एका चहापोह्यांची गोष्ट..

आमचे सगळे मित्रमंडळ आजी आजोबांकडे आधी जाऊन मग आमच्याकडे येणार,हा तर आता नियमच झाल्यासारखा आहे,मग प्रत्येकाची माहिती आजीच्या माहितीकोषात जाते! वय किती,नोकरी कुठे आणि लग्नाचा विचार आहे की नाही?विकास,सोनिका,रतिंद्र सगळ्यांना हे प्रश्न विचारून झाले. त्या निमित्ताने भारतातील विवाहपद्धती चांगली कशी?आईवडील सगळी माहिती कशी पारखून घेतात, हे आम्हालाच ऐकवून झाले.आणि आपल्या मैत्रिणींमध्ये सांगूनही झाले..
एकदा असेच गप्पा मारत असताना मार्कुसा,आजीची मैत्रिण आली,आली ती भन्नाट विचार डोक्यात घेऊन! "मला सांग, रतिंद्रला मैत्रिण आहे का?" हा प्रश्न दारातून विचारतच आत आली.."नाही."माझे उत्तर. अरे वा,मग छानच! ही बघ युलिया,एक फोटो माझ्यापुढे टाकत ती पुढे बोलली, "२४ वर्षाची आहे,लॉ ची शेवटची परीक्षा या वर्षी देईल,माझ्या सुनेची मुलगी! छान आहे की नाही?"... 'सुनेची मुलगी?' या लोकांचे रीतीरिवाज आता समजले असूनही मी बावळटासारखा प्रश्न केलाच..या रविवारी तुम्ही दोघं रतिंद्रला घेऊन आमच्याकडे ११ च्या सुमाराला ब्रंचलाच या,मी युलिया,ख्रिस्टीना आणि स्टेफानला यायला सांगते,दोघं एकमेकांना पाहतील,पटलं तर पुढे जातील.आपण फक्त ओळख करून द्यायची,असं सांगून भुरर्कन गेली की... "अग, तुझा मामेदीर करतोय का ग लग्नाचा विचार?" असं एखादी रमाकाकू,ठमाकाकू ज्या पद्धतीने विचारेल ना,त्यात आणि ह्यात काऽऽही म्हणजे काऽऽही फरक नव्हता..

तर आता तो सुप्रसिद्ध रविवार उजाडला. आम्ही रतिंद्रला घेऊन मार्कुसा आणि वेर्नरकडे निघालो,त्यांचे घर आमच्या घरापासून चालत ५,७ मिनिटांच्या अंतरावर,आजवर अनेकदा त्यांच्याकडे गेलोही होतो,पण आज मात्र...
मार्कुसा आणि वेर्नर ने नेहमीसारखे  आमचे स्वागत केले, नेहमीसारख्या गप्पा सुरू झाल्या तरीही वातावरणात असल्या कार्यक्रमांच्या वेळी असतो  तसला 'सुपरिचित अवघडलेपणा' देश,धर्म,वंशाच्या सीमा तोडून डोकावतच होता.इतक्यात कॉफी घेऊन युलिया आणि ख्रिस्टीन आल्या. चहापोह्यांची जागा कॉफी आणि केकने घेतली होती एवढेच!युलिया सुद्धा 'नम्रतेची पराकाष्ठा करत' आपली माहिती सांगत होती.कॉलेज कुठले,काय शिकते आहे इ.इ... रतिंद्र कुठे नोकरी करतो,त्याचे कामाचे स्वरुप काय असते? असली 'टिपिकल' अशा कार्यक्रमात शोभणारी प्रश्नोत्तरे झाली.भारताची माहिती,रीतीरिवाज यांचे 'सांस्कृतिक आदानप्रदान' झाले...मग मात्र मध्ये मध्ये वेळ कोरा जायला लागला.काय बोलावे ते कोणाला सुचत नव्हते.मग अचानक 'तुम्हाला दोघांना काही बोलायचे असेल तर गच्चीत जा..'हा गुगली पण झाला.त्या दोघांना गच्चीत पाठवून आम्ही परत सॅलड,चीज,फळं इ. चे तोंडीलावणे  कोऱ्या वेळाला लावायला लागलो.

एकदाचा तो कार्यक्रम संपला! त्या दोघांनी पुढे जायचे ठरवले किवा कसे याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.युलिया खरच गोड मुलगी होती.मध्ये असेच दिवस कोरेकोरे  खबररहित गेले.पण कथेच्या नायकाला दुसरी नायिका मिळाली,जी त्याच्या पेक्षा ११वर्षानी मोठी आणि दोनदा घटस्फोट झालेली होती, आजी,मार्कुसा,ख्रिस्टीना सगळेच ही बातमी ऐकून हळहळले...
'दिल आया गधीपे ..' या म्हणीचा अर्थ अगदी पुरेपुर समजला..आणि  जर्मन चहापोह्यांची गोष्ट मात्र अधुरीच राहिली.