शेपुबद

  • ३ उकडलेले बटाटे
  • २ टॉमेटो
  • मूठभर चिंच
  • लहान खडा गूळ
  • २ वाट्या दही
  • बारीक शेव(आवडत आणि मिळत असल्यास हल्दीराम आलू भुजिया पण चालतील.)
  • सैंधव असल्यास,नाहीतर जलजिरा मसाला पण चालेल.
  • मिरच्या ३
  • मीठ चवीपुरते
  • पाणीपुरी पाकिट १
  • तिखट पूड
१५ मिनिटे
४ जणांसाठी

ही आपली 'शेव बटाटा दही पुरी' हो.. घाबरु नका. 'शेपुबद' मधे शेपू नाही.
गोड चटणीसाठी:
१. चिंच १ तास कोमट पाण्यात भिजत घालावी.
२. नीट भिजल्यावर मूठीने पिळून कोळ काढावा.
३. या कोळात गूळ बारीक करुन आणि सैंधव चवीपुरते घालून नीट मिसळावे. चटणी म्हणजे घट्टसर द्राव बनवावा.

मिरचीची चटणी:
१. मिरच्या चिरुन मिक्सरमधून काढाव्यात. पेलाभर पाणी घालून आणि मीठ घालून ढवळावे. 

पुर्‍या:
१. उकडलेले टोमेटो, बटाटे नीट बारीक चिरावे.
२. दह्यात चवीपुरते मीठ घालावे.
३. पुर्‍या वरुन फोडून त्यांच्यात १-२ बटाट्याच्या फोडी,टॉमेटो ठेवावे. चिंचेची चटणी थोडी आणि तिखट खाण्याच्या पातळीनुसार मिरचीची चटणी घालावी.
४. आता या पुर्‍यांवर चमच्याने दही घालावे.
५. वर पिवळी शेव आणि लाललाल तिखटाची पूड थोडी पसरावी.

आणि काय.. बघता बघता ८-१० पुर्‍या खाऊन टाका आणि मगच बोलायला तोंड उघडा..
पुर्‍या नसतात तेव्हा नुसते दही, तिखट,टॉमेटो,उकडलेले बटाटे आणि शेव हे मिश्रण पण छान लागते खायला.