झाले गाणे...!


डोळ्यांमधल्या सुखस्वप्नांचे झाले गाणे
गालावरल्या स्मितरेखांचे झाले गाणे


मातीवरती थेंब जळाचे आले गेले
खोलामध्ये जिरलेल्यांचे झाले गाणे


साऱ्या पडल्या सत्त्वपरीक्षा केंव्हा मागे
आता उरल्या नि:श्वासांचे  झाले गाणे


थोड्या कळल्या मनमोराच्या वेड्या भाषा
तेंव्हा सगळ्या मधुस्पर्शांचे झाले गाणे


चाकावरती फिरली माती काळी ओली
बोटांभवती आकारांचे झाले गाणे



चोचीने चोचीला देता चिमणाचारा
चिवचिवणाऱ्या आनंदांचे झाले गाणे


खुंट्या पिळल्या जुळल्या तारा, आवाजाच्या,
देहामधल्या हरप्राणांचे झाले गाणे



--अदिती
(८.७.२००६)