'शोर'- आवाज जेंव्हा वैरी होतो!

बटबटीत देशभक्ती आणि कल्पनादारिद्र्य यानी उबग आणणारा 'मिस्टर भारत' उर्फ चेहराझाक्या मनोजकुमार याने आजवर अनेक महाबोअर सिनेमे दिले. दिलीपकुमारची नक्कल करण्याची क्षमता, देखण्या नायिका, शंकर - जयकिशन आणि कल्याणजी आनंदजी यांचे संगीत आणि मुकेश यांच्या जिवावर तो बऱ्यापैकी यशस्वीही झाला. पण सुमार नटांना आपण चांगले  दिग्दर्शक बनू शकू हा आत्मविश्वास का असतो कुणास ठाऊक! (कदाचित देव आनंदच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल!) त्याचा अभिनय पुरेसा त्रासदायक नव्हता म्हणून की काय, त्याने पुढे निर्मिती आणि दिग्दर्शनही करायला सुरुवात केली. त्याच्या दिग्दर्शनाच्या कल्पनांविषयी काय लिहावे? आरशात दिसणारी प्रतिबिंबे आणि कॅमेऱ्याला शोभादर्शक यंत्र (Kaleidoscope ) लावून केलेले छायाचित्रण या त्याच्या 'चमकदार' कल्पना. 'क्रांती' या चित्रपटाच्या परीक्षणात वाचल्याचे आठवते - 'एखाद्या दृश्यात पडद्यावर प्रथम त्याचा हात दिसतो आणि मग त्याचा चेहरा. हात दाखवून अवलक्षण म्हणतात ते हेच असावे!' 

पण जगात संपूर्ण चुकीचे असे काहीही नसते असे म्हणतात. अगदी हे विधान धरून काहीही. बंद पडलेले घड्याळही दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवते. मनोजकुमारनेही एखाद्या गाफील क्षणी आपल्यातली चमक दाखवून दिली आणि आपल्या परंपरेशी विसंगत एक सुरेख चित्रपट काढला - त्याचे नाव 'शोर'.

शहरातला गोंगाट, आवाज याचा त्रास कुणाला होत नाही? विशेषतः या चित्रपटातल्या शंकरला. खडतर पण तरीही आनंदी आयुष्य जगणाऱ्या शंकरला दुर्दैवाचा एक जबरदस्त फटका बसला आहे. एकुलत्या एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची हसरी पत्नी रेल्वेखाली चिरडली गेली आहे. त्या अपघातात बसलेल्या धक्क्याने त्याचा मुलगाही वाचा हरवून बसला आहे. आता गतायुष्याचे तुकडे गोळा करत जगणाऱ्या शंकरची एकमेव आशा आहे ती म्हणजे त्या मुलावर होऊ शकणाऱ्या शस्त्रक्रियेची. या शस्त्रक्रियेने तो कदाचित परत बोलू शकेल. पण त्यासाठी खूप पैसे हवे आहेत. कारखान्यात काम करणाऱ्या शंकरजवळ एवढे पैसे कुठून यायला? मग तो हे पैसे मिळवण्यासाठी जंगजंग पछाडतो. आपल्या आईचे दागिने, गावाकडची किरकोळ मालमत्ता विकून काही पैसे गोळा करतो. पण इथे सख्ख्या बहिणीचा नादान पती वैरी होऊन येतो. रात्रंदिवस सायकल चालवण्याचा विक्रम करून. रक्त ओकून गोळा केलेले पैसे एक भुरटा चोर लुबाडतो. शेवटी काहीतरी करुन ते पैसे गोळा होतात, मुलाचे ऑपरेशनही होते, मुलगा बोलू लागतो, पण शंकर?

शंकर इस्पितळात मृत्यूशी झगडतो आहे. ऑपरेशननंतर शुद्धीवर येणाऱ्या आपल्या मुलाचा पहिला शब्द ऐकण्यासाठी तडफडणारा शंकर घाईघाईत पाय घसरून कोसळला आहे. त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. तो हळूहळू शुद्धीवर येतो. आपल्या मित्राकडे बघून हसण्याचा प्रयत्न करतो, काहीसे पुटपुटतो, पण हे काय? कुणीच काही बोलत असे नाही? सगळं असं शांत शांत का?

इथे  'शोर' चा खरा पंच येतो. शंकर अपघातात ठार बहिरा झाला आहे! आता त्याचा मुलगा बोलतो आहे, पण मुलाचे शब्द ऐकण्यासाठी आसावलेल्या शंकरला काही ऐकू येत नाही. दुनिया करत असलेल्या आवाजावर सतत चिडलेल्या शंकरच्या कानात आता आयुष्यभरासाठी शांतता आहे. भयाण स्मशानशांतता!


याला काय म्हणावे? देवाची इच्छा? नशीब? नियती? माणसाचे नियोजन, त्याच्या योजना किती फुसक्या, तकलादू असतात! एक वावटळ येते आणि
सगळे चक्काचूर होऊन जाते. आता सगळे स्वीकारलेला शंकर परत मुलाबरोबर समुद्रावर फिरायला आला आहे. सोबत आयुष्यात दुसऱ्यांदा वसंत फुलवणारी सखी आहे. आकाशातून एक विमान जाते आहे. शंकरच्या कानात पूर्ण शांतता आहे. शंकर स्वतःशीच हसतो, खांदे उडवतो आणो मुलाचा आणि आपल्या सोबतिणीचा हात धरून चालू लागतो. भूतकाळ मागे टाकून, एका नव्या, अपरिहार्य आयुष्याकडे!


मनोजकुमारच्या या चित्रपटात हृदय भेदून जाणाऱ्या कथेबरोबर सोज्वळ हसरी नंदा आहे. 'रात की रानी' फटाकडी जया भादुरी आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच चक्क चांगला अभिनय करणारा प्रेमनाथ आहे. 'इक प्यार का नगमा है' या गाण्याचे ऐकून ऐकून 'देहाची तिजोरी' झाले आहे, पण मन्नाडेने सुरेख गायलेले 'जीवन चलने का नाम' आहे.  'नव जीवन' या उघडझाप करणाऱ्या निऑन साइन्सचा वापर अशा खरोखर चमकदार दिग्दर्शनाच्या कल्पना आहेत.


मनोजकुमारचे बाकीचे सगळे चित्रपट माफ करावे असा 'शोर' हा चित्रपट आहे.