डू नॉट पास गो (२)

 अचानक एका दक्षिण अमेरिकी आवाजाने लाऊड स्पीकरवर बोलायला सुरुवात केली." लेडिज ऍंड जन्टलमन, मी तुमचा कॅप्टन बोलतो आहे. तुमच्या झोपेत किंवा सिनेमात व्यत्यय आणल्याबद्दल मी दिलगीर आहे. पण आपल्या विमानात एक लहानसा तांत्रिक दोष उत्पन्न झाला आहे.यात काळजी करण्यासारखं काही नाहीये पण इथल्या एअर ट्रॅफिक कन्ट्रोलरचं असं म्हणणं आहे की आपण जवळच्या विमानतळावर उतरून दुरुस्ती पूर्ण करून घ्यावी आणि मगच पुढे जावं. या गोष्टीला साधारण एक तासाभराचा वेळ लागेल पण हा वेळ आपण पुढे भरून काढायचा प्रयत्न करू या..."
"हमीदला एकदम खडबडून जाग आली.
"हा आपला अधिकृत थांबा नसल्यामुळे तुम्हाला विमानातून खाली उतरता येणार नाही पण आम्ही बगदादला जाऊन आलो अशी फुशारकी तुम्ही नक्कीच मारू शकाल!"
हमीदला त्याच्या देहातलं अवसान गळाल्यासारखं वाटलं. त्याने आपला चेहरा दोन्ही हातात लपवला. हवाई सुंदरी धावत त्याच्याजवळ आली. "तुम्हाला बरं वाटत नाहीये का?"
"मला आत्ताच्या आत्ता कॅप्टनला भेटायचंय..." त्याच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव पाहून तिने त्याला एका गोल जिन्याने फर्स्ट क्लास लाऊन्जमधून पायलटच्या केबिनमधे नेलं.
कॉकपिटच्या दरवाज्यावर टकटक करून तिने तो उघडला आणि कॅप्टनला ती म्हणाली, "एका प्रवाश्याला तुमच्याशी बोलायचंय सर..."
"येऊ दे त्याला" कॅप्टन म्हणाला. हमीदला आत्तापर्यंत कंप सुटला होता. "काय झालं सर? मी तुम्हाला काय मदत करू शकतो?" कॅप्टननं त्याला विचारलं.
"माझं नाव हमीद झेबारी. मी अमेरिकन नागरिक आहे. तुम्ही जर हे विमान बगदादमधे उतरवलंत तर मी पकडला जाईन आणि हाल हाल करून मला ठार मारलं जाईल. मी एक राजनैतिक शरणागत आहे आणि इथल्या राजवटीचे प्रतिनिधी मला ठार करायला मागेपुढे पाहणार नाहीत..." त्याच्या चेहऱ्याकडे केवळ एक कटाक्ष टाकताच कॅप्टनला हे कळून चुकलं की तो खरं बोलत होता.
"जिम, सूत्रं हातात घे... आणि लॅंड करायची परवानगी मिळताक्षणी मला कळव..." आपल्या को-पायलटला फर्मान सोडून पायलटने आपले सीट बेल्ट्स सोडवले आणि हमीदला घेऊन फर्स्ट क्लासच्या एका कोपऱ्यात तो येऊन बसला.
"मला जरा सविस्तर सांगा काय झालंय ते..."
पुढच्या काही मिनिटांमधे हमीदने त्याला बगदाद का आणि कसं सोडायला लागलं आणि तो अमेरिकेत कसा येऊन पोचला हे कॅप्टनला सांगितलं.
त्याचं बोलणं ऐकल्यावर कॅप्टन म्हणाला, " तुम्ही घाबरून जाऊ नका. कोणालाही विमानातून उतरावं लागणार नसल्यामुळे कोणाचेही पासपोर्ट्स तपासले जाणार नाहीत. तुम्ही असं करा, इथेच फर्स्ट क्लासमधे थांबा म्हणजे तुम्हाला मला लगेच गाठता येईल. तोवर मी जरा माझ्या सहकाऱ्यांना या प्रकाराची कल्पना देऊन येतो..."
कॅप्टनने एवढा धीर दिल्यावरही कॅप्टन निघून गेल्यावर हमीद पुन्हा थरथर कापायला लागला.
"मी तुमचा कॅप्टन बोलतोय. आपल्याला बगदाद विमानतळाकडून परवानगी मिळालेली आहे आणि आपण खाली उतरायला सुरुवात केली आहे. साधारण वीस मिनिटात आपण खाली उतरू आणि धावपट्टीच्या अगदी शेवटच्या टोकाला थांबून इंजिनीअर्सच्या जीपची वाट पाहू. ज्या क्षणी आपलं दुरुस्तीचं काम पूर्ण होईल त्या क्षणी आपण पुन्हा झेप घेऊ शकू."
प्रवाश्यांनी एक सुस्कारा सोडला. हमीदने खुर्चीचा हात घट्ट धरला. आपण काही खाल्लं नसतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटायला लागलं. पुढची वीस मिनिटं तो जीव मुठीत धरून बसला होता आणि जेंव्हा चाकं त्याच्या जन्मभूमीला टेकली तेंव्हा तर तो जवळजवळ बेशुद्धच पडला.
पोर्टहोलमधून त्याला बगदाद विमानतळाचा चिरपरिचित परिसर दिसत होता. तिथल्या इमारतींच्या टपावर सशस्त्र सैनिक उभे होते.
हमीदने अल्लाची करुणा भाकली. येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना केली. शेवटी त्याने रोनाल्ड रेगनचीही मनोमन प्रार्थना केली.
पुढची पंधरा मिनिटे तो एका जीपचा आवाज ऐकत होता. ती त्या विमानाच्या स्टारबोर्डखाली येऊन थांबली.
त्या जीपमधून दोन इंजिनीअर्स खाली उतरले. त्यांनी अवजड उपकरणांच्या पिशव्या घेतल्या होत्या. एका क्रेनवरून ते विमानाच्या पंखापर्यंत आले. त्यांनी पंखाजवळच्या इंजिनाचे स्क्रू काढायला सुरुवात केली. साधारण चाळीस मिनिटांनी त्यांनी ते स्क्रू पुन्हा जोडले आणि ते जीपमधे बसले. हमीद हे सगळं श्वास रोखून पहात होता. त्याला जरा बरं वाटायला लागलं. त्याने आशाळभूतपणे सीटबेल्ट्स बांधले त्याला त्याच्या काळजाचे ठोके मिनिटाला ऐंशीवरून शून्यावर आल्यासारखं वाटत होतं. जोपर्यंत विमान इथून उड्डाण करत नाही आणि परत इकडे येण्याच्या कक्षेबाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला असंच वाटत राहणार हे तो ओळखून होता. थोडा वेळ काहीच घडलं नाही आणि त्याला पुन्हा अस्वस्थ वाटायला लागलं. त्यानंतर कॉकपिटचा दरवाजा उघडला गेला आणि कॅप्टन त्याच्याच दिशेने येताना त्याला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते.
"तुम्ही आमच्याबरोबर फ्लाईट डेकवर आलात तर बरं होईल..." हमीदने सीटबेल्ट्स सोडले आणि तो कसाबसा उभा राहिला. थरथरतच त्याने कॅप्टनच्या मागे जायला सुरुवात केली. 
"इंजिनीअर्सना प्रॉब्लेम सापडत नाहीये. मुख्य इंजीनीअरला यायला अजून तासभर तरी जमणार नाही. त्यामुळे दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत  विमान मोकळं करून प्रवाश्यांना ट्रान्झिट लाऊन्जमधे उतरवायचं आहे. "
"त्यापेक्षा विमान कोसळून मी मेलो तरी चालेल..."
"मि. झेबारे, तुम्ही घाबरू नका.  आम्ही यातून एक मार्ग शोधून काढला आहे. आमच्याकडे असलेला जादा युनिफॉर्म घालून तुम्ही आमच्यातलेच एक म्हणून रहा. त्यामुळे तुमची तपासणीही होणार नाही आणि पूर्णवेळ तुम्ही आमच्याबरोबर असाल."
"पण कोणी मला ओळखलं तर?"
"तुमची दाढी केली, तुम्हाला फ्लाईट ऑफिसरचा युनिफॉर्म चढवला, काळा गॉगल घातला आणि पांढरी टोपी घातली की खुद्द तुमची आईसुद्धा तुम्हाला ओळखू शकणार नाही."
कात्री , दाढीचा ब्रश आणि वस्तरा यांच्या मदतीने हमीदची अक्कडबाज मिशी उतरवली गेली. हमीदला त्याच्या मिशीचा अतिशय अभिमान होता आणि ती काढल्यानंतर त्याच्या ओठाच्या वरच्या भागात तयार झालेली रिकामी जागा एखाद्या व्हॅनिला आईस्क्रीमच्या गोळ्याइतकी फिकट दिसायला लागली होती. त्याच्या इतर चेहऱ्याच्या काळेपणाशी तिचा पांढरेपणा अगदी विरोधाभास दाखवणारा होता. मग चीफ फ्लाईट अटेंडंटने तिच्या मेक-अप किटच्या मदतीने काही क्षणात तो भाग इतर चेहऱ्याच्या रंगाचा करून टाकला. हमीद अजूनही साशंकच होता पण त्याचा नवीन जामानिमा उरकून त्याने आरशात पाहिल्यावर त्याला ओळखून काढणं खरोखरीच अशक्य आहे हे त्याला मनोमन पटलं.
सर्वप्रथम प्रवाश्यांना उतरवलं गेलं आणि एका बसमधून त्यांना लऊन्जकडे नेलं गेलं. मग एका छानश्या व्हॅनमधून विमानाचा कर्मचारी वर्ग लाऊन्जमधे आला. सगळ्यांनी मिळून हमीदला वेढा घातला होता पण हमीदला दर क्षणाला आणखी अस्वस्थ वाटायला लागलं होतंं.
सुरक्षा रक्षकाने कर्मचारी मंडळाकडे दुर्लक्ष केले. लाऊन्जमधे एका हॉलमधे लाकडी बाकांवर सगळे बसले. हॉलच्या भिंतींना पांढरा रंग दिलेला होता आणि त्यातल्या एका भिंतीवर सद्दामचा हातात एक रायफल घेतलेला मोठा फोटो अडकवलेला होता. याशिवाय इतर कोणतीही सजावट तिथे नव्हती. हमीद मान वर करून त्याच्या 'जवळच्या मित्राच्या' फोटोकडे पाहूच शकला नाही.
तिथेच दुसऱ्या एका विमानाचं कर्मचारी मंडळ बसलं होतं पण हमीद इतका घाबरलेला होता की त्यांच्याशी काही बोलायचं धाडस त्याच्याच्याने झालं नाही.
ते फ्रेंच आहेत असं चीफ फ्लाईट अटेंडंटने त्याला सांगितलं. "माझ्या रात्रीच्या फ्रेंच क्लासमधे मी किती लक्ष दिलं होतं हे आता कळेलच" असं म्हणून तिने प्रेंच विमानाच्या कॅप्टनच्या आणि हमीदच्या मधे बसकण मारली आणि फ्रेंचमधे संभाषणाला तोंड फोडले. फ्रेंच कॅप्टन तिला सांगत होता की ते नवी दिल्लीला थांबून सिंगापोरला जाणार आहेत... तेंव्हाच हमीदने त्याला पाहिलं .सद्दामचा एके काळचा प्रमुख अंगरक्षक साद अलि ताक्रिती हॉलमधे आला. त्याच्या वेषावरून त्याला आता विमानतळाच्या प्रमुख सुरक्षा रक्षकाच्या जागेवर बढती देण्यात आली होती.
त्याने आपल्याकडे पाहू नये अशी हमीद प्रार्थना करत होती. साद अल ताक्रितीने फ्रेंच आणि अमेरिकी कर्मचारी वर्गाकडे एक कटाक्ष टाकला. फ्लाईट अटेंडंटच्या स्टॉकिंग्ज चढवलेल्या पायांकडे तो टक लावून पहात होता.
कॅप्टनने हमीदच्या खांद्याला हलकेच स्पर्श केला आणि तो इतका दचकला की बास...
"घाबरू नका. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की मुख्य इंजिनीअर आत्ताच विमानापाशी आला आहे. आता फार वेळ वाट पहावी लागणार नाही."
हमीदने खिडकीऊन बाहेर नजर टाकली. एक जीप पॅन एऍम च्या विमानाच्या पंखाखाली थांबली होती.त्यातून निळ्या कपड्यातला एक माणूस बाहेर आला. त्याने क्रेन त्या पंखाकडे न्यायला सुरुवात केली.
खिडकीजवळ जाऊन तो काय करतोय हे जरा नीट बघावं या उद्देशाने हमीद आपल्या जागेवरून उठला आणि तत्क्षणीच साद अल ताक्रिती त्या हॉलमधे परत आला. त्या दोघांनी क्षणभरच एकमेकांकडे पाहिलं आणि लगेच अल ताक्रिती बाजूच्या डू नॉट एन्टर अशी पाटी लावलेल्या खोलीच्या दारातून आत शिरला. हमीदने आपल्या पायलटशेजारच्या जागेवर बसकण मारली.
"त्याने पाहिलंय मला..." हमीद म्हणाला. त्याच्या ओठावरचा मेक अप खाली वहायला लागला.
फ्रेंच पायलटशी बोलण्यात गुंग असलेल्या आपल्या फ्लाईट अटेंडंटला थांबवून कॅप्टनने तिला काहीतरी सांगितलं. तिने आपल्या बॉसची आज्ञा पाळून फ्रेंच कॅप्टनला एक थेट प्रश्न विचारला.
साद अल ताक्रिती पुन्हा आत आला आणि कॅप्टनच्या दिशेनेच येऊ लागला. हमीदला वाटलं आपण आता नक्कीच बेशुद्ध पडणार.
हमीदकडे न बघता अल ताक्रिती कॅप्टनकडे पाहून गुरकावला," कॅप्टन, तुमचे आणि तुमच्या कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट्स मला तपासायचे आहेत."
"सगळ्यांचे पासपोर्ट्स माझ्या को पायलटकडे आहेत. ते तुम्हाला मिळण्याची मी व्यवस्था करतो.
"धन्यवाद. ते पासपोर्ट्स गोळा करून तुम्ही माझ्या केबिनमधे या. आणि तोवर तुमच्या लोकांना इथेच थांबायला सांगा. त्यांना कुठल्याही परिस्थितीमधे माझ्या परवानगीशिवाय या इमरतीच्या बाहेर जाता येणार नाही."
कॅप्टन हळूहळू त्याच्या को-पायलटकडे गेला आणि पासपोर्ट्स गोळा करत असतानाच त्याने एक आज्ञा सोडली जी ऐकून त्याच्या को-पायलटला धक्काच बसला. गोळा केलेले पासपोर्ट्स घेऊन कॅप्टन अल ताक्रितीच्या केबिनमधे शिरला तेंव्हाच फ्रेंच विमानाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस त्या लाऊन्जच्या दाराशी थांबली.
साद अल ताक्रितीने ते चौदा पासपोर्ट्स अतिशय काळजीपूर्वक नजरेखालून घातले आणि मग तो म्हणाला, "मी तर पॅन अऍमचा युनिफॉर्म घातलेली पंधरा माणसं मोजली होती..."
"तुमची काहीतरी चूक होतेय सर, आम्ही चौदाच लोक आहोत."
"अस्सं. मग मला आणखी कसून तपासणी करावी लागेल... नाही का! कृपया हे पासपोर्ट्स ज्याचे त्याला परत करा.
जर कोणी पासपोर्ट्सशिवाय प्रवास करत असेल तर त्याने ताबडतोब मला भेटायला हवं..."
"पण हे आंतरराष्ट्रीय नियमांना सोडून आहे. तुम्हाला माहीतच असेल की आम्ही ट्रन्झिटमधे आहोत आणि त्यामुळे यूएन रेझोल्यूशन २३८ खाली आम्ही तुमच्या देशात पाऊल टाकलेले नाही. " कॅप्टनने आपली बाजू मांडली.
"तुमच्या जिभेला लगाम घाला कॅप्टन,  इराकमधे आम्ही यूएन ला भीक घालत नाही आणि तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तुम्ही आमच्या देशातच नाही आहात" यावर अधिक काही बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे हे ओळखून कॅप्टनने शरणागती पत्करली. शक्य तितक्या संथपणे त्याने ते पासपोर्ट्स गोळा केले आणि अल ताक्रितीच्या मागोमाग तो पुन्हा हॉलमधे आला.त्या दोघांनी हॉलमधे पाऊल टाकताच पॅन अऍमच्या कर्मचाऱ्यांनी एकाएकी आपापल्या जागेवरून उठून इकडेतिकडे जायला सुरुवात केली. ते जोरजोरात एकमेकांशी बोलत होते आणि सतत आपली दिशा बदलत होते.
"त्यांना खाली बसायला सांगा.." ताक्रिती ओरडला. पॅन अऍमचे कर्मचारी अजूनही झिग-झॅग करत होते.
"काय म्हणालात?" कॅप्टन त्याच्या कानाशी आपलं तोंड नेत किंचाळला " त्यां ना खा ली ब सा य ला सां ग..." ताक्रिती किंचाळला.
अनिच्छेनेच कॅप्टनने त्यांना खाली बसायला सांगितलं. काही मिनिटांनी ते सगळे खाली बसले. पण ते अजूनही मोठमोठ्यांदा एकमेकांशी बोलतच होते.
"आणि त्यांना गप्प बसायला सांग..."
कॅप्टनने हळूहळू एकेकाजवळ जाऊन त्याला शांत व्हायला सांगितलं.
ताक्रितीने ट्रान्झिट हॉलच्या बाकड्यांवर बसलेली माणसं मोजायला सुरुवात केली तेंव्हाच कॅप्टनने धावपट्टीकडे आणल्या जात असलेल्या फ्रेंच विमानाकडे एक चोरटा कटाक्ष टाकला.
ताक्रितीने मोजलेली माणसं खरंच चौदा भरल्यानंतर तो खवळला. त्याने पुन्हा एकदा मोजणी केली.
"ज्याला त्याला त्याचा पासपोर्ट देऊन झाल्यावर कॅप्टन म्हणाला, "सगळेच्या सगळे चओदा जण इथे हजर आहेत."
संतापाने आपलं बोट कॅप्टनवर उगारीत ताक्रितीने विचरलें,"तुझ्या शेजारी बसलेला माणूस कुठे आहे?"
"कोण?  फर्स्ट ऑफिसर ?"
"नाही तो अरबी दिसणारा माणूस.."
"आम्च्यातला कोणीही अरब नाही..." कॅप्टनने त्याला ग्वाही दिली.
चीफ फ्लाईट अटेंडंटपाशी जाऊन अल ताक्रिती म्हणाला "तो तुझ्याशेजारी उभा होता. त्याच्या ओठाच्या वरच्या बाजूला मेक अप फासलेला होता आणि त्याचे ओघळ यायला लागले होते."
"माझ्या शेजारी तर फ्रेंच कॅप्टन बसला होता." ती म्हणाली आणि दुसऱ्याच क्षणी तिची चूक तिच्या लक्षात आली.
साद अल ताक्रितीने मागे वळून खिडकीतून बाहेर नजर टाकली तेंव्हा धावपट्टीच्या टोकाला फ्रेंच विमान उड्डाण करण्याच्या तयारीत उभं होतं.
फ्रेंच विमानाच्या इंजिनांचा आवाज यायला लागला. अल ताक्रितीने त्याच्या हातातल्या फोनचं बटण दाबून भराभरा काही सूचना दिल्या. तो काय बोलतोय हे समजायला कॅप्टनला अरेविक येण्याची गरज नव्हती...
एव्हाना पॅन अऍमवाले सगळे लोक फ्रेंच विमानाकडे बघून ते लौकर सुटू दे अशी प्रार्थना करत होते आणि एकीकडे अल ताक्रितीचा आवाज शब्दाशब्दाला चढत होता.
एअर फ्रान्सचं ते ७४७ विमान हळूहळू पुढे सरकलं, पुढच्या भागाकडे झुकलं आणि त्याने वेग घ्यायला सुरुवात केली. अल ताक्रितीने संतापाने एक शिवी हासडली. पळतच तो बाहेर गेला आणि तिथे उभ्या असलेल्या जीपमधे बसला. बोटानेच त्या विमानाकडे निर्देश करत त्याने ओरडायला सुरुवात केली. जीपने काही क्षणात वेग घेतला आणि उभ्या असलेल्या विमानांच्या गर्दीतून त्या विमानाकडे ती वेगाने जाऊ लागली.
धावपट्टीवर पोचता पोचता तिचा वेग ताशी नव्वद मैल इतका झाला होता. आणि शेवटचे शंभर यार्ड्स तर तिने त्या विमानाला समांतर धावत पार केले. अल ताक्रिती जीपच्या पुढच्या सीटवर उभा होता आणि विंडस्क्रीनचा आधार घेऊन आपली मूठ फ्रेंच विमानाच्या कॉकपिटच्या ंदिशेने नाचवत होता.
फ्रेंच विमानाच्या कॅप्टनने त्याला एक कडक लष्करी सॅल्यूट ठोकला. विमानाने आकाशात झेप घेतली तेंव्हा ट्रान्झिट लाऊन्जमधे जल्लोष झाला.
हसत हसत कॅप्टन त्याच्या सहकाऱ्यांकडे वळला आणि चीफ फ्लाईट अटेंडंटला म्हणाला "मी म्हणालो नव्हतो, एक जादा प्रवासी मिळवण्यासाठी फ्रेंच लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात "
सहा तासांनंतर हमीद झेबारी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरला. उतरताक्षणी त्याने शेरीनला फोन केला आणि सगळी हकीगत सांगितली.
दुसऱ्या दिवशी पहाटे पॅन अऍमने फर्स्ट क्लासमधून त्याला न्यू यॉर्कला आणलं. तो विमानतळाहून बाहेर आला तेंव्हा रडत रडत शेरीन त्याच्या गळ्यात पडली.
गाडीची काच खाली करत नदीमने वडिलांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली "पापा, पंधरवड्यात पंधरा दिवस असतात..."  हमीदने त्याच्याकडे हसून पाहिलं. मेनी मात्र भोकाड पसरलं होतं. कारण आपली आई या बिनमिशीच्या माणसाला मिठी मारून का रडतेय हे तिला कळतच नव्हतं!

--अदिती
(१७.१.०७)