वृद्धाश्रम -१

ह्या लेखातला काही भाग काल्पनिक आहे ~ काही वास्तुस्थिती आहे !

"खरं तर त्यांनी इतक्या लवकर व घाईघाईत हा निर्णय घ्यायला नको होता." मी आईला म्हटले.
माझ्या जवळच्या एका नातलगाने मुली चांगल्या कर्त्या सवरत्या असून व सांभाळण्याची जबाबदारी पेलण्यास तयार असूनही सहपत्नी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतलेला होता.
खरं म्हटल्यास नेमक्या कुठल्या परिस्थितीत हा निर्णय त्यांनी घेतला असेल ते मला माहितही नव्हते.....
"अरे तो विचीत्रच आहे स्वभावाने, लहानपणापासूनच !" आईच्या त्या वाक्याने ते संभाषण तेथेच संपले.

माझी विचारचक्रे सुरू झाली.
आजन्म काबाड कष्ट उपसायची. मुंबईत कुठल्यातरी चाळ किंवा परिस्थिती अगदीच सुधारल्यास वा कर्ज वगैरे घेऊन ब्लॉक नावाच्या खुराड्यात आयुष्याच्या पुढच्या स्वप्नांचे मनोरथ बघायचे.......
सकाळ झाली की गजर वाजणार व नवा दिवस सुरू होणार......
जिवाची कामे आटोपत 'डबा' नावाचे अस्त्र काखोटीला मारून लढाईवर रूजू व्हायचे....
ही लढाई अस्तित्त्वाची व स्वत:च्या अस्मितेची !
'मी' पणाची कधी करुण तर कधी कणखर झालर पांघरून ही लढायची....
ही लढाई........हापीसातल्या साहेब नावाच्या वाघा समोर भेदरून उभ्या रहाणाऱ्या सशासारखी......
'माझ्या पायावर पाय देतोस का' हा विचार मनांत आणत हाताचा खुंबा शेजारच्याच्या बगलेत खुपसून खुपसून लोकल मध्ये स्वत:ची खुमखूमी दाखवणारी......

ही जिंदगी म्हणजे.....
बायको माहेरी गेली की चार टाळकी जमवून काही तरी गंमत करण्याच्या नांवाखाली स्वत:ची करमणवूक साधून घ्यायची.....
बायकोच्या "त्या" अवघडलेल्या अवस्थेत तीला शक्य ते सर्वच सहकार्य करीत कधी स्वयंपाक करण्याची.......
तर कधी 'बाई' रजेवर असल्याच्या निमीत्ताने किचनच्या खिडक्या दारे बंद करून भांडी आटोपून घेण्याचेही सत्कार्य करण्याची.......
तर कधी एकाहून एक सल्ले स्विकारत त्या पहिलटकरणी सारखे सगळे ऐकून घेण्याची.......

ह्या जिवनरथाचे एक चक्र कधी थांबले किंवा कधी उलटे फिरू लागले की काय अवस्था होईल हे कधीच सांगता येणार नाही. घरात आजारपणं तर कधी अकस्मात येणारे खर्च ह्यांचा ताळमेळ साधत रहाटगाडगे सुरू ठेवायचे हे दिव्यत्त्वाचे कार्य असावे. पुर्वीच्या काळचा जमाना म्हणजे मान ताठ ठेवून नाकासमोर चालणारा....
वाण्याचे बिल, दुधाचे पैसे, धोबी (असला तर) ते मोलकरणीचा पगार वेळेवर म्हणजे आपल्या पगाराच्या दुसऱ्या दिवशी झालाच पाहिजे हा शिरस्ता !
उधारी-उसनवारी हे शब्दही लाजीरवाणे वाटत. कर्ज ह्या शब्दाची धास्ती इतकी जबरदस्त होती...... की, लहान मुलाला 'झोप नाही तर बागुलबुवा येईल' अशी भिती घातली जायची तसेच काहिसे ह्या चाकरमान्याचे होते....
'तुला कर्ज होईल' असे नुसते पोपटवाल्या ज्योतिष्यानेही म्हटल्यास ह्या चाकरमान्याची झोप उडत असे !!! 

बायकोला हनीमुनच्या नावाने "माथेरान" च्या गाडीत बसवून आणणेल्या ह्या पांढरपेश्याने हौसेने चौपाटीवर तीच्या केसांत मोगऱ्याचा गजराही माळला असेल.
भेळपूरीला व मटक्यातल्या कुल्फीला त्या दिवशी नक्कीच त्याने प्राधान्य दिले असेल......
त्याचा किंवा तीचा किंवा दोघांच्या लग्नाचा तो वाढदिवस असावा ! 

मुले झाली की त्यांच्या बारशा, मुंजी पासून ते लग्न, डोहाळेजेवणा पर्यंतचे सोपस्कार आपल्या हौसेने पार पाडले असणार....
मुलांना सुटी लागली की कधी राणीच्या बागेत तर कधी म्हातारीच्या बुटात नेऊन स्वत:चीही थोडी फार हौस फेडून घेतली असणार...
डोळ्यातली आसवे आवरत व स्वत:ला सावरत आपल्या वृद्ध मातापित्यांना अखेरचा निरोप देवून तो चौथ्या दिवशी कामावर रुजू झाला असणार.......
दु:खाची दिवाळी म्हणून 'मुलांनो ह्यावर्षी फटाके नाही बरं' हे अंत:करणावर दगड ठेवून त्याने सांगीतले असणार......

कधी 'ऑफीसच्या कामानिमीत्त दिल्लीला जावे लागले' म्हणून लोकल मधल्या मित्रांकडे खोटी तक्रार केली असेल.
तर कधी लांबची मावशी येणार म्हणून विमानतळावर रात्रभर जागण्याचा अनुभव घेतला असेल व तीला आणण्या/सोडण्याच्या निमीत्ताने टॅक्सीची सफर पदरांत पाडून घेतली असेल ! 
हे सर्व सुखदु:खाचे अनेक पदर, एक एक करीत उलगडत, कधी बायकोबरोबर रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या गप्पा मारल्या असतील.....

ह्या पांढरपेश्या चाकरमान्याने आयुष्यात जी काही पुंजी जमवली असेल; ती त्याची मुले/मुली, वृद्धापकाळात सन्मानाने जगण्यासाठी छोटेसे पेन्शन व एखादी आयुर्विम्याची पॉलीसी !
पण गाठीला जी पुण्याची शिदोरी त्याने बांधून ठेवली असेल त्यावर त्याचे उर्वरीत आयुष्य हमखासं सुखी झाले असते.

मग अश्या ह्या नाकासमोर चालणाऱ्या माणसाला अचानक आयुष्याला वेगळे वळण देत वृद्धाश्रमाच्या वाटेवर का वळवावे लागले असणार ह्या विचारांनी मला अस्वस्थ करून टाकले.

*******************************

दिवसांमागून दिवस गेले, त्याक्षणी झालेले संभाषण माझ्या रोजच्या रहाटगाडग्यात व माझ्या स्वत:च्या विश्वात थोडेसे हरवल्यासारखे झाले. ह्या लांबच्या मामाची मुलगी लग्नात भेटेपर्यंत हा विषय डोक्यातून निघून गेलेला होता. ती समोर येताच मात्र मामांचा चेहरा एकदम समोर तराळला. मी तीला बाजूला घेऊन मामांची चौकशी केली.
"अरे काय करू भाई, ऐकतच नाहीत दोघेही. चांगले घर आहे. स्वत:चे उत्पन्न आहे, अडी अडचणीला मी किंवा धाकटी  अर्ध्या रात्री धावून जातो.... तरी हट्टच धरला की वृद्धाश्रमात जायचे. त्यांना आईही सामिल असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही."
तीचे कसेबसे शाब्दिक सांत्वन करून तीने दिलेला लोणावळ्याचा पत्ता भ्रमणध्वनीत लघूसंदेशाच्या रुपाने साठवून ठेवला.

एका पुण्याच्या फेरीत अचानक आठवण आली. हाती वेळही होता व पत्ताही नेमक्या जागी सापडला.
लोणावळ्यात गाडी घालून हा आश्रम शोधायला वेळ लागला नाही.
"नमस्कार, मी  ..... ह्या गृहस्थांना भेटू शकतो का ?"
"ते झोपलेत ह्या वेळी" चष्म्या नाकावर ठेवून त्याच्या वरून बघत त्या खडूस व्यवस्थापकाने सांगीतले.
"किती वाजता येऊ ?" मी भेटल्याशिवाय जाणार नव्हतोच !
"पाचाला येउन बघा " व्यवस्थापक....
"येऊन बघू की येऊ ?" मी हळूहळू शाब्दिक चकमकीची तयारी करायला लागलो.
त्यावर फालतूसे उत्तर फेकून तो पुढ्यातला शीळा पेपर वाचू लागला.
"त्यापेक्षा मी येथेच थांबलो तर ?" शांतपणे वाचन करत असलेला तो व्यवस्थापक आता खवळेल असा विचार करत मी त्याला विचारले.  तो बर्फाहून थंड होता. माझ्या सारखे कित्येक नग त्याने लोणावळ्याच्या पश्चिमेला बघीतले असावेत.
"माझी हरकत नाही, मात्र शांतपणे बसून रहा व मला प्रश्न विचारून व्यत्यय आणू नका."

मी आसपासच्या वातावरणाचे निरिक्षण करण्यात गढून गेलो......
लोणावळ्याच्या त्या शांत व प्रसन्न वातावरणातला तो आश्रम चहू बाजूंनी झाडींनी वेढलेला होता. वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंटच्या बाकड्यांची रचना अश्या रितीने केली होती की ६/८ जणं बसून आरामात गप्पा मारू शकतील. दोन झोपाळे एका जुईच्या मांडवाखाली बांधले होते त्यावर ४/६ जण बसू शकतील अशी सोय केलेली होती. कुठेही कागदाचा कपटा औषधालाही सापडू नये इतकी स्वच्छता, पायातले बुट व मोजे काढून अनवाणी चालण्याचा मोह व्हावा अशी मऊसूत हिरवळ त्याभोवती पसरलेली होती.
मधूनच एखाद्या पक्षाचा गुंजारव ऐकु यावा व आपण मान वळवून त्याला शोधण्याचा प्रयत्न करेपर्यंत तो तेथुन उडून गेलेला असावा.......
व तोवर दुसऱ्याने दुसऱ्याच ठिकाणून गुंजारव करून आपले मन वळवून घ्यावे.....
असा हा लपंडाव सुरू असतानाच कोपऱ्यात पडलेल्या एका खुराड्यावर नजर पडली.
पांढऱ्या शुभ्र व लोकरी सारखी मऊ सूत केसाळ त्वचा असलेल्या; रक्तवर्णी लाल डोळ्यांच्या सशांच्या त्या खुराड्याकडे माझी पावले नकळत वळली.

सशांचे मनसोक्त निरिक्षण मी करू लागलो. त्यातली एक जोडी मला खास आवडली.
एकत्र उड्या मारत, व अत्र, तत्र, सर्वत्र....एकत्र विहार करीत फिरत असलेली ती जोडी बघून मला गंमत वाटली.
सतत त्यांच्या वरच नजर का खिळलीय हे कळेनासे झाले.

एका अनपेक्षीत क्षणी मला त्या सशांच्या जागी दोन चेहरे दिसले......
एक माझा व एक माझ्या सौभाग्यवतीचा !

उर्वरीत भाग उद्या देत आहे.