मनोगताची पुनर्बांधणी

दिवसातला काही वेळ तरी मनोगत लिहिण्याजोगते करून होणाऱ्या उलाढालीचा अभ्यास करावा असे ठरवले आहे. हे करताना विदागार अधिक काळ पर्यंत गुंतून ठेवणाऱ्या विचारणा कोणत्या, त्याचे थेट निरीक्षण करता येईल असे वाटते. जसजश्या सुधारणा होत जातील तसतसे अधिकाधिक विभाग अधिक काळपर्यंत खुले ठेवता येऊ लागतील, असा साधारण बेत आहे. भारतीय प्रमाणवेळे नुसार सध्या अदमासे सायं ६.०० ते अदमासे पहाटे ३.०० पर्यंत लिहिण्याची सुविधा कार्यरत राहील. येथे लेखन करताना आपल्याजवळ त्याची प्रत ठेवलेली बरी, असे सुचवावेसे वाटते.

ह्याआधीचे निवेदन:

कोसळलेल्या विदागाराच्या पाठसाठ्याचे गाठोडे(झिप) सेवादात्याच्या सहकार्याने प्रशासनाच्या हातात आलेले आहे. त्यातली एकेक सारणी पाहून तिचे पुनरुज्जीवन करता येते का ह्याचा अभ्यास चालू आहे. हे काम अतिशय कटकटीचे आणि वेळखाऊ आहे; शिवाय यशाची शाश्वती नाही. तरीही सर्व शक्यतांचा माग काढण्याचे काम चालू झालेले आहे. त्यानुसार कदाचित एकेका सारणीत सुधारणा / वाढ झालेली दिसण्याची शक्यता आहे.

ह्याआधीचे निवेदन:

विदागाराचे आकारमान आटोपशीर ठेवण्याचे दृष्टीने मनोगतावरील जुने लिखाण गूगल ग्रुप्स वर स्थलांतरित करण्याचे योजलेले आहे.

नमुने पाहा.

मनोगतावरील कालातीत गद्याचे Google Groups वरील संचित
मनोगतावरील कालातीत कवितांचे Google Groups वरील संचित
मनोगतावरील कालातीत चर्चांचे Google Groups वरील संचित

गूगल ग्रुप निवडण्याचा उद्देश असा की तेथे ठेवलेला मजकूर त्वरित 'सूचिर्भूत' झाल्याने जालावर चटकन शोधता येतो. नमुन्यासाठी काही लिखाण स्थलांतरित केलेले आहे. अधिक पाहणी आणि तपासणी चालू आहे. प्रत्यक्ष कायमस्वरूपी स्थलांतराला १ फेब्रुवारी पासून सुरुवात करण्याचा बेत आहे. सध्या कविता, लेख आणि चर्चा स्थलांतरित केल्या जातील. पाककृती आणि कार्यक्रमांबद्दल काय आणि कसे करावे ह्याचा विचार चालू आहे.

ज्या सदस्यांना आपले लिखाण संचितात समाविष्ट होऊ नये असे वाटत असेल त्यांनी प्रशासनास तसे त्वरित कळवावे. तसे झाल्यानंतर पुढे त्या लिखाणाचा संचय थांबवता येईल. मात्र एकदा संचित झालेले लिखाण संचितातून काढणे अशक्य आहे.

विदागाराकडे केल्या जाणाऱ्या विचारणांपैकी ज्यांमुळे विदागार अतिरिक्त काळपर्यंत गुंतून राहील त्या तात्पुरत्या रहित करण्याचे ठरवलेले आहे. मुख्यत्वेकरून प्रतिसादांचे बाबतीत अधिक तपशीलाने केल्या जाणाऱ्या विचारणा काही काळ रहित केलेल्या आहेत. विविध प्रयोग आणि तपासण्या चालू आहेत. त्यानुसार नवे नवे बदल केले जातील. अशा बदललेल्या अवस्थेत मनोगत निदान काही मर्यादेपर्यंत लवकरच पुन्हा लेखनक्षम धाटणीत सुरू करण्याचा मनोदय आहे.

ह्या आधीचे निवेदन:

डिसेंबर २००६ च्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात मनोगताच्या विदागारात(डेटाबेस) काही समस्या निर्माण झाली असावी. तेव्हापासून वारंवार अडथळे येऊ लागले होते. शेवटी १२ जानेवारी २००७ रोजी विदागार अकस्मात कोसळले. विदागारात असा व्यत्यय गेल्या अडीच वर्षात कधीही न आल्याने धोका आधी जाणवला नाही. पाठसाठ्यात (बॅकअप) ८ जानेवारीपर्यंतचे लिखाण त्यातल्या त्यात सुरक्षित आढळले. नंतरचे नष्ट झाले, किंवा वाचता येईनासे झाले. वाचता येणाऱ्या लिखाणामधेही काही सारणीत गोंधळ राहिलेला दिसतो. व्यक्तिगत निरोपाच्या सारणी, मनोगत वर्गीकरणाच्या सारणी शुद्धिचिकित्सक वापरत असलेला शब्दसंग्रह, पाकक्रियांचे जिन्नस आदि तपशील ह्या सर्व सारणींतील युनिकोड माहिती एन्क्रिप्टिंगच्या फरकांमुळे खराब झाली. पैकी पाकक्रिया इतरप्रकारे सुरक्षित राहिल्याने त्या एकेक करून वाचता येण्यासारख्या करता आल्या, त्यासर्व (वाचण्यासाठी) पुन्हा पहिल्यासारख्या केलेल्या आहेत.  बाकी माहिती पुन्हा नव्याने निर्माण करावी लागणार आहे. सर्वात जास्त नुकसान शुद्धिचिकित्सकाचे झाले! जवळ जवळ वर्षभर नव्याने साठवलेले शब्द नाहिसे झाले. साहाय्य, शुद्धलेखनाचे पुस्तक ह्यातील सूची नष्ट झाल्याने सध्या ते लेख मुखपृष्ठावरून काढून घ्यावे लागले आहेत.

हे सगळे पाहून ऊर्ध्वश्रेणीकरण करण्यापूर्वी मनोगताची पहिल्यापासून पुनर्बांधणी करण्याचे ठरवले आहे. ह्याला वेळ लागेल. हे करताना विदागाराचे आकारमान आटोपशीर राहावे म्हणून काही पावले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी मनोगतावरचे जुने लिखाण मनोगतावरून काढून टाकावे लागणार आहे. ते संपूर्ण नष्ट न करता जालावर इतर ठिकाणी सुरक्षित ठेवता आले तर पाहावे ह्या दृष्टीने तपासणी चालू आहे. पुन्हा नव्या स्वरूपात मनोगत उभे राहीपर्यंत ते 'वाचनमात्र' अवस्थेत ठेवावे लागणार आहे. व्यक्तिगत निरोपाची सुविधा (बाकी सारणींपासून अलग असल्याने) सुरू ठेवता येईल असे वाटते.

आपापले जुने साहित्य मनोगतावरून उतरवून आपल्यापाशी सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था सदस्यांना करता यावी ह्या दृष्टीने ह्या निवेदनाचा उपयोग होईल असे वाटते.

सदस्यांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.