फेब्रुवारी १७ २००७

दम आलू

जिन्नस

  • २ मोठे कांदे, बारीक चिरलेले आणि १ मोठा कांदा, उभा चिरलेला
  • २ टोमॅटो, बारीक चिरलेले
  • ३ मोठे चमचे दही, पाणी निथळवून (चक्का)
  • ३ पाकळ्या लसूण, १ इंच आले, किसून
  • खडा मसाला (खाली दिल्याप्रमाणे)
  • १५ अगदी छोटे बटाटे

मार्गदर्शन

मसाला वाटण-

तापलेल्या भांड्यात मंद आचेवर २ इंच दालचिनी, ४ लवंगा, ७-८ मिरी दाणे, १/२ चहाचा चमचा धणे, १ चहाचा चमचा जिरे, १/२ चक्री फूल, १ चहाचा चमचा तीळ, १ चहाचा चमचा खसखस तेलाशिवाय २-३ मिनिट परतून घ्यावे. हा खडा मसाला परतून झाला की ह्याच भांड्यात १/२ चमचा तेल टाकून उभा चिरलेला कांदा तांबूस होईपर्यंत परतावा. हा सगळा मसाला शक्य तितके कमी पाणी घालून वाटून घ्यावा.

बटाटे -

बटाटे स्वच्छ धुवून अर्धवट उकडून घ्यावे. उकडल्यावर साल निघाली तर ते जास्त उकडले गेले असे समजावे. उलळत्या पाण्यात साधारण १० मिनिट ठेवायला हरकत नाही असे वाटते. बटाट्याच्या सालीचे वावडे असेल तर ह्या अर्धवट उकडलेल्या बटाट्याची साल सोलाण्याने काढून घ्यावी. एका पसरट भांड्यात पूर्ण तळाला लागेल इतपत तेल घालून त्यात हे बटाटे शॅलो फ्राय करुन घ्यावे. मग काटा चमचा किंवा सुरीने ह्या बटाट्यांना टोचावे.

ग्रेवी -

२-३ चमचे तेलात, बारीक चिरलेला कांदा तांबूस होईपर्यंत परतून घ्यावा. त्याला तेल सुटायला लागले की टोमॅटो घालावा. ७-८ मिनिटे परतले की कडेला तेल सुटलेले दिसेल. मग वाटण घालावे आणि २-३ मिनिटे परतावे. चवीनुसार मीठ आणि तिखट घालावे. तिखट कमीच घाला कारण वाटणात मिरी आहे. रंगासाठी थोडे बेडगी मिरचीचे किंवा काश्मिरी तिखट घालायला हरकत नाही. ह्यात चक्का घालावा. ग्रेव्ही खूप दाट वाटल्यास थोडेसे पाणी घालावे. २-३ मिनिट उकळावे. मग ह्यात तळलेले बटाटे सोडावेत. कणकेने भांड्याचे झाकण सील करून ५-६ मिनिटे मध्यम आचेवर वाफ येऊ द्यावी. किंवा झाकणावर वरवंटा/बत्ता वगैरे जड वस्तू ठेवूनही ते सील करता येईल. थोडक्यात वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. मग शेगडी बंद करावी. जेवताना अगदी ऐनवेळी झाकण उघडावे. आवडत असेल तर कोथिंबीरीने सजवावे.

टीपा

ही काश्मिरी दम-आलूची कृती नव्हे. ते किंचित गोडसर असतात. ह्याला कोल्हापुरी दम-आलू म्हणा हवं तर. थोडं तिखट जास्त घातलं की झालं.  
दम-आलू म्हणजे दमवर म्हणजे वाफेवर शिजवलेले आलू. ह्या पाककृतीमध्ये बटाटे वाफेवर शिजवल्यामुळे ह्याला दम-आलू म्हणायला काही हरकत नाही. हे बटाटे शॅलो फ्राय न करता तळून घेतले तरी चालतात. पण मला तेलाचं वावडं असल्यामुळे, मी ते तळण्याच्या भानगडीत पडत नाही. 

आजच घरी केली आहे ही भाजी. फोटो काढला तर इथे चिकटवते.

माहितीचा स्रोत

बरेच. शिवाय माझे स्वयंपाकघरातले प्रयोगही.

Post to Feedहम्म!!
जमले नाही..
माफ करा
वेळ चुकली आहे
चित्र

Typing help hide