नायगारा

पाहताक्षणीच गात्री गोठून ये शहारा
जन लोटले पहाया महाकाय नायगारा.


कोणांस जणू दिसते हे मूर्तीमंत दैव
ही अटळ वेळ आली - हा कडेलोट सारा.


कुणी सार सार्थकाचे जाणून प्रार्थतो की
क्षण एक मिळो यासम आयुष्य तारणारा.


कुणी गौरांगी रमणी या कल्पनेत रमली
लघु ईंद्रधनू पायी अहा शोभती शृंगारा.


वैषम्य कुणा वाटे की स्तुती अनाठायी
उपयुक्त वाहणाऱ्या त्या पलीकडच्या धारा.