शाश्वताचें प्रकाश-संश्लेषण : सूर्य पाहिलेला माणूस

कलेच्या व्यवहारात बहुशः समाजपुरुषाच्या रंजनाचे ब्रीद घेतलेल्या शिलेदारांची चलती असणे याचे, मला वाटते सर्वात मोठे प्रमाण अलिकडील मराठी रंगभूमीच्या स्थितीमध्ये सापडावे. तेंडुलकर , एलकुंचवार यांनी मांडलेले प्रश्न खरोखरच खूप मोठे होते. नाटकाच्या माध्यमातून, सामाजिक , राजकीय संदर्भातील जळजळीत प्रश्नांची धगधगती चित्रे आणि त्या संदर्भांच्या पलीकडची , माणसांबद्दलची  , माणसांच्या समूहांची तिसऱ्या डोळ्याने पाहिल्यासारखी दर्शने त्यानी घडवली. खानोलकरांसारख्या विचक्षण कलावंताने "आपुले मरण... " सारख्या रौद्र नाट्यातून माणसाच्या एका आदिम सत्याचा वेध घेतला...


  "ते हि नो दिवसाः गताः" च्या या घडीला या अस्सल बावनकशी परम्परेशी नाते सांगणारे काही अलिकडेच पहायला मिळाले. अनेक वर्षानी हे जे नवल वर्तले, त्याबद्दल मजसारख्या लघुत्तम सामान्य वाचकाला जे जाणवले, ते जमेल तसे विशद करावे, म्हणून ही लेखनकामाठी.


मकरंद साठे यांच्या  "सूर्य पाहिलेला माणूस" या नाटकाचा नाट्यपट पाहायचा योग अलिकडे आला. ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटीस याची जीवनमूल्ये आणि त्या मूल्यांकरता त्याने स्वीकारलेले वीरमरण या सूत्रावर बेतलेल्या या नाटकाला अनेक पदर आहेत.


नाटक सुरु होते ते ३ व्यक्तींच्या, काहीशा खमंग अशा संभाषणाने. या ३ व्यक्तीना , त्यांच्या संभाषणाला, कुठल्याही काळाचे , ठिकाणाचे संदर्भ नाहीत. त्यांच्या वरकरणी खटकेबाज अशा संवादांतून 'दिसायला' लागतात त्या,  ते represent करणाऱ्या प्रवृत्ती.. कुणी सिनिकल , तर कुणी भाबडा.. कुणी बेरकी , तर कुणी सरळ धारेचा.. कुणी विदुषकी व्यंगातून आयुष्याची वैयर्थता प्रकट करणारा , तर कुणी आपली बाजू हिरीरीने मांडणारा... आणि 'आपली बाजू' म्हणजे तरी कसली बाजू ? त्याला राजकीय , सामजिक असा कुठलाच संदर्भ नाही.. मात्र या प्रवेशातून , 'आंधळे आणि हत्ती' यांचे रूपक ठसविले जाते. आणि साऱ्या ज्ञानशाखा ज्या प्रश्नांकडे वळतात , त्या प्रश्नांच्या समेवर हा  प्रवेश येतो.. हे प्रश्न कुठले ? तर 'हे सारे काय आहे ?' , 'या साऱ्याचा अर्थ तरी काय ?' , 'सत्य म्हणजे काय ?' 'सत्याचे आणि आपले नाते काय ?' हे आणि असे प्रश्न.


आणि 'सत्या'बद्दलच्या , या मूलभूत प्रश्नोपनिषदाला , अगदी अलगद अशी,एका प्रखर अशा प्रकाश-स्त्रोताची रूपकात्मकता नकळत मिळून जाते; आणि मग जाणवते: या साऱ्या 'बोलणाऱ्या माणसाना' संदर्भ आहे,तो प्लेटोच्या dialogues  मधील चिरंतन गुहांचा , त्यातील आदिम अंधारात चाचपडणाऱ्या , प्रकाशरूपी सत्याच्या शोधाचा.


'सत्य म्हणजे काय ? त्याचे आपले नाते काय ? सत्यासारखी दाहक , अति-प्रखर गोष्ट कुणाला पेलवली आहे काय ?' अशा मालिकेतून , गोष्ट सुरू होते ती सत्यापासून न चळलेल्या , 'सूर्य पाहिलेल्या माणसाची' , सॉक्रेटिसची.


तत्कालीन ग्रीक संस्कृतिचा  इतिहास हा अति-मर्यादित लोकशाही आणि दडपणारी राजसत्ता यांच्या रस्सीखेचेचा इतिहास आहे. अतिशय मर्यादित अशा वैचारिक  स्वातंत्र्याच्या या कालखंडात सॉक्रेटिस मात्र, अथेन्स मधील तरुणाना सतत आपल्या तत्त्वशोध पद्धतीने, सत्याचा मागोवा घेण्यास उद्युक्त करीत होता.  विद्यार्थी, मित्र, आणि अमीर-उमरावांच्या वर्गातील अनेक तरुण त्याच्या विचारानी प्रभावित होत होते. प्लेटोने ग्रंथित केलेल्या या सर्व संवादांमधून, 'श्रेयसा'च्या शोधाचे , ते प्राप्त करण्यासाठीच्या वाद-विवाद प्रधान अशा मंथनाचे दर्शन घडते.प्रत्येक गोष्टीला तार्किक , अति-कठोर अशा तात्विक भिंगाखाली घालण्यास तरुण पिढीस उद्युक्त करणार्क्ष्या या माणासामुळे लोकशाहीच्या बुरख्या-आडून निरंकुश सत्ता हाकू पाहणाऱ्या तत्कालीन राज्यकर्त्यांची झोप न उडती तर नवल. अथेन्सतर्फे त्याच्यावर रीतसर खटला भरण्यात आला. ग्रीक दैवतांची पायमल्ली आणि अथेन्सच्या युवकाना बहकवणे असे दुहेरी आरोप त्याच्यावर लादण्यात आले. प्लेटोने आपल्या ग्रन्थात या खटल्याचे सविस्तर चित्रण केले आहे. या खटल्याच्या दरम्यान आपल्या विरोधकांची केलेली उलट-तपासणी, त्यांच्या प्रत्येक आरोपाचे खंडन आदि भागातून सॉक्रेटिसची न्याय्य बाजू सिद्ध तर झालीच आहे; पण या खटल्याच्या अंती सॉक्रेटिसने केलेल्या निवेदनात त्याने आयुष्यभर केलेल्या तपश्चर्येचे जणू सारच एकवटले आहे.

प्लेटो हा सॉक्रेटीसचा शिष्यवर.  ज्ञान हे डबक्यातल्या पाण्यासारखे स्थिर नसून , ती एक प्रवाही गोष्ट आहे, असली पाहिजे , वाद-विवादातूनच तत्वबोध होतो अशा आपल्या ठाम विश्वासांमुळे सॉक्रेटीसने लिहिलेले काहीही इतिहासाच्या दस्त-ऐवजामध्ये  सापडत नाही. प्लेटोने मात्र आपल्या Republic या , पाश्चात्य तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाच्या गणल्या जाणाऱ्या ग्रन्थामध्ये  सॉक्रेटीसच्या विचारांचा , त्याच्या "वाद-संवादीय पद्धत्ती" (Dialectic Method)चा, उत्तम आलेख काढला आहे.


नाटकाचा जो घटनाप्रधान , संवादप्रधान भाग आहे तो आहे सॉक्रेटीसच्या आयुष्यातील अंतिम पर्वाचा,त्याच्या हलाखीबद्दलचा,त्याच्यावरील खटल्याबद्दलचा. त्याला झालेल्या ; नव्हे, त्याने स्वीकारलेल्या शिक्षेचा. अर्थातच , हा सर्व भाग डॉ. श्रीराम लागू यानी रंगविलेल्या  सॉक्रेटीसच्या लखलखीत अशा परफॉर्मंस ने उजळून टाकला आहे.त्यांची आतापर्यंतची कारकीर्द म्हणजे एकाहून एक उंच अशी हिमशिखरे आहेत. 'नटसम्राट' , 'हिमालयाची सावली' , 'उध्वस्त धर्मशाळा' , 'एकच प्याला'... नावे तरी किती घ्यायची. पण , आपल्या कारकीर्दीच्या जवळ जवळ अखेरीस केलेल्या या भूमिकेने या सर्वांवर कळस चढला असे म्हण्टले तरी चूक होणार नाही. ख़्याल गायकीमध्ये असंख्य मैफ़ली गाजवून सोडलेल्या एख़ाद्या गवयाने , अगदी वृद्धापकाळी सुद्धा स्वरांची निराळी दुनिया दाखवावी , तसे लागूंनी अनुभवांचे नवे प्रदेश दाखविले आहेत अर्थात , लागूंचा हीरा बसवायला कोंदण हवे ते अस्सल संहितेचे.. त्याबद्दल बोलण्यासारखे प्रचंड आहेच. नवनवे प्रयोग करणाऱ्या समृद्ध अशा मराठी रंगभूमीवरसुद्धा अभिनव ठरेल असे हे , ज्ञानशाखांच्या गाभ्याला हात घालणारे शिव-धनुष्य होते.. ते उचलण्याचे धाडस करणाऱ्या मकरंद साठे या नाटककाराचे , अतुल पेठे या दिग्दर्शकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.


इतके बोलून झाल्यवरसुद्धा, काही विचार मनात येतात ते बोलून दाखवल्याशिवाय राहावत नाही ... सॉक्रेटीसची , त्याच्या तत्वांबद्दलच्या लढ्याची बाजू पुरेशा ताकदीने मांडूनसुद्धा काही ताणांचा विलय झाल्यासारखे वाटत नाही. उदाहरणार्थ , सॉक्रेटीसची बायको झांटीप्पेची व्यथा पुरेशा पूर्णत्वाने उतरली नाहीसे वाटते.सत्याकरिता वीरमरण स्वीकारणे हे श्रेयास्पद खरेच. पण सत्याकरिता मरण,की सत्याच्या तडजोडीच्या छायेतील जीवन यातील  निवड ही heroic असली तरी व्यामिश्र आहे का?. सामान्य माणसाच्या आयुष्यात याहून अधिक जटील असे choices येतात आणि ते निवडण्याचे निकष असण्याइतपत  सॉक्रेटीस आपण नसतो. अशावेळी 'सत्य' , 'स्वातंत्र्य' या गोष्टींचे , कचकड्यासारखे अर्थ दिसायला लागतात ... झांटीप्पेचीची व्यथा अशा स्वरूपाची, कदाचित तशीच जटील असावी असे वाटते... साठे यांच्यासारख्यानी अशा जटील प्रश्नांचाही कधी वेध घ्यावा असे वाटून जाते...


  असे हे , मराठी नाट्यभूमीचा नवीन माप-दंड ठरेल असे नाटक. आपल्या सर्वानी जरूर पहावेसे... आपल्या नाट्यविषयक, आणि वैचारिक facultiesना समृद्ध करणारे.