चष्म-ए-बद्दूर - दर्जेदार मनोरंजन!

दूरदर्शनवर कोणत्याही वाहिनीवर चष्म-ए-बद्दूर हा सिनेमा लागलेला असला की अचानक माझ्या हातातला रिमोट काम करेनासा होतो. फारूख शेख, दीप्ती नवल. राकेश बेदी, रवी वासवानी आणि मुख्य म्हणजे सईद जाफरी यांना हाताशी धरून सई परांजपेंनी एक अफलातून धमाल तयार केली ती म्हणजे चष्म-ए-बद्दूर. कोणतेही माकडचाळे नाहीत, कुठेही कमरेखालचे विनोद नाहीत, नायक नायिकेचे पावसातले गाणे नाही, आहे ती फक्त खुदुखुदूपासून खोखोपर्यंत ह्सवणारी एक प्रसन्न धमाल.
ही कथा आहे दिल्लीत एका फ्लॅटमध्ये रहाणाऱ्या तीन कॉलेज युवकांची. सिद्धार्थ पराशर हा गंभीर, इंटलेक्चुअल तरुण. इकॉनॉमिक्समध्ये एम.ए. झाला आहे आणि पी.एच. डी करतो आहे. त्याचे साथीदार ओमी आणि जोमो हे बाकी खुशालचेंडू. एखादी छोकरी पटवणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय. दोघेही परीक्षेत वारंवार नापास होताहेत, त्यांच्या आईवडीलांनी त्यांना पैसे पाठवणे बंद केले आहे, पण यांना त्याची काही फिकीर नाही. हे आपले बुटाला पॉलिश करताहेत, चकाचक कपडे घालताहेत आणि उधारीवर घेतलेल्या सिग्रेटी फुंकत नवनवीन शिकारीच्या शोधात हिंडताहेत! यांना उधार सिग्रेटी देणारा पानवाला आहे लल्लनमियाँ. हा अस्सल हैदराबादी, वरकरणी कठोर, पण मनातून या तीघांवरही माया करणारा.

अशात यांच्या गल्लीत नेहा रहायला येते. जाईच्या कळीसारखी ही शालीन मुलगी शास्त्रीय संगीत शिकते आहे. त्या शिकवणीसाठी लागणारे पैसे ही स्वाभीमानी मुलगी एका धुण्याची पावडर तयार करणाऱ्या कंपनीसाठी काम करून कमावते आहे. जोमो आणि ओमीच्या दृष्टीने बाकी ही नवीन 'शिकार'च आहे. मग ते दोघेही आपापले नशीब आजमावयाला जातात, आणि थप्पड खाऊन परत येतात. पण आपला अपमान लपवायला नेहाबरोबरच्या काल्पनिक रोमान्सच्या कहाण्या सांगतात. सिद्धार्थला या कशातच काही रस नाही. तो आपला अभ्यासात गुंतला आहे. पण धुण्याची पावडर विकण्याच्या निमित्ताने अचानक त्याच्या आयुष्यात नेहा येते. मुलींबाबत संपूर्ण अनुनभवी सिद्धार्थ गांगरतो. त्याचा हा भाबडेपणा, ही निरागसता नेहाचे मन जिंकून जाते. योगायोगाने नेहाच्या वडीलांच्याच ऑफिसमध्ये सिद्धार्थला नोकरीही मिळते. नेहा सिद्धार्थची मुग्ध प्रीत फुलू लागते.

इकडे आपण जिच्यावर 'लाईन' मारली ती छोकरी सिद्धार्थसारख्या 'नौसिखिया' ला पटली हे पाहून ओमी आणि जोमोचा तिळपापड होतो. मग ते तिच्याविषयीच्या भलभलत्या कहाण्या सांगून सिद्धार्थचे कान भरतात. प्रेमिकांच्यातले गैरसमज, ते निवळावेत म्हणून ओमी आणि जोमोने लढवलेल्या शकला, त्यातून झालेले घोटाळे आणि अपेक्षेप्रमाणे गोड शेवट...

पण 'चष्म-ए-बद्दूर'ची मझा अशी चार ओळीत सांगता येणार नाही. सई परांजपेने हा हलकाफुलका चित्रपट अशा गमतीत फुलवला आहे की ज्याचे नाव ते! शायराना मिजाज असणारा राकेश बेदी, आपल्या रूपाविषयी, कफल्लकपणाविषयी कसलाही न्यूनगंड नसणारा आणि साडी असो की स्कर्ट, सतत जाळे टाकण्याच्या तयारीत असलेला रवी वासवानी आणि स्कॉलर फारूख शेख यांनी आपापल्या कॅरॅक्टरमध्ये जान भरली आहे. दीप्ती नवल या चित्रपटात अगदी सहजपणाने तर वावरतेच, पण दिसतेही अगदी गोड. 'The girl you would like to take to your mother' म्हणतात तशी.पण चष्म-ए-बद्दूर चा खरा हीरो आहे तो लल्लनमियाँ. पांढराशुभ्र कुरता, चट्टपट्टेरी लुंगी,डोक्यावर खानदानी मुस्लिम टोपी, तोंडात रंगलेले पान असा हा लल्लनमियाँ सईद जाफरीने अजरामर करून ठेवला आहे. त्याचे उधारी वसुली करतानाचे 'मुझ जैसा मगरमच्छ कोई नही' हे रूप आणि रवी एखाद्या शिकारीचा पाठलाग करत असताना 'अरे सुनो, साइकिल ले जाना मेरी' हे रूप - दोन्हीही तितकीच लोभस. लल्लनमियाँचे संवाद - तसे एकूणच चष्म-ए-बद्दूरचे संवाद- खास दाद देण्यासारखे. प्रेमात पडून मूर्खासारखी खरेदी करून बसलो आणि आता उधारी चुकती करायला पैसे नाहीत असे सिद्धार्थने सांगितल्यावर 'सुना है इश्क में लोग हो जाते है बरबाद, यहाँ इश्क तो कोई और कर रिया है, बरबाद हम हो रहे है' ही चपराक, 'दूध नही है, वरना मै चाय बना देता आपके लिये' ही सिद्धार्थने नेहाकडे व्यक्त केलेली खास ब्रम्हचाऱ्याच्या मठीतली खंत, (आणि त्याचे तसेच कपातून लाडू आणून देणे!). नेहाने साबणचुरा विकतानाची प्रश्नावली भरताना सिद्धार्थला 'करते क्या हो' या प्रश्नावरचे त्याचे फुगून 'एम.ए. किया है- डिस्टींक्शनमें, पी.एच.डी. कर रहा हूं' असे दिलेले उत्तर आणि तो फुगा फोडणारा तिचा 'धुलाई के लिये कौनसा साबुन इस्तेमाल करते हो' हा पुढचा प्रश्न, 'ये झागवाला झंझट आपका शौक है?' हा सिद्धार्थचा मासूम प्रश्न 'टॅलंट सर्च' साठी दिल्लीत का आलो याचं कारण सांगताना 'दरअसल जयाजी के बाद बंबई में एक वॅक्यूम सा हो गया है' असं जोमोनं गंभीरपणे सांगणं... सगळेच खदखदा हसवणारे!

'चष्म-ए-बद्दूर' मध्ये 'कहाँ से आये बदरा', 'प्यार लगावट प्रणय मुहब्बत' आणि 'काली घोडी द्वार खडी' ही तीन सुरेख गाणी आहेत हे विसरायलाच होतं. 'काली घोडी पे गोरा सैंया दमके' या ओळीवर काळ्या मोटरसायकलवर कुर्ता-पायजमा (आणि हेल्मेट) घातलेला सैंया हे दृष्य - या खास सईच्या कल्पना. आपल्या नेहाबरोबरच्या रोमान्सची काल्पनिक वर्णनं करताना रवी वासवानीने केलेली 'पॅरडी' तर अफलातूनच. 

तर असा हा गेल्या जमानातल्या स्वच्छ. निर्भेळ कॉमेडीचा साक्षीदार असा चष्म-ए-बद्दूर. आता काळ पालटला. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.'दे दान सुटे गिराण' म्हणत भिकारणीने फिरावे तसे 'कैसा जादू डाला रे' असे आर्त सूर लावणाऱ्यांचा जमाना आहे. 'मस्ती' सारख्या चित्रपटाला विनोदी चित्रपट म्हणण्याचा जमाना आहे. पण अशातच कधीकधी दिल्लीच्या शांत रेस्टॉरंटमध्ये कॉफी आणि टूटीफ्ऱूटी खाणारे, एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडालेले एखादे जोडपे आठवते. 'सिद्धार्थ का बडा जबरदस्त हार्टफेल हो गया है' अशी भाबडी चिंता करणारे त्याचे दोस्त आठवतात, 'पैसे नहीं हैं तो मियाँ, ये नवाबी शौक फरमानेको किसने कहा था?' असा दम भरणारे लल्लनमियाँ आठवतात. वर्षानुवर्षं ताजा राहिलेला एक नितांतसुंदर चित्रपट आठवतो - त्याचं नाव चष्म-ए-बद्दूर!