कशाला!

 पुन्हा तेच ते प्रेमगाणे कशाला
शिळे आंबलेले तराणे कशाला

असे रोजचे दूर जाणे सहाया
पुन्हा सागराची उधाणे कशाला

तुझ्या अंतरी आज ओसंडणारा
ऋतू ओळखाया उखाणे कशाला

जरी सोस आहे मला चांदण्याचा
तुझे पौर्णिमेचे बहाणे कशाला

बुरे काय होते? बरे वेड होते
उगा येथ आले शहाणे कशाला

जरा लागले भान जेंव्हा सुटाया
दिसावी उषेची निशाणे कशाला

करी साधना त्यास येईल गाणे
सुराच्या कृपेला घराणे कशाला

(फुलू दे कळीला स्वतःच्या कलाने
तिला सारखे डोस देणे कशाला
अलामतीच्या संकटात सापडल्यामुळे अखेरीस या शेराला कात्री लावावी लागली. पण तो इथे देण्याचा मोह आवरला नाही.)

--अदिती
(१.१७.२००७)