जा. भू. म.(जागतिक भूत महासभा)

मुळात 'कशांलां तें जागतिक नि फागतिक? आपलां हिंदुस्थान बरा नि आंपण बरें' ही ब्रह्मराक्षसाची ठाम भूमिका होती. 'कुठली कोण ती किरीस्तावी भुतं बोलवायची नि आपल्या पंगतीलां बसवायची???ती मनुष्यमांस आणि मच्छी खाणांर..मद्य पिणांर..बुटं घालून मेजाखुर्च्यांवर बसणांर..घोर भ्रष्टाकार!!'

'आऊटसोर्सिंगचं युग आहे. पुढे मागे आपल्याला परदेशात सेटल व्हायला त्यांची गरज पडेलच.इथे भारतात माणसं एक एक फूट जागा तीन तीन हजाराला विकतायत. जंगलं नाहीशी होतायत. जी बाकी आहेत तिथे परदेशी माणसं अर्ध्या चड्ड्या घालून गळ्यात क्यामेरे लटकवत फिरतायत. गावांचे गावपण नष्ट होते आहे. ओसाड जुने वाडे आणि बंगले औषधालाही राहिले नाहीत. भूतांना भेडसावणारे भयाकारी मानवी गायक जोरजोरात गात आहेत 'झलक दिखलाँ जाँ'..मानवजातीच्या वेडेपणामुळे आपल्या भूतजगतावर आणिबाणीचा प्रसंग आहे. गरज आहे ती समस्त भूतजमातीने जात धर्म लिंग देश यांचे भेद विसरुन एकत्र व्हायची.गरज आहे ती या दिवसाच्या रखरखीत उजेडाचा नि:पात करुन एक नवी अंधारी रात्र आणण्याची.' मुंजा स्वत:ला 'या बोअर काकालोकांतला एकमेव नवतरुण' समजत असे. आतापण त्याने प्रभावी भाषण करुन सभेचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला.

'काय बोल्ला रे त्यो चिरकूट?' गिरा शेंडी चाचपत देवचाराला म्हणाला. गिऱ्याला 'ग्रामिन भागातील पर्तिनिधी' म्हणून बोलावलं असलं तरी सभेला येण्यामागचा त्याचा निम्मा उद्देश 'ग्रामिन भागातील म्हैला पर्तिनिधी' म्हणून बोलावलेल्या टंच हडळीशी ओळख वाढवणे हा होता. आताचं भाषण पण नेहमीप्रमाणे त्याच्या शेंडीवरुन गेलं होतं.
'तुका कांय करुक आंसां? गप ऱ्हंव!!' देवचार खेकसला. ब्रह्मराक्षसाच्या वक्तव्यामुळे मध्यरात्री जा.भू.म. च्या मधल्या सुट्टीत 'शुद्ध शाकाहारीं वरणभात,तूंप आणिं बटाट्यांची भाजी पुरी' हा भीषण पांचट आहार खावा लागणार याबद्दल खात्री होऊन त्याचा 'मूड' नुकताच कोकणात फिरायला गेला होता. 

'पन म्यां काय म्हंतो, आपन बोलिवनं धाडूच त्या फ़्वारीनच्या मंडलींना. आन् त्यंच्याकडनं वर्गनी पन घीऊ हजार हजार रुपे.' खवीस अधिकारवाणीने म्हणाला.
'रुपये नाही हो काका. त्यांच्याकडे येन, डॉलर, युरो,दिनार अशी वेगळी चलनं असतात.' मुंज्याने 'शायनिंग' मारायची संधी सोडली नाही.
'ए प्वारा! उगी मधीमधी मधीमधी पचपच करायची न्हाय, त्वांड फोडीन ,सांगून ठेवतो!' खवीसाने बाह्या सरसावल्या. मुंजा मनातून घाबरला.

वेताळ पुढे सरसावला. 'आपला बहुमुल्य वेळ परस्परात लाथाळ्यात जातो आहे. रात्र सरते आहे. आता एक तासात उजाडेल. त्याच्या आधी जा.भू.म. चा आराखडा, मेनू,बजेट सगळं ठरवायचं आहे. बाहेरगावच्या भूतांना रस्त्यांवर वर्दळ सुरु होण्यापूर्वी आपापल्या झाडांवर जायचं आहे. सदस्यांना विनंती की त्यांनी कृपया आपल्या भूतकीला आव्हान देऊन मिळून मिसळून रहावे.'
'ओ आबा! तुमी मधी पडू नका हां! ह्यो आमचा प्रायवेट मामला हाय!म्या काय त्यो शामळू विक्रम न्हाय 'बरोबर उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या मस्तकाची शंभर शकलं होतील' ह्ये गपगुमान आयकून घ्येनारा.केसं पिकल्याली दिसतात म्हनून सबूरीनं सांगतो तुमास्नी.आनि आखाड्याच्या गोष्टी कोनाला आयकवून दाखिवता? या एकदा आखाड्यात, नाय तंगडं मोडून हातात दिलं तर जिनगीभर सरळ पायानं फिरंन!' खवीस हमरीतुमरीवर आला.

वेताळ वैतागला. 'पहा ब्रह्मराक्षसराव. हे असं आहे. ही आजच्या पिढीची भूतं कशी उर्मट झाली आहेत. वयानं मोठ्या भूतांचा आदर ठेवण्याची काही पद्धत आहे की नाही?आमच्या वेळी असं नव्हतं हो.आजच्या या जगात भूतकी म्हणून काही चीज राहिलीच नाही बघा.'

हडळ जांभया देत होती तिने केसाचा शेपटा पुढे घेतला आणि शेजारी बसलेल्या सटवाईच्या कानात कुजबुजली, 'या बया! काय ही पुरुष मानसं! फुकाची भांडत बसल्यात आन् तरी म्हंतात बाईमानसाची जात भांडखोर.'
'त्यांना जिवंत व्हऊदे तिकडं! तू कोनतं लुगडं नेसनार सभेला? म्या ह्येंना पैठनी घ्याया सांगनार हाय.' सटवाई तोंडातली मशेरी सांभाळत म्हणाली. 
'शी! दिज विलेज पीपल!! आय डोंट वाँट टू बी विथ देम! हाउ एम्बॅरेसिंग!' कैदाशिणबाई नाक मुरडत पुटपुटल्या आणि त्यांनी पर्समधून छोटीशी रक्ताची डबी काढून आरशात बघून पटकन लिपस्टीक ठाकठीक केली.

'कृपया शांतता राखा.परदेशाचे प्रतिनीधी म्हणून ड्रॅक्युला आणि सौ. ड्रॅक्युला यांना बोलावण्याचा आमचे ज्येष्ठ सदस्य वेताळ यांचा प्रस्ताव मी अध्यक्ष या नात्याने मान्य करतो आहे.मेनू ठरवण्यासाठी एक समिती नेमून कैदाशिणबाईंना त्याची पूर्ण जबाबदारी सोपवली गेली आहे.तसेच वर्गणीची रक्कम ठरवण्यासाठी आणि गोळा करण्याची जबाबदारी मी खवीसरावांकडे सोपवतो.आता राहिला प्रश्न महासभेसाठी कोणती रात्र ठरवायची हा. तसं म्हटलं तर कोणतीही अमावस्येची शुभरात्र चालेल.'
ब्रह्मराक्षस अधिकारवाणीने म्हणाला.

गिरा शेंडीला पीळ देत पुटपुटला 'ए अध्यक्षभौ! सगल्याला समित्या केल्या तर तू सोता काय काम करनार?'
'हांव सांगतंय तुका, सगली वशिल्याची तट्टं आसां! तुका न् माका काय काम ना!' देवचार चिडून म्हणाला.दिवस उजाडण्याची लक्षणं दिसू लागल्याने तो झोपेने पेंगुळला होता.

अखेर सर्वपित्री अमावस्येची रात्र सर्वानुमते ठरली. ड्रॅक्युलारावांना सहकुटुंब आमंत्रण रवाना झालं.
'आता त्या दाताड्याला विमानतळावर आणायला कोण जाणार?'
'मी जातो. मला चांगलं इंग्लिश येतं. मी फोकाटेचा 'पाच रात्रीत फाडफाड इंग्लिश' चा कोर्स केला आहे.'

संध्याकाळचा गजर लावून लवकर उठून मुंजा विमानतळावर गेला. ड्रॅक्युला आणि ड्रॅक्युलीणबाई समोर आल्याच विमान उतरल्या उतरल्या.
'हेय! इश बिन ड्रॅक्युला. वी गेट एस इनन?' ड्रॅक्युला म्हणाला.
'हाय, हाउ आर यु,ग्लॅड टू मीट यू' आदी आंग्ल वाक्ये सफाईदारपणे पाठ करुन गेलेल्या मुंजाची विकेट उडाली. 'बोंबला! हा गोरा मूळचा हंगेरीचा आहे नाही का? आता जर्मन कोण बोलणार? आणि हा वेडा काय बोलतो कसं कळणार?'
'इंग्लिश,इंग्लिश!' मुंजा धापा टाकत म्हणाला.
'आक्जो! एंग्लिश स्प्राखं? ओ, आय स्पीक आइनबिसीयन एंग्लिश. अबर आय ट्राय.' 
गोऱ्या  पाहुण्याशी फाडफाड इंग्रजीत गप्पा मारुन सर्व भूतांवर 'इंपो' टाकण्याच्या मुंजाच्या स्वप्नाला टाचणी लागली. तो न बोलता ड्रॅक्युला दांपत्याला सभेच्या ओसाड वाड्यात घेऊन आला.

ड्रॅक्युलीणबाईंनी खास शिवलेला काळा चिमुकला पाठरहित गाऊन बघून हडळीने नाक उडवलं. 
'या बया!! ही गोरी बाय काय चिंधूकं घालून आलीया? समदी पाट उघडी. शोभतं का' बाप्याभूतांसमूऱ?
कैदाशिणबाई खास सभेसाठी शिवलेला काळाकुट्ट शरारा घालून आल्या होत्या. पण सगळी भूतपुरुषमंडळी ड्रॅक्युलीणबाईकडेच बघत होती. खंत मनात लपवून कैदाशिणबाई ड्रॅक्युलीणबाईला कपड्याकडे इशारा करुनम्हणाल्या, 'युवर ड्रेस इज व्हेरी नाईस.' (पुढेमागे 'मेड इन परदेश' रक्ताच्या लिपस्टीक आणि अस्सल मनुष्यचामड्याच्या उलट्या चपला हिच्याकडून मागवता येतील ही दूरदृष्टी त्या ठेवून होत्या.) 
'ओह! इश डांकं डीर!' ड्रॅक्युलीणबाई शुभ्र लांबसडक दात विचकत म्हणाली.

'येडीच दिसते बया! कापडाचं कवतिक केलं तर 'इश्श' म्हनून दीराचा इषय काढती!दीराशी लफडं हाय का बयेचं?' सटवाई हडळीच्या कानात कुजबुजली. सटवाईच्या लालभडक पैठणीची शान पण ड्रॅक्युलीणबाईच्या तुटपुंज्या पोशाखाने गेल्याने ती नाराज होती.

ड्रॅक्युला पिण्याच्या इतमामाकडे घुटमळत होता. 'आय विल लाईक रेड वाईन बिफोर इटींग.'
खवीस 'तळे राखी तो पाणी चाखी' या न्यायाने सर्व पेये स्वत:च्या घशाखाली उतरवून बघत होता.
'ए फ्वारीन! नो रेड वाईन! हिथं फकस्त ताक, रगत आनि हातभट्टी मिळंल. ' तो म्हणाला.
'व्हॉट इस्त हाटबाटी?' 
'हातभट्टी म्हंजी विंग्लीश्मधी ह्यांड ओव्हन! ' खवीसाने आपल्या महान आंग्लभाषेने ड्रॅक्युलाला बुचकळ्यात पाडलं. 
ड्रॅक्युलाने निमूटपणे आपल्या पिशवीतून आणलेली घरच्या रक्ताची छोटी बाटली तोंडाला लावली.

वेताळ भाषण करु लागला. ('नाहीतरी आजोबा एरवी पण उपदेशाचे डोसच पाजत फिरत असतात. आणि वेगळ्या भाषणाची काय गरज आहे?' मुंजा शेजारी बसलेल्या ब्रह्मसमंधाला म्हणाला.)
'आज आपला भूतसमाज शोषित आहे, पीडीत आहे,दिशाहीन आहे. मानवजातीकडून त्यांची पिळवणूक होते आहे. मांत्रिकवाद वाढत जाऊन भूतांचं अस्तित्व धोक्यात आहे.जंगलं नष्ट होत चालली आहेत.मानवजातीतील नारायण धारप, रत्नाकर मतकरी सारखे रक्तपिपासू लेखक आपल्या मनोरंजनासाठी भूतांना विनामूल्य राबवत आहेत. त्यांनी 'भूतकाळ' हा शब्द आपल्या भाषेत वापरुन भूतांचा बहुमूल्य वेळ कित्येकदा वाया घालवला आहे. प्लँचेटसारखे पोरकट प्रकार करुन भूतांना बोलावून उगीचच प्रश्न विचारुन त्यांचा मानसिक छळ केला आहे. आज आपण प्रतिज्ञा करुया की या अन्यायाचा शक्य तितका प्रतिकार करु.हा अज्ञानाचा प्रकाश दूर होऊन ज्ञानाचा अंध:कार पसरवू.'

वेताळाचे भाषण चालू असतानाच एक अनाहूत पाहुणा दारात आला. त्याची भेदक नजर सर्वांवरुन फिरत होती. काय होते त्याच्यात काय माहिती, त्याच्या डोळ्यात पाहिले की भूतांच्या काळजात एक अनामिक भीती दाटत होती.
'तुमच्याकडे आमंत्रणपत्र आहे का?' मुंज्याने घाबरत घाबरत विचारले.
पाहुणा घोगऱ्या आवाजात म्हणाला, 'मला आमंत्रणाची गरज पडत नाही.जिथे जिथे भूतं तिथे मी.भूतांशी माझा फार जवळचा संबंध आहे.'
वेताळाने आवंढा गिळत विचारलं, 'पण तुम्ही आहात तरी कोण?'

गडगडाटी हास्य करत पाहुण्याने आपले सरळ पाय दाखवले आणि म्हणाला, 'मी रामसे.' आणि त्याने खिशातून चलतचित्र कॅमेरा काढला. हडळ किंचाळून बेशुद्ध पडली. आणि सर्व भूतं जिवानिशी पळत सुटली आणि अशाप्रकारे काहीही ठराव संमत न होता दारुणरित्या जा. भू. म. बरखास्त झाली!!

(समाप्त)
-अनुराधा कुलकर्णी