आहे खरोखर छान माझे!


--- हे सिनेअभिनेता अक्षयकुमारचे मनोगत आहे. आयेशा झुल्का,शिल्पा शेट्टीला खेळून काढल्यानंतर ट्विंकल खन्नाकडून जेव्हा तो हिट विकेट झाला, त्यावेळी त्याच्या हितचिंतकांनी हळहळ व्यक्त केली. तिच्याशी लग्नानंतर (अहो म्हणूनच तर म्हटलं ना हिटविकेट झाला म्हणून!! ;-)) त्याच्या अभिनयात (कशी कोण ज़ाणे) पण सुधारणा झाली. मध्यंतरी प्रियांका चोप्रा नामक (हवहवंसं) वादळ त्याचा अभिनय नि संसार दोन्ही घुसळणार/बुडवणार म्हणून चाहत्यांना,निर्माता-दिग्दर्शकांना त्याची काळजी लागून राहिली होती. तेव्हा त्याने ट्विंकल नि स्वतःच्या वतीने आपल्या बाळाची कसम वगैरे खाऊन ज़े जॉइंट स्टेटमेंट दिले असेल, ते स्टेटमेंट म्हणजे हा शेर आहे.


या शेरात गझलकाराने मोठ्या खुबीने अर्थाचा आणखी एक पदर लपवला आहे. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मध्ये आपण ज़से पुट साइन एक्स इक्वल टू टी करतो, तसे पुट अक्षयकुमार = सलमान खान, आयेशा = सोमी अली, शिल्पा शेट्टी = ऐश्वर्या राय आणि प्रियांका = कतरिना कैफ़ याप्रमाणे केल्यास वरील परिच्छेदातील अक्षयकुमारच्या कारकिर्दीचे इंटिग्रेशन हे सलमान खानच्या कारकिर्दीचे इंटिग्रेशन म्हणूनही चपखल बसते (बारिंग आपल्या बाळाची कसम खाणे वगैरे!!!)


खेळ चालू दे इथे निंदा-स्तुतीचा
माहिती आहे मलाही स्थान माझे...


--- हे लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जींचे मनोगत वाटते. लोकसभेतील दैनंदिन कामकाज़ाचे मूर्तीमंत चित्रण गझलकाराने सोमनाथदांच्या तोंडी हा शेर योजून करविले आहे. सभासद एकमेकांना यथेच्छ शिव्याशाप देतायत, माइक्स, पेपरवेट्स, कागद इकडून तिकडे भिरकावले जातायत, राजदंड पळवला ज़ातोय; पण असं सगळं होत असलं तरीही आपण आपली खुर्ची सोडून उठायचे नाही, हे सोमनाथदांना ठाऊक आहे. आणि यदाकदाचित तीही सोडून ज़ायची पाळी आलीच, तर लोकसभा अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करायचा अधिकार आपल्याला आहे, याची त्यांना ज़ाणीव आहे. थरथरत्या आवाज़ात समस्त लोकसभेला उद्देशून त्यांनी हा शेर म्हटला आहे, असे वाटते.


मी कसा पडलो मला कळलेच नाही
(उंच आकाशात होते यान माझे)


--- रस्त्यावरील चालतीबोलती प्रेक्षणीय स्थळे पाहत ज़ाताना केळीच्या सालीवरून घसरलेला हीरो हीरालाल, निवडणुकीत सपशेल मार खाल्लेला नि अनामत रक्कम ज़प्त झालेला कुणी प्रामाणिक अपक्ष उमेदवार, भारतीय क्रिकेट संघाच्या सराव शिबिरादरम्यान खोखो खेळताना धडपडलेला युवराज सिंग, झालंच तर व्हिक्टोरियाज़ सिक्रेटच्या जाहिरातीकडे हर्षभरीत नज़रेने बघत चालणारी कुणि गुड्डी मारुती, यांच्यापैकी कुणाचेही मनोगत असेल, असा हा शेर आहे. त्यामुळे वाचकांच्या कल्पनाशक्तीला गझलकाराने पूर्ण वाव ठेवला आहे. 'कसा पडलो' च्या ऐवजी 'कशी पडले' असे केले असते तर "आजकल पाँव ज़मीं पर नही पडते मेरे, बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए" म्हणणारी "घर" मधली चिकणी रेखा आम्हांला आठवली असती. तिच्या तुलनेत राकेश रोशन, फ़ारूख शेख इ. नायक म्हणजे उंच आकाशातले 'यान' नसून 'ध्यान' होते. इन दॅट केस देन, 'कसा पडलो'च्या ऐवजी 'कशी पडले' नि 'यान'च्या ऐवजी 'ध्यान' असे सूक्ष्म बदल शेराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात, असे आमचे मत पडले.


जीवनाचा मुक्त मी आस्वाद घेतो
विसरुनी सन्मान वा अपमान माझे!


--- मनोगतावरील एकेकाळी बहरास आलेल्या "आपापसात" या सदराचे हे मनोगत आहे. साध्या तुरुंगातून अंडा सेलमध्ये ज़शी एखाद्या अट्टल गुन्हेगाराची रवानगी होते, तसे 'चर्चा' वा चर्चेतर विभागातून विषयांतर म्हणून या विभागात रवानगी झालेले साहित्य, कोणत्याही विषयावर तब्येतीने चर्चा(?!) करणारी मंडळी या सगळ्यांचे नंदनवन म्हणजे "आपापसात". आपापसात हा वीक एंटिटी सेट आहे. म्हणजे आपापसातचे अस्तित्त्वच मुळी मनोगताच्या इतर घटकांच्या (स्ट्राँग एंटिटी सेट - इन्क्लुडिंग सभासद) अस्तित्त्वावर अवलंबून आहे. एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या, उणीदुणी, टीकाटिप्पणी इ. स्तुती-निंदादर्शक ज़ोडशब्द यांच्याद्वारे होणारे अनेकांचे अनेक मानापमान विसरून आज़ही "आपापसात" हा विभाग मनोगतावरील उज़वीकडील सूचीमध्ये अभिमानाने जीवन ज़गतोय.


नेहमी आनंद मी वाटायचो; पण-
व्यर्थ येथे जायचे का दान माझे?


--- हे माझे स्वतःचे मनोगत आहे. 'वाटायचो' या शब्दावर येथे श्लेष आहे. मी फ़ुटकळ गझला/कविता, चार-दोन लेख असे काहीतरी लिहायचो, त्यावेळी आनंद वाटायचो (ऍटलिस्ट, मला तरी तसे वाटायचे ;-)) आणि कदाचित वाचकांनाही ते वाचणे (म्हणजे माझे लेखन) हा आनंद वाटायचा. हेन्स द श्लेष ऑन "वाटायचो". पण मग विडंबने आणि आता हे रसग्रहण वगैरे लिहायला सुरू केल्यावर "ओह् ब्रूटस, यू टू?" किंवा "डॉक्टर तुम्हीसुद्धा?" या टाइपचे "चक्रपाणि, तू पण?" असे प्रतिसाद आल्यावर हा नक्की सन्मान आहे की अपमान कळेना. आणि आपले लेखन खरोखरच किती व्यर्थ आहे, आपण ज़े लिहितोय, त्यातली तळमळ (डोंबल!!) कोणालाच कळत नाही, अशी अपराधी भावना निर्माण झाली. त्यावेळी कुमारपंतांच्या या शेराने माझी घुसमट चित्रित करायला हात दिला ;-)


तर अशा नानाविध अर्थपदरांनी नटलेली, विविध मनोगते चित्रित करणारी एक परिपूर्ण गझल म्हणून "आव्हान" या गझलेकडे बघितले ज़ाऊ शकते. प्रस्तुत गझलेच्या निमित्ताने, कुकरमध्ये उकडायला लावलेले बटाटे होईस्तोवर, हे रसग्रहण लिहायची संधी दिल्याबद्दल गझलकार नि मनोगताचे शतशः आभार. अशाच सुंदर सुंदर गझला लिहिण्याचे सत्कार्य मनोगतावरील गझलकारांच्या हातून होवो, ही शुभकामना.


- चक्रपाणि चिटणीस, राले, नॉर्थ कॅरोलायना