वृद्धाश्रम (उर्वरीत)

एका अनपेक्षीत क्षणी मला त्या सशांच्या जागी दोन चेहरे दिसले......
एक माझा व एक माझ्या सौभाग्यवतीचा !

सौ. ची आठवण आल्याबरोबर नकळंत हात खिशांतल्या भ्रमणध्वनीवर गेला. घरी फोन करून कुठे आहे ते सांगणे आवश्यक होते......

आश्रमाचे हे सर्व निरीक्षण सुरू असताना कोणी तरी माझे निरीक्षण लांबून करतेय हे लक्षांत आलेच नव्हते. व्यवस्थापक महोदय बाहेर येऊन मी कुठे फुले तर तोडीत नाही नां; वा कुठल्या वस्तुंची नासधुस तर करित नाही नां ह्याचीच जणू खात्री करण्यासाठी बाहेर आले असावेत.
संथ पावले टाकत व रेंगाळत ते उभे होते त्यांच्या दिशेने मी सरकलो.
"नांव काय आहे आपले ?"
"विकास देशमुख.... आपले ?"
"माधव कुळकर्णी"
मग हळू हळू कोणाचा कोण- काय करतो पासून ते थेट २६ जुलैच्या प्रकोपावर गप्पा येऊन ठेपल्या. आश्रमाबद्दलची बरीच माहिती त्यांच्या कडून तोवर कळलेली होती. सव्वा / दिड तास गप्पांत कसा निघून गेला ते कळलेच नाही. जणू काही ह्याच माणसाशी गप्पा मारण्याचा योग नशिबात होता म्हणून तेथे येणे झाले असावे !

पांचाच्या ठोक्याला त्याने मामांच्या खोलीवर निरोप धाडला. इतकी सलगी करूनही वेळेचे त्यांनी पाळलेले बंधन बघून आपोआपच त्या जागे बद्दलचा आदर दुणावला.

मामा व मामी दोघे लगबगीने भेटायला धावले. त्या आश्रमात राहणाऱ्या मंडळींना जे पाहुणे भेटायला येत त्यांच्या बसण्यासाठी खास अशी वेगळी व्यवस्था केलेली नव्हती म्हणून आम्ही बाहेरच बागेतल्या एका कोपऱ्यात बाकड्यावर बैठक जमवली.
ह्या वेळी मात्र व्यवस्थापक महोदयांनी तत्परतेने चहा एका नोकराकरवी बाहेर धाडण्याची कृपा केली.

"कश्या आहेत तब्येती ?" मी विषयाला हात घातला......
"अरे अगदी ठणठणीत ! बघ तुझ्या मामीचे संधीवाताचे सर्व दुखणे येथे आल्यावर आपोआपच बरे झाले...." मामा अगदी उत्साहाने ओतप्रत ओसंडत होते. "ह्यांचाही दमा येथे अगदी ठणठणीत बरा झाला हं का माधव !" मामींचा उत्साहही त्यांच्याहून कमी पडत नव्हता.
"आईची तब्येत कशी आहे ?" मामीने प्रतिप्रश्न केला.
"थोड्या तक्रारी आहेत झोपेच्या पण ते सोडल्यास चांगलीच ठणठणीत आहे." मी म्हणालो.
"अजूनही जाते का पालघर- डहाणूला ?" मामीच्या नित्य चौकश्या सुरू झाल्या.
"हो, ते काय ती सोडणार आहे का ? आम्हीच उगाच काळजी करायची - हो ना ?" मी जरा विषय त्यांच्या मुंबईला परतण्यावर आणण्याच्या मुड मध्ये होतो.
"तु काय काळजी घेणार तीची; ती समर्थ आहे सर्व काही करायला" मामांना स्वत:च्या बहिणीबद्दल प्रेमळ आत्मविश्वास होताच ! "मला आठवते, तुम्ही तिघे लहान असताना तुझे दादा तिला गाडीतल्या लेडिज डब्ब्यात बसवून द्यायचे व ती एकटी तुम्हा पोरांना घेऊन इटारसी हून मुंबई पर्यंत यायची"
"मग किती दिवस मुक्काम येथे ?" मी सहज खडा टाकतोय ह्या आविर्भावात विचारले.
"अरे अगदी जन्मभराचा !" दोघेही जवळ जवळ एकाच सुरात बोलले.
गोंधळल्याचा अविर्भाव करीत मी विचारले " का ? मी तर ऐकले की तुम्ही एक बदल का हवा पालट म्हणून आलात राहायला येथे "
"चल काहितरीच काय, आम्ही आता येथेच कायम राहणार आहोत." मामीने घोषणाच करून टाकली.

"अरे सकाळी उठल्यापासून येथे आमची सरबराई सुरू होते.
सकाळी उठल्या उठल्या चहा, आंघोळीला गरम पाणी, नंतर नाष्ता व परत चहा.....
दुपारचे जेवण, मधल्यावेळेचे खाणे व चहा ते रात्रीचे जेवण हे सगळे आयते हातात मिळते रे !"
"आणी हो मध्ये ह्यांना परत चहाची तलफ लागल्यास तो पण आयता मिळतो." मामीने त्यातही सुख शोधले.
"अहो पण ह्या सर्वासाठी तुम्ही त्या दोघी मुलींना सोडून आलात की येथे " मी हेका सुरूच ठेवला.
"अरे माधवा, त्यांची मुले आता बरीच मोठी झालीत, दोघाही जावयांचे दिवसभराचे शिड्युल एकदम पक्के असते. मुलांचेही अभ्यास व क्लासेस च्या वेळा नक्की केलेल्या आहेत. दोघीही मुली नोकरी करणाऱ्या..... मग त्यात आमचे अस्तित्व असून नसल्यासारखेच नाही का ?"
हृदयावर कुठेतरी सुरी हळूवार फिरत होती.
"नाही....... तरीही शेवटी आपले घर ते आपलेच घर.... तुम्ही स्वत:च्या घरीच तर राहायचात तेथे कुठून ह्या सगळ्यांचा प्रश्न येत होता ?" मी अजूनही माझा हट्ट सोडत नव्हतो.
"तुला तक्रार नाही करीत मी, पण एक सांगते...... " मामीने कहाणी सुरू केली !

दोघी मुली व जावई आपपल्या कामात वा व्यवसायात अडकून पडलेले. दिवसातून एक दोन फोन यायचे तब्येतींची चौकशी करायला. मुली वेळात वेळ काढून चक्कर मारून जायच्या.
जेथे त्यांच्या स्वत:च्या स्वयंपाकाचे ठाव ठिकाण नक्की नसायचे तेथे त्या ह्यांच्यासाठी कुठून जेवण बनवणार ? नातवंडांचे अभ्यास व मित्र मंडळी ह्यांत त्यांना आजी आजोबांची क्वचितच आठवण यायची. जावई कर्तव्यतत्पर होते पण आपुलकीचा वा जिव्हाळ्याचा भाग थोडा कमी पडत असावा.....
त्यात मुंबईची महागाई, घरातले सर्व खर्च, आवश्यकत: नसून करावे लागणारे काही खर्च हे सर्वच त्या वृद्धांना गैरप्रकार वाटत असल्याचे मामीच्या बोलण्यातून जाणवत होते.

" अरे साधी मोलकरीण ठेवायची त्या मुंबईत तर ५०० रुपयाच्या खाली खर्च येत नाही व मोठी मुलगी तर मागेच लागलेली होती की दिवसभरासाठी एखादी बाई ठेवा कामाला..... आता तीचे दिड दोन हजार होणार, केबल वाला. पेपर वाला, सोसायटीचा मेन्टेनन्स, रोजचा भाजी पाला त्यातून उरणारे अन्न, फोनचे बिल, दुधाचे बिल, हे सगळे किती आटोक्यात ठेवायचे "
मला तोवर एका चौकटीत जमा खर्च बसवणाऱ्या सौ. चा चेहरा दिसू लागला....
नकळत मी त्यांच्या बाजूने विचार करायला सुरूवात केली होती.

मध्येच एक जोडपे नमस्कार चमत्कार करून पुढे सरकले..... मामांनी ओळख करवून दिली - औरंगाबादहून आलेल्या त्या जोडप्याची दोन्ही मुले परदेशी नांदत होती !

"त्यापेक्षा मग मीच निर्णय घेतला. हीला म्हटले की, जे व्हायचे आपल्या दोघांचे होईल; सुरूवात तर करून बघूया.... आपल्यास नाहीच जमले तर परत येऊ घरी त्यात काय मोठे ?" मामा सांगू लागले.
"शेवटी अनेक वृद्धाश्रमांबद्दलची माहिती काढून येथे येण्याचे नक्की केले. येथे एक चांगली सोय ह्या मंडळींनी करून ठेवली आहे. येथे आल्या आल्या वर्षाची फी एकदम घेत नाहीत. आधी तात्पुरती महिन्या भराची सोय करतात.... मग आवडल्यास पुढे तीन महिन्यांची फी घेतात व राहण्याचे नक्की झाले तरच वर्षभराची फी भरावी लागते. "
ह्या उपक्रमाबद्दलची माझी ही उत्सुकता हळू हळू वाढू लागलेली होती. तरीही त्यांच्या ह्या जिवनचक्राला 'एक उपक्रम' ह्या नजरेने बघण्याची खोड जिरलेली नव्हती !

"आमचा पार्ल्याचा तो ब्लॉक मग भाड्याने दिला. दोघी मुलींच्या नावे जॉईंट खाते होतेच. त्याच खात्यात भाड्याचे पैसे टाकायला सांगून आम्ही त्या एका जबाबदारीतून सुटका करून घेतली. ती जागा मेन्टेन करणे हल्ली जरा कठीणच जायचे आम्हाला " तोवर भुसावळच्या आमच्या घराची दुर्दशा माझ्या डोळ्यांसमोर आलेली होतीच.
"माझे पेन्शन व बाकी गुंतवणुकीच्या व्याजावर आमचे येथे मस्त चालले आहे " मामा म्हणाले.
"निम्म्यातच भागत असेच समज ना " मामींचे व्यवहारचातुर्य बोलले.
"अरे येथले खर्च ते काय ? टिव्ही आहेच. विजेचे बिलही सगळे एकत्रीतच येते, हवे नको ते बघायला येथे कर्मचारी वर्ग आहेच..... आठवड्यातून तपासणीसाठी एक वेळा डॉक्टर येतात.... येथले संचालक मंडळाचे सदस्य चक्कर टाकतात. सर्वांशी घरोब्याचे संबंध झाले आहेत." मामा उत्साहाने सांगत होते.
हळू हळू माझ्यातली हट्टीपणाची भावना असुयेची होऊ लागलेली होती.....
"मला तर इतक्या मैत्रीणी मिळाल्यात की विचारूच नकोस.... येथुनच आम्ही मागच्या महिन्यात गणपतीपुळेला दोन दिवस जाउन आलो... माझी फार इच्छा होती कधीची" मामी म्हणाल्या.

मग विषय एकदम बदलला गेला.... माझ्या मुली, पत्नीची त्यांच्यामागे होणारी धावपळ, माझा व्यवसाय अश्या बऱ्याच गोष्टींवर गप्पा होत होत्या.

एका नेमक्या क्षणी खिशातला भ्रमणध्वनी खणखणला आणी बघतो तर सौ. चाच फोन होता. मग त्यांच्याच हातात सरळ फोन देऊन आईशीही भ्रमणध्वनी मार्फत भेट घडवून दिली.
आता निरोप घेण्याची वेळ आलेली होती. लहानपणी कधीही मामांच्या घरी गेल्यावर निरोप घेताना मामी नेहमी खाऊचा पुडा सोबत देई. त्यात कधी लाडू असत तर कधी चार ग्लुकोजची बिस्कीटे तरी ! आपण ह्यांना येथे प्रथमच भेटण्यास आलो व तेही हात हलवत हे आठवल्याने मला अपराध्यासारखे वाटू लागले......
"चला मी निघतो, परत येईन पुण्याला आलो की !" मी अगत्याने मामांना मिठी मारत बोललो.
दोघांच्या पाया पडून निघताना अचानक मामीने साद दिली......
"अरे थांब, मुलींसाठी खाऊ देते " त्यांच्या ह्या वाक्याने माझा सावरून ठेवलेला बांध डोळ्यांतून फुटला.....
"अरे वेडा आहेस की काय ? इतका मोठा दोन मुलींचा बाप झालास आणी रडतोस काय लहान मुलासारखे ?" मामांनी समजूत काढली.
"आणी पुढच्या वेळी आलास की आईला सोबत आण. आमच्या बरोबर दिवसभर गप्पा मारून संध्याकाळी तुझ्याबरोबर परत जाईल"

वळणावरून गाडीतून बघीतले तेव्हा दोघेही निरोपादाखल हात हलवत उभे होते.
आईला आणायचे नाही असा दृढनिश्चय करून मी गाडी दामटवली.......
........न जाणो तीला येथले वातावरण आवडल्यास मी माझ्या मातृप्रेमाला पारखा झालो असतो !