गं सखे.....!!!

सप्तसुरांच्या तालावरती अशीच सखे नाचत जा,
नूपुरांच्या या नादामध्ये भान तुझे तू हरवीत जा.


निळ्या तुझ्या या नयना मध्ये आकाशाला ओतीत जा,
गोड तुझ्या या वाणी मधूनी अमृतधारा शिंपीत जा.


काळ्या सुंदर कुंतलात या निशेलाही मिरवीत जा,
प्राजक्ताच्या फुलांनाही त्याच्यामध्ये माळीत जा.


गवतावरच्या दवबिंदूंना स्पर्शाने तू हसवीत जा,
मातीमधल्या गंधालाही श्वासांनी तू रोखीत जा.


मल्हाराचे राग आळवीत नभांनभांतून बरसत जा,
इंद्रधनूच्या रंगांमधूनी हळूच सखे, डोकावीत जा.


बाहूत येऊनी माझ्या गोड सखे तू लाजून जा,
हृदयावरच्या जखमा या मृदुल करांनी मिटवीत जा.


- प्राजु.