आकाशीचा चंद्र...(गजल)

आकाशीचा चंद्र कुणाच्या हाती लागत नाही
त्याच्याखेरिज माझे मन पण काही मागत नाही...


काळ बदलला, तुझे वागणे तसेच बदलत गेले
मीही आता 'ठरवुन' पूर्वीसमान वागत नाही...


दु:ख प्राशले इतके तरि मी अजून आहे प्यासा
तहान माझी कशा-कशाने आता भागत नाही...


अनोळखी ही सर्व माणसे इथल्या दुनियेमध्ये
कोण कुणाचे, नाते कसले, पत्ता लागत नाही...


'अजब' दिलेला शब्द मोडला सर्वांनी का येथे?
हाय! अताशा कुणाचेच का इमान जागत नाही?...