बट्ट्या/गाकर

  • ५ पोळ्यांची कणिक(चवीपुरते नेहमीपेक्षा थोडे जास्त मीठ घालून मळावी.)
  • थोडे तूप
१५ मिनिटे
२ जणांसाठी

या पदार्थासारखाच एक पदार्थ दालबाटी हा राजस्थानी पदार्थ आहे. फरक इतकाच कि बट्यांमधे मी पोळ्यांची कणिक वापरली आहे, आणि दालबाटीत दुसर्‍या पिठाचे मिश्रण वापरतात.
कृती:
१. कणकेचे नेहमीच्या पोळीगोळ्यापेक्षा छोटे गोळे करावे.
२. गोळ्याची पोळी लाटून आतील पृष्ठभागाला तूपाचा हात लावून त्याची चौकोनी घडी करावी. आणि परत लाटावी. परत थोडी चौकोनी घडी करावी आणि हलक्या हाताने लाटावी. घड्या करणे आणि लाटणे या क्रियेनंतर साधारण ५ सेमी बाजूंचा जाडसर चौकोन अथवा ६सेमी व्यासाचा जाडसर गोल बनावा.  
३. अशा ६-७ चौकोनी/गोल जाड बट्ट्या लाटून त्या तव्यावर थोडे तूप लावून खरपूस भाजाव्या. भाजताना रुमालाने दाबत रहावे, न फुगलेल्या पण कुरकुरीत आणि खमंग भाजल्या गेलेल्या बट्ट्या जास्त चांगल्या लागतात.  
४. एका बाजूने नीट भाजल्या गेल्यावर उलटून २-३ मिनिटे झाकण ठेऊन दुसर्‍या बाजूने नीट भाजाव्यात.

गरम गरम खा. चहाबरोबर, नुसत्या किंवा वरणाबरोबर.. कशाही छान लागतात. बिस्किटांना हा देशी पर्याय.