चमत्कार, अंधश्रद्धा आणि विज्ञान

सद्धर्म त्रैमासिक जानेवारी २००७ चे संपादकीय

आजच वरील संपादकीय माझ्या वाचनात आले. मनोगती वाचकांसाठी ते मी टंकलिखित करत आहे.

           मानवी शरीर आणि बुद्धीच्या क्षमतांच्या सीमा शोधणं हे एक महा कठीण काम आहे‌. सर्वसामान्य माणूस आपल्या अशा क्षमतांचा दैनंदिन जीवनांत नेहमीच कमी अधिक प्रमाणात वापर करत असतो. सामान्य माणसांनी दाखवलेल्या असामान्य क्षमतांच्या बातम्याही वृत्तपत्रांतून नेहमीच छापून येत असतात. सर्वसाधारणपणे अशा गोष्टी या, अचाटशक्ती किंवा स्मरणशक्तीशी निगडीत असतात. परवाच पुणे येथील २ १/२ वर्षांच्या मुलाने उत्कृष्ट तबला वाजवून दाखवला. या गोष्टी नुसत्या आश्चर्यकारकच नसतात तर आपल्या विज्ञान समजुतीलाही त्या आव्हान देत असतात. अशा गोष्टी किंवा व्यक्तींचा तटस्थपणे सर्व उपलब्ध साधनांनी अभ्यास करणे आणि त्या घटनांची कारणमिमांसा शोधणे हे एक अतिशय कठीण काम होऊन बसते. अशा गोष्टींना चमत्कार समजून किंवा त्यांचं अस्तित्व नाकारून त्या अंधश्रद्धेचा भाग आहेत असं समजणे या दोन्ही गोष्टी धोकादायक आहेत.

            उत्तर पाकिस्तानमधील काही कुटूंबामध्ये दु:ख सहन करण्याची क्षमता असामान्य असल्याचे काही शास्त्रज्ञांना दिसून आले. किंबहुना त्यांना कुठल्याही बाह्य उत्तेजनामुळे दु:ख होत नसल्याचे आढळून आले. शारीरिक दु:ख हे माणसाला मिळालेले एक संरक्षण कवच आहे. रोग किंवा अपघातामुळे होणारे दु:ख हे तापदायकच असते. वैद्यकशास्त्रामध्ये दु:ख कमी करणारी अनेक औषधे आहेत. पण दु:ख संपूर्णत: नाहीसे करणारे औषध अजून सापडलेले नाही. दु:ख का व कसे होते हे कळले, तरच त्यावर उपचार शोधता येईल. पाकिस्तानमधील या कुटुंबावर केंब्रीज, इंग्लंड येथील प्रयोगशाळेत संशोधन करण्यात आले. या व्यक्तींमध्ये दु:खाचा अभाव का आहे हे  ही त्यांनी शोधून काढले आणि एकदा ही माहिती मिळाल्यावर त्यांचा प्रयत्न आता दु:खावर नवीन औषध शोधण्याचा चालू आहे. या सर्वच घटनेपासून आपण बोध घेणे आवश्यक आहे.

            भानुदास गायकवाड हा बारामतीचा एक साधा मनुष्य; तो ज्या गोष्टींना हात लावतो किंवा त्याच्या हातावर जर पाणी सोडले तर ते गोड होते. भानुदासाने कधीही आपल्याला काही दैवी शक्ती प्राप्त झाली आहे असा दावा केलेला नाही. अशा गोष्टी घडूच शकत नाहीत अशी ठाम अंधश्रद्धा असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने "भानुदास" हे थोतांड आहे हे जाहीर करून टाकले. भानुदासाने आपली क्षमता उघडपणे लोकांसमोर सादर केली आहे. मी स्वतः भानुदासाचा सखोल अभ्यास करून भानुदास हा प्रामाणिक असल्याचे दाखवून दिले आहे. "शोध अंधश्रद्धा" या माझ्या पुस्तकात एक संपूर्ण प्रकरणच लिहून अंधश्रद्धा समितीची थापेबाजी आणि त्यांनी लोकांची केलेली फसवणूक सप्रमाण दाखवून दिली आहे. खरं म्हणजे भानुदासवर अत्याधुनिक वैज्ञानिक चाचण्या केल्या तर जैव शास्त्रातील एखादे कोडेही उलगडू  शकेल.

            वास्तवाचे अस्तित्व नाकारणे म्हणजे अंधश्रद्धा दूर करणे नाही. आपल्याकडील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हा जडवाद आणि नास्तिकवादाच्या प्रचाराचा एक भाग आहे. समाज सुधारण्याचा त्याचा काडीचाही संबंध नाही. आज देवावरील अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानावरील फाजील श्रद्धेमुळे समाजाचे अधिक नुकसान होत आहे. खरा विज्ञानवाद जोपासायचा असेल तर, असल्या फाजील अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांना समाजाने दूर ठेवणे  जास्त योग्य. आता तर ही मंडळी सरकारवर असा कायदा करण्याकरिता दबाव टाकत आहेत. अनेक भोंदूबाबा समाजाला फसवत असतात ही गोष्ट खरी आहे. पण प्रचलित कायदा आणि प्रबोधन यांना आळा घालण्यास समर्थ आहे. पण देवावर विश्वास किंवा देवळांत जाणे हीच अंधश्रद्धा आहे अशी समजूत करून घेणाऱ्यांना ना श्रद्धा समजली ना अंधश्रद्धा उमगली.

           विज्ञानातील मूलभूत संकल्पना तटस्थ असतात. निसर्गाची सर्वच रचना, त्यामधील असलेल्या घटकांचा परस्पर संबंध, यामुळे निर्माण झालेले संतुलन, मानव आणि अन्य प्राणीजनांचे त्यामधील स्थान, या सगळ्यांच्या मुळाशी याच मूलभूत संकल्पनांचे अस्तित्व असते. उपनिषद लिहिणाऱ्या ऋषींनाही हेच मूलभूत प्रश्न भेडसावत होते. अर्थातच यामध्यें पौर्वात्यांचा दृष्टीकोन हा पाश्चिमात्यांपेक्षा निश्चितच वेगळा आहे. हा वेगळा दृष्टीकोन समजावून घेणे हे खास महत्त्वाचे आहे. धर्म संकल्पनेच्या मुळाशी सुद्धा हाच फरक अस्तित्वात आहे. "मनुष्य" हाच धर्माचे आणि विज्ञानाचे माध्यम आहे. धर्म किंवा विज्ञान संकल्पना तर्कक्रमाने समजलेला मनुष्य, त्याचा दुरूपयोग करणार नाही अशी काहीही खात्री नाही. आजच्या पर्यावरणाचा प्रश्न हा अशा नैसर्गिक साधनांच्या अविवेकी वापरातूनच निर्माण झालेला आहे. म्हणूनच धर्माला काय किंवा विज्ञानाला काय नीती-अनीतीच्या चौकटीत बसवावे लागते. नीती-अनीतीचा संदर्भ हा सांस्कृतिक असतो.

           वास्तवामध्ये धर्म विज्ञानाच्या आड येत नाही किंवा विज्ञान धर्माच्या आड नाही. दोघांचेही विवेकी संतुलन हेच समाजाला अधिक उपकारक आहे. धर्मवादी आणि विज्ञानवादी हे ज्यावेळेला या गोष्टींची जाण करून घेतील त्याचवेळी या दोन्हीही गोष्टींच्या अतिरेकापासून समाज वाचू शकेल.

संपादकीय: विजय वासुदेव बेडेकर