घारगे

  • लाल/पिवळा भोपळ्याचा कीस १ वाटी
  • गूळ १ वाटी
  • तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
  • रवा अर्धी वाटी
  • कणीक अदपाव वाटी
  • साजूक तूप अर्धा चमचा
३० मिनिटे
२ जण

कढईत थोडे साजूक तूप घालून भोपळ्याचा कीस व गूळ एकत्र करून शिजवून घेणे. शिजवताना त्यावर ताटली ठेवली तर पटकन शिजतो. शिजल्यावर गरम असतानाच त्या मिश्रणात पूरेल इतकेच तांदुळाचे पीठ, रवा व कणीक घालून व्यवस्थित ढवळणे. ढवळल्यावर या मिश्रणाचा गोळा तयार होईल. नंतर अर्ध्या तासाने त्या मिश्रणाचे छोटे गोळे करून ते प्लॅस्टीकच्या कागदावर थोडासा तेलाचा हात लावून जाड थापणे. थापताना तेलाचा हात घेऊन थापले तर पटकन थापले जातात. साधारण लहान पुरी एवढ्या आकाराचे हे घारगे तेलात मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घेणे. 

यामधे घेतलेले गुळाचे प्रमाण थोडे जास्त आहे असे वाटते, कारण खूप गोड झाले. ज्यांना खूप गोड आवडत नसेल त्यांनी गुळाचे प्रमाण निम्मे घेणे.

रोहिणी

घारग्यांवर गोठलेले साजूक तूप पसरवून खाणे. हे घारगे श्रावणात सोमवारी संध्याकाळी उपास सोडताना नैवेद्याला करतात. ह्याबरोबर  भाजणीचे तिखट वडेही करतात. तिखट वडे व गोड घारगे असा नैवेद्य असतो.

सौ आई